Mahayuti Politics : भाजपसाठी 'बूस्टर', 'बार्गेनिंग पॉवर' वाढणार; काँग्रेस, शिंदे गटाला भानावर येण्याचा संदेश

BJP Shivsena NCP Maharashtra Government : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीत भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जागावाटपात भाजपसमोर नमते घ्यावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तिकडे, महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरलेल्या आणि त्या बळावर दबावतंत्र वाढवलेल्या काँग्रेसलाही महत्वाकांक्षांना मुरड घालावी लागणार आहे.
Mahayuti politics
Mahayuti politicsSarkarnama
Published on
Updated on

सर्वच एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली. त्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. हरियाणा निकालाचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर होईल, असे सरधोपटपणे म्हणता येणार नसले तरी भाजप कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर होईल, नेते आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, हे मात्र निश्चित आहे.

महायुतीत जागावाटप, मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू आहे, तसा तो महाविकास आघाडीतही आहे. विशेष म्हणजे, अद्याप निवडणूक जाहीर झालेली नसतानाही महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा वाद उफाळून आला आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी भानावर यावे, महायुतीत शिंदे गटाने भानावर यावे, असा संदेश हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने दिला आहे. महायुतीत कोणाला किती जागा मिळणार, हा पेच अद्याप सुटलेला नाही. शिंदे गटाने जागावाटपाबाबत ताठर भूमिका घेतली आहे. आता त्यांना नमते घ्यावे लागणार आहे. भाजपची 'बार्गेनिंग पॉवर' निश्चितपणे वाढली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला नमते घ्यावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा 'स्ट्राइक रेट' भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा चांगला होता. याच्या बळावर विधानसभेच्या जास्त जाागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू आहे. 100 पेक्षा कमी जागांवर तडजोड करायची नाही, यावर शिंदे गट ठाम असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले होते. पक्षाचा निर्णय म्हणून त्यांनी त्यावेळी माघार घेतली होती. आता परिस्थिती तशी राहणार नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जागावाटप आणि उमेदवार ठरवताना भाजपचा दबाव सहन करावा लागलेल्या शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र उसळी घेतल्याचे दिसत होते.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे शिंदे गटाला आता सबुरीने घ्यावे लागणार आहे. जागावाटपात भाजपचा शब्द अंतिम राहणार आहे. अजितदादा पवार यांची अवस्था तर शिंदे गटापेक्षा बिकट होण्याची शक्यता आहे. विचारसरणीशी तडजोड करून 2019 मध्ये हरियाणात भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले जेजेपीचे दुष्यंत चौटाला यांनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी भाजपसोबतची युती तोडली होती. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळू शकली नाही. हरियाणाच्या निकालाने दिलेला हा अजितदादा पवार यांच्यासाठीचा संदेश आहे.

Mahayuti politics
Sanjay Raut : हरियाणाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती, CM शिंदेंचा दावा राऊतांनी खोडला; म्हणाले, 'काँग्रेस कमजोरच'

हरियाणाचा निकाल (Haryana Result) महाराष्ट्र भाजपसाठी जणू वरदानच ठरला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर खालावलेला त्यांचा आत्मविश्वास यामुळे वाढणार आहे. वातावरण कितीही विरोधात असले तरी गाफील विरोधकांना आपण हरवू शकतो, सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव करून सत्तेचा सोपान गाठू शकतो, हा हरियाणाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमला दिलेला संदेश आहे. याच्या बळावरच महायुतीत जागावाटप करताना भाजपच्या शब्दाला किंमत येण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास उंचावला होता. महाराष्ट्रात 13 जागा जिंकून काँग्रेस सर्वाच मोठा पक्ष ठरला. निवडणुकीच्या आधी मरणासन्न अवस्थेत असलेल्या काँग्रेससाठी हा मोठा दिलासा होता. मात्र हे काँग्रेसचे निर्भेळ यश नव्हते, याचा नेत्यांना विसर पडला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबाबतीत लोकांमध्ये प्रचंड सहानुभूती होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टाकलेल्या डावपेचांमुळे महायुतीची अडचण झाली होती.

Mahayuti politics
Shiv Sena: शिंदे सेनेची पुण्यात माघार; जिल्ह्यात 'या' दोन जागा लढणार

राज्यव्यापी नेतृत्व नसतानाही या बाबींचा फायदा काँग्रेसला झाला. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याकडे त्यांचे मूळ पक्ष नव्हते, चिन्ह नव्हते आणि बहुतांश आमदार, खासदारही नव्हते. तरीही पवार यांच्या पक्षाला 8 आणि ठाकरे यांना 9 जागा मिळाल्या. वाहत्या गंगेत हात धुवून घेतलेल्या काँग्रेसला याचा विसर पडला आणि महाविकास आघाडीत आपणच मोठे भाऊ, असा त्यांचा तोरा सुरू झाला. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याचे समोर आले होते. शिवसेना ठाकरे गटही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, यासाठी आग्रही आहे.

निवडणूक जाहीर झालेली नाही, जागावाटप झालेले नसताना महाविकास आघाडीत असा उथळपणा सुरू होता. शरद पवार यांनी यावरून नुकतेच नेत्यांचे कान टोचले आहेत. एकजूट होऊन सत्ताधाऱ्यांचा सामना करण्याऐवजी महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचा संदेश त्यामुळे गेला होता. हरियाणात काँग्रेसला पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसला आहे. त्यापासूनही महाराष्ट्रातील काँग्रेसला धडा घ्यायला हवा.

Mahayuti politics
Padmakar Valvi: 'धनगड' महाराष्ट्रात नाही, मग आरक्षणाचा विषय येतो तरी कुठून? वळवी यांचे पडळकरांना प्रत्युत्तर

गेल्या काही दिवसांपासून महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडीत काँग्रेसचे दबावतंत्र सुरू होते. हरियाणा विधानसभा निकालामुळे हे दबावतंत्र संपुष्टात येणार आहे. जागावाटपात आता भाजपचा शब्द अंतिम ठरण्याची शक्यता आहे. भाजप 160 जागा लढवणार, असे सांगितले जात होते. त्यावर आता शिक्कामोर्तब होऊ शकते. उर्वरित जागांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना समाधान मानावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com