शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे जिल्हा परिषद, पंचायत समित्या व साखर कारखान्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजण्याच्या तयारीत असतानाच उद्या बुधवारी (ता. १० नोव्हेंबर) जिल्ह्यात पीएमआरडीए सदस्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाआघाडी विरोध भारतीय जनता पक्ष असा रणसंग्राम पहायला मिळणार आहे. या निवडणुकीत प्राधान्य पसंतीक्रमाने होणाऱ्या मतदानातून ग्रामीण मतदारसंघातून (सरपंच) सात सदस्य, तर नगरपालिका मतदार संघातून एक निवडला जाणार आहे. (Voting for PMRDA tomorrow : BJP will fight against mahavikas Aagahdi)
जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रांवर नऊ तालुक्यातील सरपंच आणि पंचायत समितीचे सभापती मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे एकुण २१ उमेदवारांमध्ये पसंतीक्रम असल्याने उमेदवारांना चिन्हे दिली नसली तरी भाजप-३, राष्ट्रवादी-६, कॉंग्रेस-३ तर शिवसेनेकडून दोन सरपंच उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरल्याचे संबंधित पक्षांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील सर्व सरपंच व पंचायत समितीचे सभापती असे एकुण ५८१ मतदारांना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतमोजणी व निकाल १२ तारखेला पुण्यात कौन्सिल हॉल येथे जाहीर केला जाणार आहे.
ऐन दिवाळीत पीएमआरडीएची निवडणूक आल्याने तिची फारशी चर्चा झाली नाही. तद्नंतरही या निवडणुकीत मताला दहा हजारांचा भाव फुटल्याची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीसाठी एकुण ५८१ मतदार असून पहिल्या पसंतीची ७७ मते जो उमेदवार मिळवेल, तो विजयी होणार आहे. त्यामुळे ७७ मते कशी मिळतील, याची तजबीज काही उमेदवारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या निवडणुकीत आम्ही उभे केलेले तीनही उमेदवार व अरुण भेगडे हे नगरपालिका मतदार संघातून निवडून येतील, असा विश्वास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव यांनी व्यक्त केला, तर आमचे दोन्हीही उमेदवार निवडून आल्यात जमा आहेत, असा विश्वास शिवसेनेचे माऊली कटके यांनी व्यक्त केला. आम्ही एकुण ६ उमेदवार पीएमआरडीएच्या निवडणुकीत उतरविले असून सहाच्या सहा आणि सातवा नगर पालिका मतदारसंघातील संतोष भेगडे (तळेगाव दाभाडे, ता. मावळ) हाही पीएमआरडीएमध्ये हमखास पोचेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केला.
पीएमआरडीएच्या निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवार : स्वप्नील उंद्रे (मांजरी खुर्द, ता. हवेली), मिनाथ कानगुडे (वारजे, पुणे), वैशाली काळे (पाडळी, ता. खेड), यशवंत गव्हाणे (डिंग्रजवाडी, ता. शिरूर), वैभव गावडे (गाडकवाडी, ता. खेड), अशोक गोगावले (गोगलवाडी, ता. हवेली), संतोष गोरडे (गोसासी, ता. खेड), सुखदेव तापकीर (मुलखेड, ता. मुळशी), प्रमोद दळवी (कोथुर्णे-पवनानगर, ता. मावळ), संदीप नलावडे (निगडे, ता. वेल्हे), मनीषा निवंगुणे (करोडी, ता. वेल्हे), प्रियंका पठारे (मांगदरी, ता. वेल्हे), कुलदीप बोडके (गहुंजे, ता. मावळ), मारुती भडाळे (केतकावळे, ता. पुरंदर), वसंत भसे (सांगुर्डी, ता. खेड), सुनील येवले (डोंगरगाववाडी, ता. मावळ), विठ्ठल शितोळे (कोरेगाव मूळ, ता. हवेली), निकीता सणस (सणसनगर, ता. मुळशी), जितेंद्र साळुंके (सावरदरे ता. भोर), दीपाली हुलावळे (कार्ला, ता. मावळ).
तेव्हा गिरीश बापट काँग्रेस-राष्ट्रवादीला चिमटा काढायचे
पीएमआरडीएची स्थापना १९९५ मध्ये झाली. मात्र, पीएमआरडीएच्या अध्यक्षपदाच्या पक्षीय वादावरुन ही संस्था कार्यन्वित झाली नव्हती. मात्र, फडणवीस सरकारने २०१५ मध्ये उर्जितावस्था देवून स्वत: अध्यक्ष होत पीएमआरडीए कार्यान्वित केली. तिला वाघोली, औंध येथे जागा उपलब्ध करुन दिली व त्याचे अध्यक्षपद तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे सोपवले. अर्थात, पीएमआरडीए अस्तित्वात आल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून काही बोलले गेले की, बापट आवर्जून २००९ ची आठवण करुन दोन्ही पक्षांना चिमटा काढत असत.
पुणे-पिंपरीचे असणार वर्चस्व
बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव हे चार तालुके सोडून जिल्ह्यातील इतर नऊ तालुक्यांतील ८१४ गावांचा समावेश पीएमआरडीमध्ये करण्यात आला आहे. ग्रामीण भागातून सात सदस्य या नऊ तालुक्यांतून निवडले जाणार आहेत. नगरपालिका मतदार संघातून एक, तर पुणे व पिंपरी-चिंचवड या महापालिकांमधून २२ सदस्य निवडले जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.