Pune LokSabha Constituency : सुनील देवधर पुणेकरांच्या पसंतीस उतरणार?

Lok Sabha Election 2024 : देवधर यांना 2013 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत दक्षिण दिल्लीची जबाबदारी देण्यात आली होती. या ठिकाणी भाजपने 10 पैकी सात जागा जिंकल्या.
Sunil Deodhar
Sunil Deodhar Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : लोकसभेची निवडणूक जवळ आल्याने पुणे लोकसभा मतदारसंघात अनेक उमेदवार इच्छुक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचेही नाव आघाडीवर आहे. सुनील देवधर हे गृहमंत्री अमित शाह यांचे निकवर्तीय समजले जातात. त्रिपुरामध्ये २५ वर्षांपासूनच्या डाव्यांच्या प्रभावाला खिंडार पाडून तेथे भाजपला यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

ईशान्य भारतात सुनील देवधर हे संघाचे प्रचारक होते. 1994 मध्ये ते शिलाँगचे प्रचारक झाले. ते 2002 पर्यंत प्रचारक होते. देवधर यांची एनजीओ ईशान्य भारतातील 65 शहरांत काम करते. नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले होते तेव्हा त्यांनी ईशान्य भारताच्या संपर्क सेलचा कॉन्सेप्ट पेपर बनवला होता. त्यानंतर 2009 मध्ये त्यांना राष्ट्रीय संयोजक बनवण्यात आले होते. तेव्हापासून खऱ्या अर्थाने त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

देवधर यांना 2013 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत दक्षिण दिल्लीची जबाबदारी देण्यात आली होती. या ठिकाणी भाजपने 10 पैकी सात जागा जिंकल्या. 2014 मध्ये तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांना पालघरची जबाबदारी दिली होती. या ठिकाणी सीपीएमची एकमेव जागा होती. या ठिकाणी भाजपचा विजय झाला. त्यानंतर अमित शाहांनी त्यांना ईशान्य भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला. तेथे त्यांनी तरुणांवर लक्ष दिले. भाजपच्या मोठ्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता. (Pune LokSabha Constituency)

Sunil Deodhar
Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर शहराध्यक्ष घाटेंचं मोठं विधान, म्हणाले...

नाव (Name)

सुनील विश्वनाथ देवधर

जन्मतारीख (Birth date)

29 सप्टेंबर 1965

शिक्षण (Education)

एम.एस्सी., बी.एड.

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

सुनील देवधर हे अविवाहित आहेत. पुण्यातील नारायण पेठेत मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वि. ना. देवधर हे पत्रकार, तर मातोश्री अपर्णा वि. देवधर या शिक्षिका. सीए आनंद देवधर आणि सेवानिवृत्त झालेले आनंद देवधर हे त्यांचे मोठे बंधू आहेत

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

शिक्षक

लोकसभा मतदारसंघ कोणता? (LokSabha Constituency)

पुणे

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

भाजप

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

सुरुवातीच्या काळात ईशान्य भारतात सुनील देवधर (Sunil Deodhar) हे संघाचे प्रचारक होते. 1994 मध्ये ते शिलाँगचे प्रचारक होते. त्यांनी 2002 पर्यंत प्रचारक म्हणून काम केले. त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2013 पर्यंत त्यांनी ‘पूर्वोत्तर भारत संपर्क प्रकोष्ठ’चे राष्ट्रीय संयोजक म्हणून काम पाहिले. त्यासोबतच 2011 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली मेघालय, नागालँड, आसाम, मणिपूर, गोवा या राज्यांच्या निवडणुकांसाठी पक्षाचे व्हिजन डॉक्युमेंटस तयार करण्याचे काम केले. 2012 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत दाहोद जिल्ह्याच्या सहा मतदारसंघांत सहा महिने विस्तारक म्हणून जबाबदारी पार पाडली. 2013 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत 10 मतदारसंघांचे संघटक म्हणून काम पाहिले. या मतदारसंघांत पक्षाला विजय मिळाला.

