

Pune News : पुणे जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीनंतर सर्वांचे लक्ष १८ मार्चला होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीकडे लागले आहे. या दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. उमेदवारांनी आपापल्या समर्थकांसोबत भेटीगाठी, चर्चा आणि जोरदार बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
पण त्याचवेळी हे पद आपल्या तालुक्याला नको अशी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील 5 आमदारांची इच्छा असल्याची माहिती आहे. त्यामुळे या 5 आमदारांच्या अखत्यारितील 7 तालुक्यांमधील इच्छुकांना जोरदार धक्का बसला आहे. भविष्यातील स्पर्धक टाळण्यासाठी आमदारांकडून काळजी घेत असल्याचे बोलले जात आहे.
पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. ७३ सदस्यांच्या सभागृहात पक्षाचे ५१ सदस्य आहेत. महायुतीतील इतर कोणत्याही पक्षाला सोबत न घेता राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत इच्छुक उमेदवारांची नावे समोर येऊ लागली आहेत.
यात 3 टर्मचे जिल्हा परिषद सदस्य दौंडमधील वीरधवल जगदाळे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना स्पर्धक म्हणून दौंडमधून माजी आमदार रमेश थोरात हे त्यांचे चिरंजीव तुषार थोरात यांच्यासाठी आग्रही आहेत. यासाठी ते आमदार आणि जिल्हा बँकेच्या संचालकांकडून समर्थनाची पत्रे मिळवित असल्याचे सांगितले जाते.
याशिवाय बारामतीमधील करण खलाटे, मुळशीतील ज्येष्ठ सदस्य शांताराम इंगवले, भोरमधील विक्रम खुटवड, दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे, माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील या इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. मावळ तालुक्यातून सर्वच्या सर्व जागा जिंकल्याने तिथले सदस्य देखील अध्यक्षपदाची स्वप्न बघत आहेत.
राष्ट्रवादीच्या आमदारांना तालुक्यात पद का नको?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील काही आमदारांना आपल्या मतदारसंघांत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद येऊ नये असे वाटत आहे. आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिल्यास तो नेता आपल्यासाठी भविष्यात स्पर्धक ठरू शकतो, याच भीतीने आमदारांनी आपल्या सदस्यांना पद घेण्याकरता फारसे स्वारस दाखवलेले नाही.
इंदापूर, मावळ, भोर, वेल्हा, मुळशी, शिरूर-हवेली तालुक्यातील सदस्यांना पद न मिळाल्यास दौंड तालुक्याला अध्यक्षपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. दौंडमध्ये राहुल कुल हे भाजप आमदार असल्याने तिथे राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याची गरज आहे. याच विचारातून जगदाळे किंवा थोरात यांना अध्यक्षपद मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.