Shirur: शिरूरमध्ये राजकीय ट्विस्ट! भाजपचे ११ नगरसेवक सत्ताधाऱ्यांसोबत; शरद पवार गटाची कोंडी

Shirur Politics News: शिरूर नगर परिषदेत भाजपच्या ११ नगरसेवकांनी सत्ताधारी आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच नगरसेवकांपुढील राजकीय पेच वाढला आहे.
Shirur Municipal Council
Shirur Municipal CouncilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shirur Municipal Politics News: शिरूर नगर परिषदेच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोड घडली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित सत्तेला आता भाजपच्या ११ नगरसेवकांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाची ताकद वाढली असली, तरी सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडण्याचा पवित्रा घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच नगरसेवकांची राजकीय कोंडी झाली आहे.

भाजपचे नगर परिषद गटनेते नितीन पाचर्णे यांनी नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. शहराचा विकास हेच उद्दिष्ट ठेवून कोणत्याही अटीशिवाय सत्ताधारी गटाला पाठिंबा देत असल्याचे नितीन पाचर्णे यांनी स्पष्ट केले.

नगर परिषद निवडणुकीत भाजपचे ११, राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले होते. अपक्ष आयेशा सय्यद यांनीही सत्ताधारी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असले, तरी भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले होते. आता भाजपनेच सत्ताधारी गटाला पाठिंबा दिल्याने नगर परिषदेतील राजकीय समीकरण बदलले आहे.

Shirur Municipal Council
Maharashtra Drought: दुष्काळी 304 तालुक्यांसाठी महाराष्ट्र सरकारचा ॲक्शन प्लॅन : जलसंधारणाची 11 प्रकारची कामे सुरु होणार

शरद पवार गटाच्या नाराजीचा फायदा भाजपला?

सत्तेतील पदांच्या वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला उपनगराध्यक्षपदासह दोन समित्यांची सभापतिपदे मिळाली होती. मात्र, सत्ताधारी गटाकडून विश्वासात घेतले जात नसल्याची आणि सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची नाराजी या पक्षाच्या नगरसेवकांनी व्यक्त केली होती. उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्यासह पाच नगरसेवकांनी २ सप्टेंबर रोजी सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडण्याबाबतचे पत्र दिले होते.

या नाराजीमुळे शिरूरच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, महिनाभरापासून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान भाजपने सत्ताधारी गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्ताधारी आघाडीला बळ मिळाले असून, शरद पवार गटाच्या नगरसेवकांसमोरील राजकीय पेच अधिकच वाढला आहे.

भाजपचा सूर विकासाचा; नगराध्यक्षांकडून स्वागत

भाजपचे नगरसेवक विरोधी बाकावर असतानाही नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांनी विकासकामांमध्ये दुजाभाव केला नाही. विरोधक म्हणून वेगळी वागणूक न देता सर्वांना सोबत घेण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळेच सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे नितीन पाचर्णे यांनी सांगितले.

भाजपच्या पाठिंब्याचे स्वागत करताना नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांनी नगर परिषदेचा कारभार अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला. आमदार माऊली कटके, उद्योगपती प्रकाश धारिवाल आणि भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण व शाश्वत विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Shirur Municipal Council
Shiv Sena UBT : ठाकरे गटाला मोठा दिलासा! दीपक सावंत यांच्या नगरसेवक पद रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

'आम्हाला विश्वासात घेतलेच नाही'

दरम्यान, भाजपने सत्ताधारी गटाला पाठिंबा दिल्याच्या घडामोडीपासून आपल्याला दूर ठेवल्याची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी व्यक्त केली. सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडण्याबाबत पत्र दिले असले, तरी आपण अद्याप सत्तेतून बाहेर पडलेलो नाही, असा दावा या नगरसेवकांनी केला.

उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्यासह रवींद्र ढोबळे, अमोल चव्हाण, डॉ. सुनीता पोटे, स्वप्नाली जामदार आणि चारुशीला कोळपकर यांनी या घडामोडींबाबत नाराजी व्यक्त केली. सर्वांना सोबत घेऊन कारभार करण्याची आपली तयारी असताना भाजपच्या पाठिंब्याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना देण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com