Pune News, 22 June : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. राज्यात सर्वाधिक 13 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. राज्यभर चांगले यश मिळालेल्या काँग्रेसला पुण्यात मात्र तगडा उमेदवार देऊनदेखील पराभवाचा सामना करावा लागला.
त्यामुळे या पराभवाची कारणमीमांसा व्हावी अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तसेच निवडणूक काळात उमेदवाराला साथ न देणाऱ्या आणि पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीदेखील शहरातील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
राज्यातील बहुतांश मतदारसंघात काँग्रेसने (Congress) चांगली कामगिरी बजावत विजय मिळवला. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात नेमकं काय झालं? याचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) शनिवारी (ता. 22 जून) रोजी पुण्यात येत आहेत. पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवनमध्ये दुपारी 2 वाजता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक होणार आहे.
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा (BJP) पराभव करणाऱ्या काँग्रेसला त्याच विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात मात्र पराभवाचा सामना करावा लागला. इतकंचं नव्हे तर स्वतः आमदार असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळण्याची नामुष्कीही काँग्रेसच्या पदरी आली. या पराभवाची कारणमीमांसा व्हावी, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून होत होती.
काँग्रेस प्रदेश समितीकडून राज्यातील अन्य मतदारसंघांमध्ये जिथे पराभव झाला तिथे कारणमीमांसा करण्यात आली. कामचुकारपणा केला असे आढळल्यावर कारवाई त्या नेते पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
मात्र, असे काही पुणे लोकसभा मतदारसंघात होत नसल्याने पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी कुठेतरी नाराज होते याच पार्श्वभूमीवर आता नाना पटोले यांची ही बैठक होत आहे. त्यामुळे आता काम न करणाऱ्या अनेकांवर कारवाईची टांगती तलवार असणार असल्याचं बोललं जात आहे. तर या बैठकीनंतर पटोले नेमकी काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.