नवी दिल्ली : कर्नाटक (Karnataka) विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Assembly Election) काँग्रेस (Congress) पक्षाकडून दोन याद्यांच्या माध्यमातून १६६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दुसऱ्या यादीत जाहीर झालेले नाव आश्चर्यचकीत करणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या पहिला पराभव घडवून आणण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या नेत्याला पक्षाकडून तिकिट देण्यात आले आहे. त्यांच्या उमेदवारीबद्दल काँग्रेस पक्षासह राज्यातील नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Baburao Chinchansur has been announced as a candidate by the Congress from Gurmatkal)
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी काँग्रेसने आघाडी घेत आतापर्यंत दोन याद्यांच्या माध्यमातून १६६ मतदारसंघातील आपले उमेदवार जाहीर करून टाकले आहेत. पहिल्या यादीत १२४, तर दुसऱ्या यादीत ४२ जणांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. या यादीत गुरमटकल मतदारसंघातून ज्यांना उमेदवारी जाहीर झाली, त्याबद्दल काँग्रेससह राज्यातील जनता चकीत झाली आहे.
गुरमटकल मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेले बाबूराव चिंचनसूर यांनी महिनाभरापूर्वीच भारतीय जनता पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्याच गळ्यात काँग्रेसने विधानसभा उमेदवारीची माळ घातली आहे. चिंचनसूर यांचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे खर्गे यांच्या पराभवातील भूमिका. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मल्लिकार्जून खर्गे यांचा आयुष्यातील पहिला राजकीय पराभव होण्यात चिंचनसूर यांची मोठी भूमिका राहिलेली आहे. खर्गे हे गुरमटकल या मतदारसंघातून खर्गे हे सलग आठ वेळा निवडून आले होते. त्याच मतदारसंघात चिंचनसूर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
दरम्यान, पुलिकेशी नगर विधानसभा मतदारसंघाचे तिकीट यावेळीही जाहीर झालेले नाही. विद्यमान आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांना तिकीट देण्यास विरोध आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे नाव पहिल्या यादीत नव्हते. तिकीट जाहीर न झाल्याने त्यांनी जमीर अहमद खान यांच्यामार्फत बरीच लॉबिंग केली होती. मात्र, मूर्ती यांचे नाव दुसऱ्या यादीतही दिसत नाही.
लिंगसुगुरचे विद्यमान आमदार डी. एस. हुलगेरी, हरिहर मतदारसंघाचे विद्यमान आमदार रामाप्पा, कुंदगोळचे विद्यमान आमदार कुसुमा शिवळ्ळी यांच्यासाठी तिकीट जाहीर करण्यात आलेले नाही. सिद्धरामय्या यांनी मागच्या वेळी निवडणूक लढविलेल्या बदामी मतदारसंघातून भीमसेन बी. चिमणकट्टी यांना तिकीट देण्यात आले आहे. शिगावमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात उमेदवारी देण्याचे घाटत असलेले विनय कुलकर्णी यांना धारवाडमधून तिकीट देण्यात आले आहे. कदूर मतदारसंघात वाय. एस. व्ही. दत्ता यांच्याऐवजी आनंद यांना तिकीट देण्यात आल्याने उत्सुकता वाढली आहे.
धजद सोडलेल्या एस. आर. श्रीनिवास यांना गुब्बीमध्ये तिकीट मिळाले. नुकतेच भाजप सोडलेले कुडलीचे आमदार एन. वाय. गोपालकृष्ण यांना मोलकलमुर येथून तिकीट देण्यात आले आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ अभिनेते दोड्डण्णा यांचे जावई के. सी. वीरेंद्र (पप्पी) यांना चित्रदुर्ग विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर झाले आहे. बंगळूरमधील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या पद्मनाभनगरमधून व्ही. रघुनाथ नायडू यांच्यासाठी तिकीट जाहीर करण्यात आले आहे. म्हैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी मतदारसंघातून एमडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष सिद्देगौडा (माविनाहलळ्ळी सिद्देगौडा) यांना उभे केले आहे आणि ते धजद उमेदवार जी. टी. देवेगौडा यांच्याविरुद्ध लढतील.
बागलकोट जिल्ह्यातील चार मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर झाले. बागलकोट मतदारसंघातून एच. वाय. मेटी, बदामी मतदारसंघातून भीमसेन चिम्मनकट्टी, बैरागी मतदारसंघातून जे. टी. पाटील आणि मुधोळ मतदारसंघातून आ. बी. थिम्मापुरा यांना तिकीट दिले आहे.
हुनगुंद आणि जमखंडी मतदारसंघासाठी यापूर्वीच घोषणा करण्यात आली आहे. तेरदळ मतदारसंघासाठी उमाश्रींसह अनेक इच्छुक आहेत. त्यांच्यात एकमत न झाल्यामुळे कोणतीही घोषणा झालेली नाही. चन्नपट्टणम आणि कोलार मतदारसंघात धजदचे एच. डी. कुमारस्वामी यांच्या विरोधात उमेदवार कोण, या प्रश्नाचे उत्तर या यादीत मिळालेले नाही. शिर्सी मतदारसंघासाठी भीमण्णा नायक आणि यल्लापूर मतदारसंघासाठी व्ही. एस. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्पर्धा जास्त असलेल्या कुमठा मतदारसंघासाठी तिकीट निश्चित झालेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.