Pune News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीवरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सत्ताधारी व विरोधकांकडून सोडली जात नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी मीडियाशी बोलताना मोठा दावा केला आहे.
लोकसभेत ज्या जागा अजित पवार (Ajit Pawar) गटाला मिळणार होत्या त्या कुठे मिळाल्या ? नऊ जागांपैकी तुम्हाला चारच जागांवर समाधान मानावे लागले आहे. येत्या काळात महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीची (MVA) सत्ता येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Rohit Pawar News)
दौंड शुगर,अंबालिका कारखाना, जरंडेश्वर शुगर,आयान मल्टी ट्रेड एन.एन.पी नंदुरबार,आयान मल्टी ट्रेड धाराशिव, क्वीन एनर्जी धाराशिव हे कारखाने दादांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यात 80 हजार पर डे क्रशिंग करणारे कारखाने आहेत.हे कारखाने तुमच्या मार्गदर्शनाखाली चालतात की ? हे कारखाने तुमचेच आहेत ? हे एकदा तुम्ही लोकांना सांगावे असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.
बारामती मतदारसंघातील या कारखान्यांवर ईडी आणि सीबीआयने कारवाई केली. यामुळेच इतर कारखान्यावर कारवाई होऊ नये म्हणून तुम्ही भाजपसोबत गेले आहात का ?, खोचक सवाल त्यांनी यावेळी केला. 80 हजारांची कॅपॅसिटी असणाऱ्या कारखान्यांसाठी चार हजार ते साडेचार हजार कोटी रुपये लागले. हे पैसे कुठून आले या खोलात मी जाणार नाही, असे यावेळी रोहित पवार म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ज्या ठिकाणी आम्ही ताईंच्या प्रचाराला गेलेलो आहोत, त्या ठिकाणी या कारखान्यातील 50 कर्मचारी प्रचाराला तुम्ही लावलेली आहेत. ज्या बँका शेतकऱ्यांसाठी आहेत. या बँकातील कर्मचारी तुम्ही प्रचारासाठी वापरणार असाल तर हे योग्य नाही, असेही रोहित पवार म्हणाले.