पुणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला (Shivsena) पुण्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पुण्यातील नेते व माजी शहरप्रमुख शाम देशपांडे (Sham Deshpande) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बीकेसीतील सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्यानं नाराज होऊन देशपांडेंनी पक्ष सोडला आहे.
शाम देशपांडे यांनी म्हटलं आहे की, शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानं अनेक शिवसैनिकांना दु:ख झालं. त्यातच उद्धव ठाकरेंनी संघावर टीका केल्याने आम्हाला क्लेश होत आहे. संघ हा भाजपच्या आधीपासून होता. त्यामुळे संघाला राजकारणात ओढण्याची आवश्यकता नव्हती, असं माझं प्रामाणिक मत आहे. संघाला अशा प्रकारे राजकारणात ओढून उद्धव ठाकरेंनी बेगडी धर्मनिरपेक्षतेचा पदर धरला, अशी माझी भावना आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी संघाच्या आक्रमक हिंदुत्वाला योग्य दिशा दिली. ती दिशा आता भरकटलेली दिसत आहे. संघावर टीका करुन उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची री ओढली आहे. त्यामुळं आजपासून शिवसेनेचं काम थांबवत आहे, असंही देशपांडेंनी म्हटलं आहे. दरम्यान, शाम देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावेळी स्वागताचे बॅनर लावले होते. त्यावेळीच ते शिवसेना सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे.
शाम देशपांडे हा १९७२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. नंतर ते शिवसेनेत गेले होते. देशपांडे हे पुणे महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक होते. ते शिवसेनेकडून कोथरूडमधून निवडून आले होते. ते २०००-२०१२ या कालावधीत नगरसेवक होते तर २००८-०९ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी बराच काळ शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.