2014 मध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) निवडणूक लढवत असताना प्रचाराची धुरा सुनील ओझा व सुनील देवधर या दोघांवर सोपवण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. त्याच वर्षी त्रिपुराचे प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पक्ष अत्यंत कमकुवत स्थितीत असताना अनेक प्रयोग व उपक्रम, कार्यक्रम, आंदोलने केली. 2018 मध्ये त्रिपुरातील 25 वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून टाकत तेथे तीन चतुर्थांश बहुमताने भाजपचे सरकार आणण्यात देवधर यांनी मोठी भूमिका बजावली. त्रिपुरा येथील विजयानंतर सुनील देवधर यांची खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेता म्हणून ओळख निर्माण झाली. 2018 पासून भाजपचे राष्ट्रीय सचिव व आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. आंध्र प्रदेशसारख्या कठीण राज्यात तेलुगू भाषा शिकून तळागाळापासून संघटन उभे करण्यात यश मिळवले. कोविडच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन सुरू असताना त्यांनी सलग दोन हजार किलोमीटर प्रवास केला. 30 जुलै 2023 पासून सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त होत ते पुण्यात सक्रिय झाले आहेत.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

1999-2001 या काळात सुरुवातीला नगर जिल्हा आणि मग पुणे विभाग प्रचारक म्हणून त्यांनी काम केले. 2001-02 मध्ये मुंबईत गोरेगाव विभागाचे ते प्रचारक होते. 2005 मध्ये ईशान्येत माय होम इंडिया या संस्थेची स्थापना केली. 1985 मध्ये संघाचे सक्रिय काम सुरू केले. झोपडपट्टीतील मुलांसाठी शाखा सुरू केली. शाखेला जोडून वाचनालय आणि अभ्यासिका सुरू केली. 1990 मध्ये कारसेवक म्हणून उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये 22 दिवसांचा तुरुंगवास भोगला. 1991 ते 1998 या काळात मेघालयात प्रचारक म्हणून काम करताना शाळा सुरू केल्या. या काळात ईशान्य भारतातील नागरिकांना उर्वरित भारताचे दर्शन घडवण्यासाठी भारत मेरा घर यात्रांची सुरुवात तेली. त्यानंतर तेथून निवडक विद्यार्थी महाराष्ट्रात आणून प्रथम 1995 मध्ये पुणे येथे 10 मुलांचे वसतिगृह सुरू केले आणि मग संपूर्ण महाराष्ट्रात 125 हून अधिक आदिवासी मुला-मुलींची वसतिगृहे सात ठिकाणी सुरू केली. 2004 मधे संघाने स्थापन केलेल्या हिंदू मानवाधिकार मंचचे मुंबई महानगरचे संयोजक म्हणून हिंदू समाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. 2005 मध्ये ‘माय होम इंडिया’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 LokSabha Election)

निवडणूक लढवली नव्हती

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

निवडणूक लढवली नव्हती

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

सुनील देवधर यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या परिसरातील विविध विकासकामांवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या ते नियमित बैठका घेतात. नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात. पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी त्यांची वैयक्तिक ओळख आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

सुनील देवधर हे फेसबुकवर लोकप्रिय व सक्रिय भाजप नेते आहेत. पुणे शहरातील पक्षीय घडामोडी, कार्यक्रमांमधील सहभागाची माहिती, छायाचित्रे दररोज त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केली जातात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

भविष्यात विदेशी पर्यटक भारताला ताजमहालच्या नव्हे, तर राममंदिराच्या नावाने ओळखतील, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

सुनील देवधर हे उच्चशिक्षित असून, त्यांचे हिंदी, इंग्रजीसह एकूण 10 भाषांवर प्रभुत्व आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले, ग्राऊंड लेव्हलवर कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांचे वक्तृत्व उत्कृष्ट असून, जनसंपर्क व्यापक आहे. दिल्लीमध्ये सरकार, शासनयंत्रणा, मीडिया आदींमध्ये त्यांची चांगली पोहोच आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

सुनील देवधर यांनी आजपर्यंत कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. त्यांना पक्षांतर्गत विरोध होऊ शकतो. जातीय आधारावरही विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे भाजपमधील सर्व गट, निष्ठावंतांना एकत्र आणण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. भाजपची प्रचारयंत्रणा प्रभावीपणे राबवावी लागणार आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

पक्षाकडून जी जबाबदारी मिळेल त्याचे पालन सुनील देवधर करतील. भाजपकडे पुणे लोकसभा मतदारसंघात सुनील देवधर हे तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात. भाजपने दुसरा उमेदवार दिला तरी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन ते करतील. त्यामुळे त्यांच्याकडून बंडखोरी होण्याची शक्यता नाही.

(Edited By Roshan More)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com