पवारसाहेबांना हार घातल्याचा आनंदाचा तो क्षण आजही डोळ्यासमोर

पवारसाहेबांचे कर्तृत्व हिमालयाएवढे आहे. त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही.
शरद पवार-विशाल तांबे
शरद पवार-विशाल तांबेसरकारनामा
Published on
Updated on

पुणे : ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस.आज ते वयाची ८१ वर्षे पूर्ण करीत आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना पुणे महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, विद्यमान नगरसेवक विशाल तांबे यांनी पवार यांच्यासोबतच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

पवारसाहेबांना मी पहिल्यांदा भेटलो ते वर्ष साधारणपणे १९९२ असावं.पवारसाहेबांचा आणि माझ्या वडिलांचा स्नेह होता.त्यामुळे आमच्या ओतूरच्या संस्थेत पवारसाहेब पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी आमची संस्थाही नवीन होती.त्यावेळी मी सातवीत होतो.पवारसाहेबांविषयी सुरवातीपासूनच आकर्षण होते. साहेब कार्यक्रमाला आल्यानंतर ते मोटारीतून उतरताच त्यांच्या गळ्यात मी हार घातला तो क्षण माझ्यासाठी अतीव आनंदाचा होता. हा आनंदाचा क्षण माझ्या डोळ्यासमोरून आजही जात नाही. पुढं पुण्यात आलो. राजकारणात सक्रिय झालो.या काळात पवारसाहेबांशी अनेवळा संपर्क आला. कितीही घाईत असले तरी भेटल्यानंतर विचारपूस केल्याशिवाय ते पुढे गेल्याचे आठवत नाही.कोणतेही काम घेऊन जा. स्वत: लक्ष घालून ते मार्गी लावण्याची त्यासाठी स्वत: ‘फॉलोअप’ करण्याची त्यांची हातोटी जगावेगळी आहे.आज त्यांचा वाढदिवस या दिवशी त्यांच्या सोबतच्या अनेक आठवणी आहेत.

शरद पवार-विशाल तांबे
गोपीनाथ मुंडे असते तर, युती कायम राहिली असती!

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची गोष्ट आहे.पवारसाहेबांना ‘ईडी’ची नोटीस आली होती. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती.‘ईडी’च्या कार्यालयात जाणार स्वत:हून असल्याचे पवारसाहेबांनी आधीच जाहीर केल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. राज्यभरातील कार्यकर्ते चिडलेले होते. मात्र, पवारसाहेब ईडीच्या कार्यालयात निघण्याच्या काहीवेळ आधी ‘ईडी’ कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला. साहेबांनी येण्याची आवश्‍यकता नसल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले. मुंबईच्या तत्कालिन पोलीस आयुकतांनींही पवारसाहेबांच्या निवासस्थानी येऊन ईडी कार्यालयात न जाण्याची विनंती केली.राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये, म्हणून ही विनंती करण्यात आली. पवारसाहेबांनी पोलिसांची विनंती मान्य करून ईडी कार्यालयात जाण्याचा बेत रद्द केला.

शरद पवार-विशाल तांबे
शरद पवार हे शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार

साहेब पुण्याला यायला निघाले.त्यावेळी मी मुंबईत होतो. माझ्यासोबत पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप होते.साहेबांचा निरोप घेण्यासाठी आम्ही गेलो. त्यावेळी मी पण पुण्याला येतोय असे सांगत साहेबांनी आमची मोटार त्यांच्या ताफ्यात घेण्यास त्यांच्या सोबत असलेल्या पोलिसांना सांगितले. त्यांच्या ताफ्यासोबत आम्ही नवी मुंबईपर्यंत आलो.अचानक मोटारींचा ताफा थांबला. साहबांचे ड्रायव्हर श्री. गामा आमच्या मोटारीजवळ आले. सोहबांनी तुम्हा दोघांना त्यांच्या मोटारीत बसण्यासाठी बोलावल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही उतरून साहेबांच्या मोटारीत बसलो. मोटारीत त्यांच्या सोबत रोहीत पवार होते.मुंबई-पुणे या प्रवासात पुढचे दोन-अडीच तास त्यांच्याशी झालेल्या गप्पा माझ्यासाठी अविस्मरणीय होत्या. साहेबांचा सलगपणे दोन-अडीच तासांचा सहवास लाभणे माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी खरोखरच भाग्याचे होते.

संपूर्ण प्रवासात साहेबांनी एकदाही मोबाईल फोन पाहिला नाही.सलगपणे ते आमच्याशी बोलत होते. आम्ही दोघेही महापालिकेतील पदाधिकारी असल्याने महापालिकेचा कारभार कसा चालतो याबाबत ते आमच्याकडून माहिती घेत होते.महापालिकेचे बजेट कसे तयार होते. इथंपासून त्याचा आमचा सहभाग कसा असतो. प्रभागातील कामे कशी करून घेता, प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागाच्या विकासकामांसाठी साधरणपणे किती बजेट मिळते, अशा साऱ्या गोष्टी ते आमच्याकडून जाणून घेत होते. खंडाळ्याच्या घाटात आल्यानंतर दूर डोंगरावऱ्या पवनचक्क्या त्यांना दिसल्या.१९९० ला मुख्यमंत्री असताना पवनचक्क्या उभ्या करण्याचे धोरण व त्यासंबंधातील परदेशी प्रवासाची माहिती त्यांनी आम्हाला सांगितली.त्यांचे शालेय जीवन तसेच पुण्यात असताना महाविद्यालयीन काळातील अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या.

ओतूरच्या आमच्या संस्थेच्या एका महाविद्यालयाच्या मान्यतेचा विषयासंदर्भाने अशीच एक आठवण आहे. २००४ साली आमच्या एका महाविद्यालयाच्या मान्यतेचा प्रस्ताव केंद्रीय संस्थेकडे काही महिने पडून होता. त्यावर निर्णय होत नव्हता. पाठपुरावा करूनही फारशी प्रगती होत नव्हती. हा विषय पवारसाहेबांच्या कानावर घातला. पवारसाहेब बोलले. मात्र, काहीही हालचाल होईना. काही दिवसानंतर पवारसाहेब पुण्यात आहेत हे पाहून बारामती होस्टेलला पवारसाहेबांना भेटायला गेलो.पुन्हा विषय त्यांच्या कानावर घातला. अजून कसे झाले नाही, असा प्रश्‍न त्यांनी मला विचारला आणि एका कार्यक्रमाला निघालोय, पाहतो असे म्हणत ते माटारीत बसले. मीही तेथून ओतूरला जायला निघालो. साधारणपणे नारायणगावपर्यंत पोचलो असेन.त्याचवेळी दिल्लीच्या संबंधित कार्यालयातून फोन आला तुमचे मान्यतेचे काम पूर्ण झाले आहे. मान्यतेचे पत्र घेऊन जाण्याचा निरोप त्यांनी दिला. कार्यक्रमाला जाताना प्रवासात असतानाही त्यांनी केलेल्या एका फोनमुळे काही महिने लांबलेले महाविद्यालयाच्या काम काही मिनिटात मार्गी लागले.पवारसाहेबांच्या काम करण्याच्या या पद्धतीचे करावे तितके कौतुक कमीच आहे.

पवारसाहेबांचे कर्तृत्व हिमालयाएवढे आहे. त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. त्यांचा सहवास म्हणजे परिसस्पर्श आहे.आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना कोटी-कोटी शुभेच्छा !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com