
Pune News, 11 Jan : विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. जास्तीत जास्त महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका आपल्याकडे रहाव्यात यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली आहे.
तर या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता काही राजकीय पक्षांनी 'एकला चलो'ची भूमिका घेतली आहे. नुकतंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबई ते नागपूर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.
तर आघाडीतील (Mahavikas Aghadi) मित्र पक्षांकडून त्यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील राऊतांच्या भूमिकेवर भाष्य करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशांत जगताप म्हणाले, "संजय राऊत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे.
मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका हे आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो. विधानसभेला काही चुकीच्या गोष्टी घडल्याने महाविकास आघाडी पिछाडीवर गेली. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अद्याप घोषणा झालेली नाही. 21 जानेवारीला याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. त्यानंतर निवडणुकांबाबतचं चित्र स्पष्ट होईल.
मात्र, अशा परिस्थितीत संजय राऊतांनी 'एकला चलो'ची भूमिका घेणं आश्चर्यकारक आहे," असं जगताप यावेळी म्हणाले. शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जर आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्रित लढलो तर निश्चित जिंकू हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.
ठाकरेंच्या सेनेने एकटं लढण्याचा निर्णय घेतला असला तरी आघाडीतील इतर पक्ष एकत्रित बसून पुढचा निर्णय घेऊ. जरी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने 'एकला चलो'ची भूमिका घेतली. तरी आम्ही मात्र महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाऊ. काँग्रेस (Congress) आणि आम्ही एकत्र राहून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढू. शिवसेनेचा निर्णय जरी चुकीचा असला तरी त्या निर्णयासोबत आम्ही जाणार नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) एकत्रित निवडणुका लढवेल, असं प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्णय आघाडीतील इतर दोन पक्षांना मान्य नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीला एकत्रितपणे सामोरी गेलेली महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.