Baramati Political News : लोकसभा निवडणुकीत पाठिंबा वाढवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामतीत Baramati सर्व ताकद पणाला लावली आहे. पू्र्वीच्या राष्ट्रवादीत अजित पवारांमुळे दुखावलेल्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेण्यावर पवारांनी भर दिला आहे. राजकारणापासून दूर गेलेले पण पूर्वाश्रमीचे सहकाऱ्यांनाही पवारांनी कामाला लागण्याचे आदेश दिलेत. यासह पवारांनी अजित पवारांच्या खास शिलेदारांनाही गळ घालण्याचा सपाटा लावल्याचे दिसून येत आहे. माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि अजितदादांचे निकटवर्तीय बाळासाहेब तावरे यांची पवारांनी भेट घेतली आहे.
माळेगाव येथील निवासस्थानी जात पवारांनी बाळासाहेब तावरे Balasaheb Taware यांच्याशी चर्चा केली. तावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते आहे. त्यामुळे या भेटीने बारामतीच्या राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तावरेंसह माळेगावातील राजकीयदृष्ट्या ताकद असलेल्या बुरुंगले, सस्ते कुटुंबीयांचीही पवारांनी चर्चा केली.
"तुम्ही माझ्या आणि सुप्रिया सुळेंच्या बरोबर आहात असे मी समजतो," अशा मोजक्या शब्दांत पवारांनी संबंधितांना गळ घातली आहे. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, अॅड. एस. एन. जगताप, प्रमोद जाधव, गौरव जाधव, श्रीहरी येळे, शरद तुपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तावरेंसोबत झालेल्या चर्चेत पवारांनी Sharad Pawar माळेगाव साखर कारखान्याची स्थिती जाणून घेतली. तसेच दुष्काळी स्थिती असूनही माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याचे गाळप चांगले झाले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटीबाबत बाळासाहेब तावरे म्हणाले, ही राजकीय भेट नव्हती. पवारांशी कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. त्यांचे आणि माझ्या कुटुंबाचे पूर्वीपासून सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. यातूनच ते माझ्या घरी आले होते. आमच्यात आरोग्य आणि कौटुंबिक चर्चा झाल्याचे तावरेंनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यापूर्वी शरद पवारांनी सांगवी येथे भाजपचे नेते चंद्रराव तावरे Chandrarao Taware यांची, तर सोमेश्वर परिसरात काकडेंचीही भेट घेतलेली आहे. बारामतीतील साखर पट्ट्यातून तुतारी चिन्हाला मोठा पाठिंबा मिळवण्यासाठी पवारांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. या भेटी घेताना पवारांनी दशकांचे वैर बाजूला ठेवून सुप्रिया सुळे यांच्यामागे मोठी ताकद उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे पवार बारामतीत कोणता डाव टाकणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.