

Pune News: दिल्लीत नीट पेपरफुटीवरुन विद्यार्थ्यांच्या आंदोलन सुरु असताना आता टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बिजेंद्र गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. त्याला लवकरच पुणे विमानतळावर आणण्यात येणार आहे.
TET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान ठाणे पोलिसांनी देशातील अनेक राज्यांत व्यापक शोधमोहीम आणि छापेमारी केली होती. मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताच्या मागावर असलेली पोलिसांची विशेष पथके बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे सक्रिय होती. बिहारमधील पटणा आणि समस्तीपूर परिसरातही सखोल शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर दीर्घकाळ पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले.
बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी असलेला बिजेंद्र गुप्ता हा केवळ महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणातच सहभागी नव्हता, तर या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेले तीन आरोपी त्याच्या सांगण्यावरून काम करत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बिजेंद्र गुप्ता गेल्या २५ वर्षांपासून पेपरफुटीचे रॅकेट चालवत असून त्याचे धागेदोरे देशातील अनेक राज्यांतील प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांशी जोडले गेले आहेत.या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांनी अधिक व्यापक केला असून बिहार, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही चौकशी सुरू आहे.
स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक दावा
एका स्टिंग ऑपरेशनमध्ये बिजेंद्र गुप्ताने २०२३ मधील ओडिशा कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा, बिहार लोकसेवा आयोग (BPSC) आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC)यांच्या परीक्षांचे पेपरही फुटवल्याचा दावा केल्याचे समोर आले आहे.
गुप्त माहितीवरून भिवंडी पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र TET पेपरफुटी प्रकरणाचा उलगडा भिवंडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे झाला. दिल्ली आणि हरियाणातील काही व्यक्ती TET परीक्षेचे प्रश्नपत्र विकण्यासाठी मुंबईत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील कोंगाव परिसरात सापळा रचून पोलिसांनीआकाश, राजीव आणि धीरज या तिघांना अटक केली. या कारवाईदरम्यान त्यांच्या ताब्यातून TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे चार संच जप्त करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.