
Vaishnavi Hagwane case update : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना बावधन पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (23 मे) पहाटेच्या सुमारास स्वारगेट परिसरातून या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. आज सकाळपासून त्यांची चौकशी सुरु आहे. आता औंध रुग्णालयात दोघांची वैद्यकीय चाचणी करून दुपारच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयात सादर केले जाणार आहे.
या दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील ते पोलीस करतील. आत्महत्या करायला प्रवृत्त करणे या गोष्टी महाराष्ट्रात सहन केल्या जाणार नाहीत. त्यांच्यावर कायद्याने जी कडक कारवाई करण्यात येणार आहे ती केली जाईल.
इतकेच नाही तर संबंधित आरोपींना नियमात बसले तर मोक्का लावण्यात येईल, अशीही घोषणा फडणवीस यांनी केली. पण त्यापूर्वी त्यासाठी काय नियम आहेत ते तपासावे लागतील. त्यामुळे आज त्याच्यावर बोलू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुलगी आणि सून यामध्ये फरक करणं हे अतिशय चुकीचं आणि फार वाईट आहे. 21व्या शतकात ही गोष्ट घडते हे दुर्दैव आहे, अशा पद्धतीची वागणूक देणे हे पाप असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना 16 मे (शुक्रवारी) समोर आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मुळशी तालुकाध्यक्ष होता. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय किनार मिळाली. 2023 मध्ये वैष्णवीचे लग्न झाले तेव्हा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारही हजर होते.
अजित पवार यांच्याच हस्ते वैष्णवीचा नवरा शशांक याला फॉर्च्युनर गाडीची चावी देण्यात आली होती. याशिवाय वैष्णवीच्या माहेरकडून 51 तोळे सोने, 7 किलो चांदी आणि कोट्यावधी खर्च करून शाही विवाह सोहळा करून देण्यात आला होता. त्यानंतरही वैष्णवीकडे अनेक विविध चैनी वस्तुंची मागणी करण्यात आल्याचे सांगितले जाते. यासोबतच जमीन घेण्यासाठी 2 कोटींची मागणी सुरु होती. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात यापूर्वी वैष्णवीची सासू. पती शशांक आणि नणंद करिश्मा या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज सकाळी सासू राजेंद्र हगवणे आणि दीर सुशांत हगवणे या दोघांनाही अटक केली आहे. शिवाय करिश्माचा मित्र निलेश चव्हाणलाही अटक केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल्याप्रमाणे जर या सहाही जणांना मकोका लागल्यास ऐतिहासिक गोष्ट ठरणार आहे. कारण मकोका हा संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्या आणि गँगवॉरमधून होणारे गुन्हे यासाठी लावला जातो. मकोका लागल्यास जामीन मिळणे जवळपास अशक्य होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.