

Pune News: पुण्यातील लोहगडावरुन ढकूलन देत केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या दुसरं-तिसरं कुणी नाही तर त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच तिच्या प्रियकराच्या मदतीनं घडवून आणली होती. केतन अग्रवाल हत्येच्या सतरा दिवसांच्या आत्तापर्यंतच्या पोलिस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. मुलाला न्याय मिळावा यासाठी अग्रवाल कुटुंबानं मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्यासह राष्ट्रपतींनाही साकडं घातलं आहे. यानंतर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केल्यानं याप्रकरणाला धक्कादायक वळण मिळण्याची शक्यता आहे.
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी शुक्रवारी (ता.17 जुलै) पुण्यात पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच या पत्रकार परिषदेत त्यांनी पहिल्यांदाच केतन-सियाच्या लग्न जमवणारी दोन नावं समोर आणली आहेत. एवढ्यावरच न थांबता विशाल अग्रवाल यांनी लग्न जुळवणाऱ्या व्यक्तींवरच हादरवणारे आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत विशाल अग्रवाल म्हणाले, केतनला जाऊन एक महिना होत आहे. त्यापाठोपाठ माझे वडीलही गेलेत. हे खूप मोठं दुःख आहे. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे. न्यायव्यस्थेवर मला पूर्ण विश्वास आहे फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवावं ही आमची प्रमुख मागणी राहणार आहे.
तसेच विशाल अग्रवाल यांना या पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले. त्यांनी मुलगा आणि वडिलांना खांदा देण्याची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं असंही म्हटलं. मला एकच मुलगा होता, तो गेला. केतनचं जाणं हे कधीच भरून निघणार नाही. मी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला असं काळीज पिळवटून टाकणारंही विधानही अग्रवाल यांनी केलं.
ते म्हणाले, केतनचं जाणं हे दुःखं आमच्यासाठी एखाद्या समुद्रापेक्षा मोठं आहे. मी तर माझ्या मुलाचं लग्न करायला निघालो होतो, ते तर झालंच नाही. परंतु, माझ्या घरीच इतकं मोठं दुःखं आलं आहे की, आज माझा मुलगा देखील राहिला नाही आणि माझे वडील देखील राहिले नाहीत. आपला मुलगा आपल्याला म्हातारपणी सांभाळेल, हे प्रत्येक मनुष्य स्वप्न बघतो. पण आता ते काहीच उरलेलं नाही. हे दुःखं मी जिवंत असेपर्यंत तरी कमी होऊ शकणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
तसेच केतन-सिया यांचं लग्न जुळवणाऱ्यांची नावं पहिल्यांदाच विशाल अग्रवाल यांनी जाहीरपणे समोर आणली आहे. ते म्हणाले, नरेंद्र आणि रेणू मित्तल या माझ्या सख्ख्या चुलत मामा आणि मामींनी हे लग्न जमवलं होतं. लग्न जमवताना त्या दोघांनीही मला पूर्ण विश्वास दिला होता की, 'ही मुलगी आमचीच मुलगी समजा. आम्ही तिला लहानपणापासून मोठं केलं आहे. ती खूप संस्कारी आणि चांगली मुलगी असल्याचं सांगितलं होतं.
विशाल अग्रवाल यांनी लग्न जुळवून देणारे मित्तल कुटुंबही या घटनेला जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, मित्तल कुटुंबानं सियाबद्दल आता इतकी खात्री दिल्यानंतर आम्ही हे लग्न ठरवलं. मात्र, आता परिस्थिती पाहता, त्यांनाही याबाबत माहिती होती का, असा प्रश्न मला पडतो. न्यायव्यवस्थेवर मला भरोसा आहे. याबाबत तपास होईल. पण लग्न जुळवून देणारे मित्तल कुटुंबही जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच ज्यादिवशी सियानं तिचा प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीनं लोहगडावर केतनचं हत्याकांड घडवलं. त्यादिवसांपासून या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती सिया आणि चेतनबाबत दिवसागणिक नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आतातर ते दोघे फ्री सेक्स ग्रुपही चालवत असल्याची माहिती तपासात समोर आल्याची चर्चा आहे.
माझी व्यथा मांडण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पत्र लिहिलं आहे. लिहिलेल्या पत्राचं उत्तर मिळालेलं नाही. याप्रकरणी सर्व बाजुंनी पोलिसांनी तपास करावा. माझ्यासोबत जे झालं, ते कुठल्याही वडिलांसोबत होऊ नये. 26 वर्षांचा मुलगा गेला, माझं दुःख खूप मोठं आहे. अजून एक केतन जाऊ नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.