पिंपरी : मोठा उशीर झालेली पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेची बहूप्रतिक्षीत प्रभाग रचना अखेर मंगळवारी (ता.१) जाहीर झाली. गतवेळच्या चारऐवजी यावेळी तीनचा प्रभाग असल्याने तसेच सदस्यसंख्या १२८ वरून १३९ झाल्याने प्रभागरचनेत बदल होणे स्वाभाविक होते. मात्र, ही प्रभागरचना पालिकेतील विरोधी पक्ष आणि राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) दृष्टीने फायदेशीर असल्याची चर्चा प्रभागरचना प्रसिद्ध होताच ऐकायला मिळाली.
दरम्यान, ही रचना पाहण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईनही मोठी गर्दी झाली. पालिका मुख्यालयासह पालिकेच्या आठ प्रभाग कार्यालयात राजकीय कार्यकर्त्यांनी सकाळपासूननच मोठी गर्दी केली होती. दुसरीकडे पालिकेच्या वेबसाईटवरही त्यामुळे मोठा लोड आल्याने ती क्रॅश होते की काय अशी स्थिती काहीकाळ निर्माण झाली होती.
पिंपरी महापालिकेत प्रभागांना नावे नसल्याने ते नंबरनेच ओळखले जातात. २०१७ ला पालिकेची सदस्यसंख्या १२८ होती. ती यावेळी १३९ वर गेली आहे. गतवेळी ३२ प्रभाग होते. ते यावेळी ४६ झाले आहेत. त्यात ४५ प्रभाग हे तीनचे, तर एक हा चार सदस्यांचा असणार आहे. महापालिकेत पन्नास टक्के महिला आरक्षण आहेत. त्यामुळे १३९ मध्ये ७० नगरसेविका असतील. तर १६ टक्के आरक्षणामुळे सभागृहात एससी तथा अनुसूचित जातीचे २२ आणि तीन टक्क्यामुळे अनुसूचित जमाती तथा एसटीचे तीन नगरसेवक असतील. जेथून ही प्रभागरचना सुरु झाली तो ११४ जागा आयटी क्षेत्र असलेला तळवडेचा पहिलाच प्रभाग शहरात सर्वात मोठा आहे. तेथे ४० हजार ७६७ मतदार आहेत. शहराचे कारभारी भाजपचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांच्या भोसरी मतदारसंघात तो मोडतो. तर, सर्वात लहान प्रभाग हा सांगवीत असून तो शहराचे दुसरे कारभारी भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या चिंचवडमध्ये येतो. शेवटचा ४६ वा चार सदस्यीय प्रभागही सांगवीतच येतो. तेथे ४६ हजार ९७९ मतदार आहेत.
प्रभागरचना जाहीर झाल्यानंतरही निवडणूक लगेचच होईल, याविषयी राजकीय पक्षच सांशक आहेत. तशी चर्चा शिवसेनेच्या गोटातून ऐकायला मिळाली. प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांची नेमणूक होऊन निवडणूक पुढे जाण्याची भीती या गोटातून व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी २००७ चा दाखला देण्यात आला. त्यावेळी प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर एक वर्षानंतर निवडणूक झाली होती, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. दरम्यान, प्रभागरचना प्रसिद्ध झालेल्या आजच्या दिवशी गतवेळी २०१७ ला निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिताही लागली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.