Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सरकारी कार्यालयांना अचानक व्हिझीट देण्याची, कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना दरडावण्याची स्टाईल तुम्हाला स्टाईल संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील बारामती दौऱ्यावर असताना अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता ताफा बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाकडे वळवला. बारामती रुग्णालयाला अचानक भेट देत त्यांनी तेथील कारभाराची झाडाझडती घेतली. यावेळी रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि अस्वच्छता पाहून त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
जागोजागी अस्वच्छता; कर्मचाऱ्यांची कानउघाडणी
रुग्णालयातील वॉर्ड आणि नर्सिंग स्टेशनची पाहणी करताना सुनेत्रा पवार यांना अनेक ठिकाणी दुरावस्था आणि कचरा दिसला. रुग्णालयातील निष्काळजीपणा पाहून त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले.
कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या, "आताच्या आता हे सगळं साफ झालं पाहिजे, तुम्ही कामाला लागा. मला इथे कसलंही चुकीचं दिसलं नाही पाहिजे. कचऱ्यामध्ये हे सगळं टाकायला त्रास होतोय का? जास्त काम आहे का तुम्हाला? मग ही कसली स्वच्छता? कशाला स्वच्छता म्हणतात?"
पुढे वॉर्डमधील कपाटांची झालेली दुरावस्था आणि अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू पाहून त्यांनी "दिवसभर काय करता तुम्ही? फक्त मोबाईलवर असता? फक्त मोबाईलवर... ही उशी इथे, ती उशी तिथे... हे औषधं आणि हे काय आहे सगळं? याला स्वच्छता म्हणतात का? कशाची स्वच्छता म्हणता तुम्ही याला? काय नाव आहे तुमचं? यांचे नाव लिहून घ्या आधी!" या शब्दांत तेथील कर्मचाऱ्याला ठणकावलं.
रुग्ण आणि नातेवाईकांशी संवाद
या अचानक दिलेल्या भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयातील विविध विभागांना भेटी दिल्या. त्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छतेची स्थिती, औषधांचा पुरवठा तसेच एकूण व्यवस्थापनाची माहिती घेतली. केवळ अधिकाऱ्यांकडून माहिती न घेता, त्यांनी प्रत्यक्ष रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
प्रशासनाला निर्देश
कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देत त्यांनी जबाबदारीने व तत्परतेने काम करण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालय परिसरात चोख स्वच्छता राखण्याबाबत त्यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले. आरोग्य सेवांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाव्यात, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच इथून पुढे असा निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला. या सर्व घडामोडींमुळे बारामतीकरांना सुनेत्रा पवार यांच्यात अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण झाल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.