Sharad Pawar Pune News :
मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोणीतरी वेगळाच असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. जरांगे हे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. यावर आता शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सगळे राष्ट्रीय पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व मित्र पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार असून आणखी काही पक्षांशी आमचं बोलणं सुरू आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्र येऊन जनतेला वेगळाच पर्याय देत आहोत, असे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत Sharad Pawar म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीने आमच्या सोबत यावं, यासाठी आम्ही आग्रही आहोत. त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी आज बैठक बोलावली होती. त्यासंदर्भात आमचे काही सहकारी त्यांच्याशी बोलले देखील. मात्र त्यांची आज सभा असल्याने त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. मात्र उद्या त्यांच्याशी बोलणं होईल, ही शक्यता नाकारता येत नाही, असे ते पुढे म्हणाले.
आगामी निवडणुकांमध्ये लोकांना पर्याय पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज बारामती लोकसभा मतदारसंघाची विधानसभा मतदारसंघ न्याय बैठका घेण्यात आल्या. प्रत्येक मतदारसंघातून शंभर ते दीडशे पदाधिकारी आले होते. यातून लोकांना पर्याय हवा आहे, असं जाणवलं. आम्ही राजकीय पक्ष असल्याने लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करणे ही आमची जबाबदारी असून महाविकास आघाडी म्हणून जनतेला वेगळा पर्याय आम्ही उपलब्ध करून देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
बारामती मतदारसंघांमधील अनेकांनी त्यांना दमदाटी केली जात असल्याचे सांगितले आहे. अनेकांना त्या संदर्भातील फोन येत आहेत. सरकारी निमसरकारी शैक्षणिक संस्था सहकारी संस्थामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांना नोकरीला मुकावे लागेल, अशी धमकी देण्यात येत आहे. मात्र कोणी दमदाटी करत असेल आणि त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहोत. तुम्ही चिंता करू नका. तुम्ही एकटे नाही, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जरांगे हे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचत असल्याचा होत असलेल्या आरोपावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मी अनेक जबाबदार मुख्यमंत्री आणि नेते पाहिले. मात्र सध्याचे जबाबदार लोक असे पोकळ बोलतात. जरांगे यांचा आणि माझा संबंध त्यांचे उपोषण सुरू झालं तेव्हा पहिल्यांदा आला. जरांगे यांच्या उपोषणावेळी सर्वात प्रथम मी पोचलो. आणि त्यांना यावेळी एवढेच सांगितलं की, तुमच्या मागण्या संदर्भातील आग्रह मी समजू शकतो. मात्र दोन समाजामध्ये अंतर निर्माण होईल, असं काही करू नका. एवढेच त्यांचं आणि माझं बोलणं झालं त्यानंतर आजतागायत जरांगे यांच्याशी माझं बोलणं अथवा भेट झाली नाही. असं असताना देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं असं बोलणं योग्य नसल्याचं शरद पवार म्हणाले.
राजेश टोपे यांच्यावर होणारे आरोप चुकीचे असून काही जबाबदार लोकांनी सरकार आणि आंदोलकांमध्ये संवाद करण्यासाठी राजेश टोपे यांची मदत घेतली होती. त्यामुळे एका बाजूला मदत घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला आरोप करायचे हे अत्यंत चुकीचा असल्याचं शरद पवार म्हणाले. सरकारने एसआयटी नेमावी अजून काही नेमा, कर नाही त्याला डर कशाला, असे म्हणत पवारांनी आरोप फेटाळून लावलेत.
सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, 'लोकशाहीत सर्वाना निवडणूक लढायचा अधिकार आहे. नवीन उमेदवार येत असेल तर आनंद आहे. मला अजित पवार पत्रावर बोलायचं नाही.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.