Pune News : पुणे महापालिकेत गेली पाच वर्षे भाजपची सत्ता होती. तसेच भाजपच्या तत्कालीन नगरसेविका वर्षा तापकीर यांनी त्यांच्या प्रभागात श्रीरामाचे शिल्प उभारण्यासाठी प्रस्ताव मांडून तो स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करून त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करून दिला होता. असे असताना पुण्यात प्रभू श्रीरामाचे पहिले शिल्प उभारण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे. शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या प्रयत्नातून हांडेवाडी येथील श्रीराम चौकात हे शिल्प उभारले जाणार आहे. येत्या दोन डिसेंबरला या शिल्पाचा पायाभरणी कार्यक्रम होणार आहे.
प्रभू श्रीरामाच्या नावाने गेल्या काही वर्षांपासून जोरदार राजकारण सुरू आहे. निवडणुकांच्या काळात श्रीरामांचे नाव घेत विविध राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेतात. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर रामजन्मभूमी अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे काम पूर्ण होऊन ते भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरावरून राजकारण तापत आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जाताना अयोध्येत उभारण्यात आलेले श्रीराम मंदिर हा भाजपचा निवडणुकीचा प्रमुख अजेंडा असणार आहे. ( Pune News )
पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. पालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक होते. त्यातील एक नगरसेविका वर्षा तापकीर यांनी धनकवडी-आंबेगाव पठार (प्रभाग क्र ३८) येथील आंबेगाव पठारमधील मोकळ्या जागेत असलेल्या क्रीडांगणामध्ये प्रभू श्रीरामाचे भव्य शिल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. तापकीर यांचा हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी आल्यानंतर काही सभासदांनी त्याला आक्षेप घेत क्रीडांगणामध्ये हे शिल्प उभारू नये, असा विरोधदेखील केला होता. मात्र, पालिकेत भाजपचे संख्याबळ असल्याने स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय मान्य करून त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला होता. स्थायी समितीनंतर हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत (जीबी) गेला. मात्र, त्यानंतर पालिकेच्या सभासदांची मुदत संपुष्टात येऊन पालिका आयुक्तांनी प्रशासक म्हणून कारभार सुरू केला. त्यानंतर हा प्रस्ताव तिथेच असल्याचे वर्षा तापकीर यांनी सांगितले.
शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी २०१८ मध्ये महापालिकेकडे हांडेवाडी भागात प्रभू श्रीरामाचे शिल्प उभारण्याची मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला होता. या पूर्णाकृती शिल्पाचा संपूर्ण खर्च दशरथ बळीबा भानगिरे ट्रस्ट यांच्याकडून करण्यात येणार होता. हा प्रस्ताव जीबीने मान्य करून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला होता. आता नगरविकास खाते तसेच पोलिस महासंचालक कार्यालयाने हे शिल्प बसविण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे हे शिल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे भानगिरे यांनी "सरकारनामा"शी बोलताना सांगितले.
यांच्या उपस्थितीत होणार पायाभरणी समारंभ
पुण्यात उभारण्यात येणारे श्रीरामाचे पूर्णाकृती शिल्प हे देशातील पहिले शिल्प असणार आहे, असा दावा भानगिरे यांनी केला आहे. २ डिसेंबरला याचा पायाभरणी समारंभ होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी खासदार, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव-पाटील, शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले हे उपस्थित राहणार आहेत.
Edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.