Pune By Election Result : चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा ३० हजार मतांनी दणदणीत विजय झाला आहे. या विजयानंतर चिंचवड भाजपने जल्लोष केला नाही. तसेच जगताप कुटुंबियांसह भाजपचे पदाधिकारी स्मृतिस्थळावर जाऊन लक्ष्मण जगताप यांना अभिवादन केले. यावेळी जगताप कुटुंबीय भावूक झाले होते.
यावेळी जगताप कुटुंबातील सदस्यांना लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी लक्ष्मणभाऊंच्या आवडीनिवडी सांगितल्या. ते कुठे जास्त वेळ घालवत याबाबत माहिती देतांना त्यांना अश्रू अनावर झाले.
पत्नी व विजयी उमेदवार अश्विनी जगताप म्हणाल्या, "हा विजय जनतेला, साहेबांना समर्पित करीत आहे. त्यांनी केलेल्या कामांनाच जनतेनी मते दिली आहेत. यातून जनतेचे लक्ष्मणभाऊंवरील प्रेम कायम असल्याचे दिसून येते. साहेबांना घोडस्वारी आवडत होती. त्यांचे गायींवर विशेष प्रेम होते. त्यांना गायीच्या धारा काढायला आवडत होते. त्यांची आठवण कायम राहील."
दिवंगत लक्ष्मण जगतापांची (Laxman Jagtap) मुलगी ऐश्वर्या यांनी स्मृतिस्थळ चिंचवडकरांसाठी शक्तीपीठ असल्याची भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "पप्पांना जाऊन उद्या दोन महिने पूर्ण होत आहेत. त्यांच्या जाण्याने आमच्या आयुष्यात कसोटीचा काळ आला. देवाने एक प्रकारची परीक्षाच घेतली. मात्र त्यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दुःख विसरून निवडणुकीत उतरलो. जनतेनेही आम्हाला कौल दिला. त्यांनी जीवनातील बराचसा काळ शेतात घालवला. ते जनावरांमध्ये रमत होते. समाजसेवा करण्यात त्यांनी हयगय केली नाही. त्यांचे स्मृतिस्थळ आमच्यासाठी शक्तीपीठच आहे."
मुलगा अदित्यने हा विजय ऐतिहासिक असल्याचा सांगितले. अदित्य म्हणाला, "विजयाचा निकाल अधीच माहिती होता. भाऊंच्याप्रति असलेले प्रेम पाहून भरून आले. जनतेने भाऊंची उणीव जाणवू दिली नाही. चिंचवडमध्ये पहिल्यांदा एक महिला आमदार झाल्या आहेत. हा इतिहास आहे. महिलांचे हात बळकट करण्यासाठी आईचे काम असणार आहे. सर्व कार्यकर्ते, भाजपच्या साथीने आईच्या नेतृत्वात भाऊंचे स्वप्ने पूर्ण केली जातील."
यावेळी अदित्यने निवडणुकीचा तणाव नसल्याचे स्पष्ट केले. अदित्य म्हणाला, "पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव स्मार्ट झाले आहे. मात्र इतर काही भागाचा विकास पूर्ण झालेला नाही. तो भागही स्मार्ट करण्यात येणार आहे. प्रथेनुसार निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते. मात्र निवडणूक लागल्याने सव्वा महिन्यात बाहेर पडावे लागले. त्यावेळी दुःख होते पण जनतेच्या प्रेमामुळे निवडणुकीचा तणाव नव्हता."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.