Maval Lok Sabha Election 2024 : मावळ लोकसभेला महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) नकोच अशी ताठर भूमिका मावळ तालुका भाजपने घेत तिथे माजी मंत्री बाळा भेगडे यांना तिकीट देण्याची जोरदार मागणी शनिवारी (ता.१६) केली होती. बारणेंना तिकीट दिले, तर नोटाचे बटण दाबू, पण त्यांचे काम करणार नाही, असा बंडाचा पवित्रा त्यावेळी मावळ `भाजयुमो`ने घेतला होता. मात्र, हे बंड काही तासात शमलं नाही, तर शमविलं गेलं. त्यामुळे ते पेल्यातील वादळ ठरलं आहे.
दरम्यान, मावळलगतच्या (Maval) शिरूर मतदारसंघात आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) विरोधात युतीकडे (राष्ट्रवादी) सक्षम पर्याय नसल्याने त्यांनी तिथे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांची घरवापसी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तशीच काहीशी स्थिती मावळात युतीची आहे. तिथे निवडून येईल असा बारणेंशिवाय (Shrirang Barne) दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही. दुसरीकडे केंद्रातील सत्तेची आणि मोदींच्या पंतप्रधानपदाची हॅटट्रिक करण्यासाठी भाजपला एकेक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे पर्याय नसल्याने त्यांनी मावळात बारणेंना खासदारकीची हॅटट्रिक करण्याची संधी दिली आहे. ती आपल्यालाच मिळेल याची ठाम खात्री असल्याने बारणेंनी आपली उमेदवारी आधीच जाहीर केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मावळात आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेचे संजोग वाघेरे-पाटील यांचे नाव निश्चित झाल्याने तिथे दोन्ही शिवसेनेतच लढत होणार आहे. कारण युतीचे उमेदवार म्हणून तेथे शिंदे शिवसेनेच्या बारणेंच्या नावाची घोषणाच काय ती बाकी आहे. ती आज वा उद्या होऊ शकते. त्यातून तिथे राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनील शेळके आणि मावळ भाजपने केलेला दावा मागे घ्यावा लागणार आहे.
मतदारसंघात शिवसेनेपेक्षा भाजपची (BJP) ताकद कितीतरी जास्त असल्याने ही जागा पक्षाने घेऊन तेथे बाळा भेगडेंना तिकीट देण्याची जोरदार मागणी मावळ तालुका भाजपने परवा भेगडेंच्या निवासस्थानी केली होती. त्यावेळी जर बारणेंना उमेदवारी दिली, तर नोटाचे बदण दाबू, पण त्यांचे काम करणार नाही, असा बंडाचा पवित्रा भाजयुमोचे मावळ तालुका अध्यक्ष नितीन मराठे यांनी घेतला होता. तसेच त्यासाठी शिष्टमंडळ लगेच मुंबईला देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना भेटण्यासाठी नेण्याचे ठरले होते.
परंतु, त्यानंतर लगेचच पक्षाचे जिल्हाध्यक्ष (मावळ) शरद बुट्टे पाटील मावळात धावले. त्यांनी बंडाच्या पावित्र्यातील पदाधिकाऱ्यांची समजूत काढली. युती धर्म पाळण्याचा आदेश दिला. जो उमेदवार दिला जाईल, त्याचे काम करावे लागेल, असं त्यांनी या वेळी सांगितले. तसेच कुणीही वैयक्तिक टीकाटिप्पणी करू नये, असेही बजावले. ही बाब त्यांनी बावनकुळेंच्या कानावर घातल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांचे बंड क्षणात थंड झालं.
(Edited By - Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.