Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पुण्यातील शहरी भागानंतर ग्रामीण भागात उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेरण्याची रणनीती आखली आहे. याचा पहिला धक्का अजितदादा गटातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांना दिला आहे. शरद पवारांनी आपल्या पक्षासाठी खेड तालुका अध्यक्षपदी म्हणून अनुभवी हिरामण सातकर यांना संधी दिली. सातकर खेडचे स्वर्गीय आमदार सहकारमहर्षी साहेबराव सातकर यांचे ते चिंरजीव आहेत. साहेबराव आणि शरद पवार (बारामती) हे १९६७ ला एकाचवेळी आमदार होते. (Latest Political News)
राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदी तरुण माजी नगरसेवक तुषार कामठे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ती करताना त्यांनी उद्योगनगरीची जबाबदारी तथा पक्षाचे नवे कारभारी म्हणून आमदार रोहित पवार यांना काम करण्यास सांगितले, तर दुसरीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वतः शरद पवारांनी (Sharad Pawar) लक्ष घातले आहे. पवारांनी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या खेडच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सातकरांना दिली आहे. सातकरांकडे राजकीय वर्तुळातील एक अनुभवी चेहरा म्हणून पाहिले जाते.
राष्ट्रवादीतील कथित फुटीनंतर पिंपरी-चिंचवडप्रमाणे खेड तालुक्यातही बहुतांश पक्ष हा अजित पवारांमागे उभा राहिला. आतापर्यंतचे राज्यभरातच राष्ट्रवादीत गोंधळाचे वातावरण होते. दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील असे त्यांना वाटत होते. आता ती आशा मावळली आहे. परिणामी दोन्ही गटांकडून स्पष्ट भूमिका घेण्यास सुरुवात झाल्याचे खेडमध्ये स्पष्ट झाले. तेथील अॅड. देवेंद्र बुट्टे-पाटील आणि हिरामन सातकर यांनी शरद पवारांबरोबर जाण्याचे ठरवले. (Maharashtra Political News)
आतापर्यंत खेडच्या राजकारणात पक्षांतर्गत गटबाजीमुळे डावललेल्या सातकरांना शरद पवारांनी संधी दिली आहे. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. यानंतर दोघांनी मोदीबागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्यासोबत तालुक्यातील ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिभाऊ सांडभोर होते.
खेडमधील बुट्टे आणि सातकर यांनी एकत्र येत पवारांची ताकद वाढवली. त्यामुळे खेड तालुक्यातील राजकारणाचे एक नवे समीकरण आकार घेणार आहे. तसेच त्यातून विद्यमान आमदार मोहितेंना पर्यायही उभा राहणार आहे. बुट्टे पाटील-सातकर एकत्र आल्याने खेडमध्ये आघाडीलाही बळ मिळणार आहे. या नव्या राजकीय समीकरणात आमदार मोहितेंच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे.
खेडमध्ये बदलाचे वारे?
तरुण पिढीच्या अपेक्षा वेगळ्या आणि वाढलेल्या आहेत. त्याबाबत शरद पवारशी चर्चा करताना तरुणांवर अधिक लक्ष देण्याचे ठरवले आहे. तालु्क्यात सर्वांना बरोबर घेऊन काम करणार, असे वडिलांप्रमाणे ग्रामपंचायतीपासून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या हिरामण सातकरांनी 'सरकारनामा'ला सांगितले, तर 'आम्ही वीस-पंचवीस वर्षे राजकारणात असूनही संधी मिळाली नाही. तरी पवारांची साथ सोडली नाही,' असे अॅड. देवेंद्र बुट्टे-पाटील यांनी सांगितले. 'खेडला शरद पवारांकडे पाहून मतदान होते, उमेदवार निवडून येतो. त्यामुळे साहेबांनी ठरवले, तर खेडमध्ये बदलही दिसेल,' असे सूचक विधानही बुट्टे-पाटलांनी केले.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.