P. V. Narasimha Rao News : भारत सरकारने देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘भारत रत्न’ने माजी पंतप्रधान पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव ऊर्फ पी. व्ही. नरसिंहराव यांना सन्मानित केले. देशाच्या नवीन आर्थिक धोरणाची पायाभरणी करणारे उच्च विद्याविभूषित नरसिंहराव यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करून त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केंद्र सरकारने केल्याचे मानले जात आहे. अखंड आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेल्या राव यांचे महाराष्ट्राशी एक आणखे नाते होते. त्यांचा महाराष्ट्राशी कायम स्नेह होता. ('Bharat Ratna' p. V. Narasimha Rao what is his connection with Maharashtra...?)
पी. व्ही. नरसिंहराव हे महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या आंध्र प्रदेशातून राष्ट्रीय राजकारणात आले होते. त्यामुळे शेजारी असलेल्या महाराष्ट्राशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. राव यांचे शिक्षण हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठ, तसेच मुंबई आणि नागपूर अशा विद्यापीठांमधून झाले होते. नागपूर विद्यापीठाच्या हिस्लॉप महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली होती.
राव यांना मातृभाषा तेलुगूबरोबरच इंग्लिश, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी या भाषाही अवगत होत्या. त्यातून जेव्हा पहिली जागातिक मराठी परिषद १२ ऑगस्ट १९८९ रोजी मुंबईत भरली होती. त्या परिषदेला उद्घाटक म्हणून पी. व्ही. नरसिंहराव यांना आमंत्रित करण्यात आले होते. पहिल्या जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षस्थानी कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर (तात्यासाहेब) होते. या जागतिक मराठी परिषदेत राव यांनी अस्सखलित मराठीतून भाषण केले होते. त्या भाषणाची चर्चा आजही मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी आवर्जून होत असते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, पी. व्ही. नरसिंहराव यांनी १९५७ ते १९७७ दरम्यान आंध्र प्रदेश विधानसभेत प्रतिनिधित्व केले. राव हे १९६२ ते १९७३ दरम्यान आंध्र प्रदेश मंत्रिमंडळातही होते. १९७१ ते ७३ या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर १९७७ पासून १९९६ पर्यंत सातत्याने लोकसभेवर निवडून आले.
इंदिरा गांधींच्या जवळ असल्याने नरसिंहराव हे दिल्लीत राहूनच आपले राजकारण करायचे. त्यामुळे १९८४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांना आंध्र प्रदेशातील हनामकोंडा मतदारसंघात दगाफटका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यावेळी राजीव गांधी यांच्यापुढे पेच निर्माण झाला होता. कारण गांधी यांना राव हे आपल्यासोबत हवे होते. त्यावेळी चर्चेतून महाराष्ट्रातील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचा पर्याय पुढे आला.
काँग्रेसकडून १९८४ मध्ये नरसिंहराव यांनी विदर्भातील रामटेकमधून अर्ज भरला, तर त्यांच्याविरोधात शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसकडून शंकरराव गेडाम यांना तिकीट देण्यात आले होते. त्या वेळी राव हे १ लाख ८५ हजार ९७२ मताधिक्यांनी निवडून आले आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षणमंत्री झाले.
पुढे १९८९ च्या निवडणुकीत नरसिंहराव यांनी रामटेकमधूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नागपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटीचा त्यांना विरोध होता. बाहेरचा उमेदवार नको, असा तो ठराव होता. ती निवडणूक स्थानिक विरोध बाहेरचा असा झाली हेाती. जनता दलाकडून पांडुरंग हजारे यांनी निवडणूक लढवली होती. त्या चुरशीच्या निवडणुकीत नरसिंहराव हे ३४ हजार ४७० मतांनी जिंकले होते. त्यांनी विदर्भातील रामटेक मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे राव यांचा महाराष्ट्र, मराठी भाषेशी जवळचा संबंध आलेला आहे. महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांतून शिक्षण आणि लोकसभेचे प्रतिनिधित्वही त्यांनी या मराठी भूमीतूनच केले होते.
दरम्यान, नरसिंहराव हे पुढे राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधान झाले. देश आर्थिकदृष्ट्या संक्रमण अवस्थेतून जात होता, त्या वेळी त्यांच्या हाती देशाची सूत्रे आली. रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष, निष्णात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे त्यांनी अर्थ मंत्रालयाचा कारभार सोपवला.
पंतप्रधान नरसिंहराव यांनी त्या काळात अनेक कटू निर्णय घेतले होते. त्यात रुपयांचे अवमूल्यन करणे आणि रासायनिक खतांवरील अनुदान कमी करण्याचा अत्यंत कटू निर्णय त्याकाळी घेतले गेले, त्यामुळेच देशाचा आर्थिक डोलारा सुस्थितीत राहू शकला होता. डॉ. सिंग यांच्या साथीने राव यांनी भारताला नव्या आर्थिक मार्गावर आणण्याचे काम केले होते. त्यांच्या या कार्याचा केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ने देऊन सन्मान केला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.