Pimpri News : लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपबरोबर महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविली. महाराष्ट्रात भाजपचे नऊ खासदार निवडून आले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सात खासदार विजयी झाले. मात्र असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या शिंदे गटाची केवळ एकाच केंद्रीय राज्यमंत्रिपदावर बोळवण करण्यात आल्याने शिंदे यांच्या खासदारांमध्ये नाराजी पसरली आहे. मंत्रीपदे देताना दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
खासदार बारणे यांनी प्रसारमाध्यमांसमोरच आपल्या मनातील सल बोलून दाखविल्याने महायुतीमधील घटक पक्षातील खदखद चव्हाट्यावर आली आहे. महायुतीत सहभागी असलेल्या भारतीय जनता पक्षाने मंत्रीपदे देताना शिवसेनेबरोबर दुजाभाव केला असल्याचा आरोप बारणे यांनी केला. बारणे म्हणाले, आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता,आम्हाला कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होतं. पण एक राज्यमंत्रीपद आम्हाला देण्यात आले.
एनडीए मधील इतर घटक पक्षांचे केवळ एक-एक खासदार निवडून आलेत, मात्र त्यांना भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रिपदे दिली. मग फक्त शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असा प्रश्न श्रीरंग बारणे यांनी विचारला आहे. शिवसेना शिंदे गटाने भाजपबरोबर महाराष्ट्रात एकत्रितपणे निवडणूक लढविली होती. यामध्ये सात जागांवर शिवसेनाला विजय मिळाला. तर भाजपचे नऊ खासदार निवडून आले. त्यामुळे भाजपने आम्हाला न्याय देण्याची भूमिका ठेवली पाहिजे होती. तीन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका येत आहेत. या निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने शिवसेनेला न्याय देणे गरजेचे होते, असेही बारणे म्हणाले.
विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर असताना भाजपने शिवसेना शिंदे गटाला एक केंद्रीय मंत्रिपद आणि एक राज्य मंत्रिपद देणे गरजेचेच होते. मात्र हे झाले नाही. मोदी सरकारमध्ये भाजपचे 61 मंत्री आहेत. तर घटक पक्षांचे 11 मंत्री आहेत. ही न्यायिक भूमिका महाराष्ट्राला द्यायला हवी होती. विस्तारापूर्वीच याचा विचार करायला पाहिजे होता. भाजपने जो दुजाभाव केला आहे. त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाच्या सर्व खासदारांनी आपली नाराजी बोलून दाखविली आहे.
राज्यात सत्तापरिवर्तन होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने ठोस भूमिका घेतली होती.कुटूंबाच्या विरोधात जाऊन अजित पवार महायुतीत सहभागी झाले. निवडणुकीत आपल्याच घरातील व्यक्तींशी त्यांनी संघर्ष केला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात अजित पवारांना (Ajit Pawar) देखील एक केंद्रीय मंत्रिपद भाजपने द्यायला हवे होते. तसेच साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंना यांना देखील मंत्रिपद द्यायला हवे होते, असे म्हणत खासदार बारणेंनी आपल्या मनातील सगळी खदखद प्रसारमाध्यमांसमोरच बोलून दाखवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.