
Pimpri Chinchwad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. मात्र, आता आमदारांच्या अपात्रतेसाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. नार्वेकर यांच्यावर विरोधकांकडून दबाव आणण्याचं काम सुरु असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणणं ही कुठली लोकशाही असा सवाल उपस्थित करत विरोधकांवर हल्लाबोल करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले, विधानसभा अध्यक्षांना घेराव घालू,त्यांना फिरू देणार नाही,चालू देणार नाही असं म्हणणं ही कुठली लोकशाही आहे. तरीही कुणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला,तरी त्याला अध्यक्ष बळी पडणार नाहीत. योग्य तो निर्णय़ ते घेतील. ते वकील असल्याने न्यायालयाने दिलेला रिझोनेबल टाइम काय तो त्यांना कळतो. कुठलेही बेकायदेशीर काम ते करणार नाहीत असंही फडणवीस यावेळी म्हणाले.तसेच विरोधकांची बाजू कमकुवत असल्याने ते हे असे दबावतंत्र वापरत असल्याची टीकाही त्यांनी केली.
दंगली घडवणाऱ्यांना अद्दल घडवणार, फडणवीसांचा इशारा
अकोला आणि नगर या दोन्ही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस अलर्ट असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावाही त्यांनी केला. या दंगलींना काहींची फूस आहे,त्यामागे काही व्यक्ती,संस्था आणि राजकीय शक्ती असून त्या आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहेत, असे ते म्हणाले. मात्र,कुणालाही अशा दंगली घडवू दिल्या जाणार नाहीत,त्यांना सोडणार नाही,जे दंगली घडवताहेत त्यांना अद्दल घडवू,असा इशारा त्यांनी दिला
राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर
कर्नाटकातील भाजपच्या पराजयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय महाराष्ट्रातील भाजपचे कोणी नेते महत्वाचे नाहीत,मोदींशिवाय त्यांना महत्व नाही,असे भाष्य केले होते. ते खोडून काढताना फडणवीसांनी राज ठाकरे यांच्यासाठी हे नेते महत्वाचे नसले,तरी आमच्याकरिता आहेत,असा टोला लगावला.
काय म्हणाले होते संजय राऊत ?
संजय राऊत पुढे म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लंडनमधून मुलाखत देऊन शिवसेनेचे उरलेले १६ आमदार कसे अपात्र होतील यावर प्रवचने देत आहेत. नार्वेकरांच्या पक्षांतराचा इतिहास फार मोठा आहे. पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. पक्षांतराला उत्तेजन देणं हा राहुल नार्वेकरांचा व्यवसाय आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करत नाही. आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं पालन करा असं सांगतो आहे. अन्यथा महाराष्ट्र काय आहे हे आम्हाला दाखवावं लागेल असंही संजय राऊत(Sanjay Raut) यावेळी म्हणाले होते.
''नार्वेकर खरंच वकील असतील, तर...''
ही धमकी नाही. परत म्हणतील धमकी दिली. आम्ही कायद्याचं पालन करा असं सांगतो आहे. पक्षांतराला उत्तेजन देऊन ते लोकशाही आणि स्वातंत्र्याची हत्या करत आहेत. आम्ही ते होऊ देणार नाही. शिवसेनेचे १६ आमदारही आमच्या अखत्यारित येतील आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई करू अशा सुरू असलेल्या भुलथापा बंद करा. नार्वेकर खरंच वकील असतील, तर न्यायालयाचा निर्णय पुन्हा वाचा असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.