Shivajirao Adhalrao Patil News : खूप वर्षे आम्ही भावासारखे राहिल्याने, केवळ राजकारणासाठी दूर होणे खुपच कठीण गेले. दोघांनाही ते स्वीकारणे अवघड गेले. याच अनुषंगाने आम्ही वेगळे झाल्यावर भेटल्याचा आणि गळ्यात पडून रडल्याचा प्रसंग खरा आहे. मात्र, तो मंचरच्या बाजारातील नसून ते ठिकाण मुंबई होते. त्या काळात आम्ही मुंबईत नियमीत भेटत होतो, असा खुलासा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी केला.
आढळराव पाटील यांनी नुकतीच 'सरकारनामा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी ते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांच्या मैत्रीबद्दल भरभरुन बोलले. राजकारणापलिकडचा जिव्हाळा, बंधूत्व, स्नेह याचा नाजुक धागा त्यांनी प्रथमच 'सरकारनामा'शी बोलताना उघड केला. हे बोलताना आढळराव तसे काहीसे भावूकही झाले होते. मात्र, तरीही स्वत:ला सावरुन त्यांनी दोघांच्या मैत्रीबद्दल खुलासेवार गप्पा मारल्या.
सन २००३ पूर्वीपासून शिवाजीराव आढळराव-पाटील व दिलीप वळसे-पाटील यांच्या मैत्रीबद्दल मुंबई-दिल्लीतील अनेक व्यासपीठांवर चर्चा असते. वळसे-पाटील यांच्या पत्रकार परिषदांपासून ते अगदी सर्व इव्हेंट नियोजनही आढळरावांकडून केले जात होते, असे बोलले जाते. त्याच अनुषंगाने त्यांना बोलते केले असता ते अगदी जुन्या स्मृतींमध्ये रंगून गेले.
आढळराव पाटील म्हणाले, मी २००३ पूर्वीपासून माझ्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वर्तुळात चांगलाच वावरत होतो. त्यामुळे वळसे-पाटील यांच्याबरोबरच मलाही लोक लोकसभेत जाण्यासाठी सल्ले देत. मात्र, मी उद्योग व्यवसायातला माणूस असल्याने मी हे सर्व जाणीवपूर्वक टाळत असतो. मात्र, लोकसभा-२००४ निवडणुकीपूर्वी चार महिने मी, दिलीप वळसे पाटील व शरद पवार साहेब तब्बल आठ दिवस न्यूयॉर्कमध्ये एकाच हॉटेलमध्ये राहिलो, असताना पवारसाहेबांनीच मला लोकसभेबद्दल विचारणा केली.
मी त्यावेळी होकारही दिला. मात्र, पुढे मला वळसे पाटलांकडून आणि एकूणच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून ज्या पध्दतीने प्रतिसाद मिळायला हवा होता तसा मिळाला नाही, अन् मीही अशा विचित्र राजकारणाने व्यथित झालो. मात्र, माझी पूर्ण मानसिकता लोकसभा निवडणुकीत उतरण्याची झाल्याने मी थेट शिवसेनेकडू लोकसभा निवडणुकीत उतरलो आणि त्याच स्फूर्तीने मी खासदारकीची हॅट्रीक केली.
भिमाशंकर कारखाना माझ्यासाठी भावनिक विषय....!
भिमाशंकर साखर कारखाना उभा करण्यासाठी मी जेवढे काम केले ते संपूर्ण आंबेगाव तालुका जाणतो. कारण मी मुंबईत माझे व्यवसाय संभाळून इथे दिवस-रात्र काम करुन, रात्री गाडीत झोपुन पुन्हा सकाळी कारखाना उभारणीसाठी काम करीत होतो. सामान्य शेतकऱ्यांसाठीची ती सेवा असल्याने मी खूप मनापासून ती केली. पुढे कारखान्याचे अध्यक्ष होण्याचा आग्रहही वळसे-पाटलांचाच होता. पर्यायाने जी संस्था मी उभी केली, त्या संस्थेबाबत मी अतिशय भावनिक आहेत. पर्यायाने भिमाशंकर कारखान्याच्या बाबतीत मी कधी द्वेषाचे राजकारण म्हणून काम केले नाही की, भविष्यातही मी करणार नाही, असे ही आढळराव पाटील म्हणाले.
शिवनेर आणि परागच्या साखर कारखान्याचा असा केला खुलासा....!
शिवनेर म्हणून खाजगी साखर कारखना उभा करण्यासाठी आपण खूप प्रयत्न केला. मात्र, तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अगदी कारखाना मंजुर लायसेन्सही माझ्या हातात मिळू नये, म्हणून जो प्रयत्न झाला आणि त्यात ते यशस्वी झाले तिथेच आपण शिवनेरचा प्रयत्न सोडला आणि पुढे त्याच ठिकाणी त्यांचा पराग सुरू झाला. आता तर खाजगी साखर कारखान्याला पूर्वी इतका स्कोप नसल्याने आपण त्यात आता पडणार नसल्याचेही आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
आम्ही आजही एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतो!
मी आणि दिपील वळसे पाटील यांनी अनेक वर्ष एक काम केले. त्यामुळे आम्ही आजही एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतो. एकमेकांच्या वैयक्तिक-कौटुंबीक अडी-अडचणींमध्ये सोबत राहतो. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते. कारण ती दोघांच्याही स्वतंत्र विचारधारेची लढाई आहे. ती दोघांच्या ठिकाणी ती तिथेच राहणार, असे म्हणताना आढळराव यांच्या आवाजात वाढलेली कातर वळसे-आढळरावांमधील भावनिक-मैत्रीबंधातील अनेक दालने उघडून दाखविणारीही होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.