Pune News : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखं भारतात आणण्यात आली आहेत. ही वाघनखं साताऱ्यामध्ये असून ती सर्वसामान्य नागरिकांना देखील पाहता येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणण्यावरून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
भारतात आणण्यात आलेली ही तीच वाघनखं आहेत, की नाही ज्याचा वापर अफजल खान याचा कोथळा बाहेर काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी केला होता, हे सांगणे अशक्य आहे, असा दावा इतिहास संशोधकांनी केला आहे. त्यामुळे राज्यकर्ते आणि विरोधक यांच्यामध्ये चांगला संघर्ष पेटलेला आहे.
भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी ही वाघनखे आणण्यासाठी परदेश दौरा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भारतात वाघनखे आणली असल्याचे बोलले जात आहे. याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी समाचार घेतला. (Uddhav Thackeray News)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचा महामेळावा पुण्यात शनिवारी झाला. गणेश कला क्रीडा येथे झालेल्या या महामेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. हिंदुत्वाच्या नावाखाली भारतीय जनता पक्ष देशातील नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी ठाकरे यांनी केला.
शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा आरोप भाजपकडून केला जातो, मात्र आजही आम्ही तेच सांगतोय आमचं हिंदुत्व हे साधु संतांच महाराष्ट्राचे हिंदुत्व आहे. मुस्लिम तसेच इतर धर्मांना विरोध करणारे आमचे हिंदुत्व कधीच नव्हतं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ती शिकवण आहे. तीच हिंदुत्वाची शिकवण घेऊन आम्ही पुढे जात असल्याचे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले. महाराजांची वाघनखं भारतात आणल्याचा दावा मंत्री सुधीर मुनगुंटीवार करत आहेत.
यावर बोलताना ठाकरे म्हणाले, मुनगंटीवार म्हणतात की, शिवाजी महाराजांची वाघनखे आणली. त्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता, की नाही माहीत नाही. पण त्या वाघनखांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा होता. ही वाघनखे मुनगंटीवारांनी आणलीत. 'वाघनखं आणि मुनगंटीवार हे कुठं जुळतय का...' अशी विचारणाही ठाकरे यांनी यावेळी केली.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह हे काही दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शाह यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शाहिस्तेखान देखील पुण्यात आला होता. त्यावेळी त्याचे तीन बोटावर निभावले. तो पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. त्याचे काही शहाणपण यांनी घेतला असता तर ते परत पुण्यात आले नसते. पण ते का आले, लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कोणाकोणाच्या अंगावर कुठे कुठे उठले ते पाहण्यासाठी, ते पुण्यात आले होते असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला. अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह देखील काही दिवसांपूर्वी पुण्यात वळवळायला आला होता, अशी टीका ठाकरेंनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.