
ओंकार गोरे, प्रतिनिधी, सरकारनामा
Jayant Patil Vs Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटीलांच्या वडिलांचं नाव घेवून खालच्या पातळीवर टीका केली. यावरून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. पण गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात जो वाद आहे, हा वाद काही आजचा नाही. याला 15 वर्षाचा इतिहास आहे. केवळ एका मंगळसूत्र चोरीच्या आरोपांपासून सुरू झालेला हा वाद आज जयंत पाटील यांच्या वडिलांपर्यंत येवून पोहोचलाय.
नेमका हा वाद काय होता, मंगळसूत्र चोरीचा काय किस्सा आहे, दोघांमध्ये वादाची ठिणगी कुठे पडली? पाहुया सविस्तर...
साधारण 2009 ची गोष्ट आहे. राजकारणात हातपाय मारत असलेले गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांसोबत आटपाटी तालुक्यातील खरसुंडीला एका लग्नाला गेले होते. स्टेजवर जाताना धक्काबुक्कीच निमित्त झालं आणि भांडणं लागली. ज्यांच्यासोबत भांडण झाली त्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत जवळीक होती. त्यांनी कार्यकर्त्यांना उचकावलं आणि दोन्ही गट एकमेकांना भिडले. काही महिला भांडण सोडविण्यासाठी मध्ये आल्या पण भांडणामध्ये त्यांना देखील धक्काबुक्की झाली. यामध्ये एका वृद्ध महिलेला धक्काबुक्की झाली होती.
त्यानंतर 14 एप्रिल 2010 रोजी आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासह 8 जणांविरोधात मंगळसूत्र चोरी आणि मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही तक्रार त्याच वृद्ध महिलेने दिली होती. यात पडळकर यांना अटक देखील झाली होती. न्यायालयात खटला चालला आणि यात पडळकर निर्दोष सुटले. कारण महिलेने गुन्हाच मागे घेतला. पण इथेच जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाची ठिणगी पडली.
हा सगळा प्रकार जयंत पाटील यांची घडवून आणला, असा पडळकर यांचा समज झाला आणि तेव्हापासून जयंत पाटील पडळकर यांच्या डोक्यात गेले ते गेलेच. जयंत पाटील यांनीच संबंधित महिलेला मंगळसुत्र चोरीचा गुन्हा दाखल करण्यात भाग पाडलं होतं. ज्या कार्यकर्त्यांनी भांडणं केली ती देखील जयंत पाटलांची होती, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला होता.
यानंतर काहीच दिवसांत दुसरा प्रसंग घडला. टेंभू योजनेचे पाणी जतला मिळावं, अशी मागणी होती. यासाठी विरोधक उपोषण करणार होते. पण उपोषण करून पाणी थोडीच मिळणार आहे? असं म्हणत पडळकरांनी कराडजवळील करवडीचे टेंभू कार्यालय फोडले. मंत्री असलेल्या जयंत पाटील यांनीच टेंभूचे पाणी इस्लामपूरला वळवल्याचा आरोप पडळकरांनी केला होता.
या दोन्ही घटनांनंतर पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वाद वाढतच गेला. गोपीचंद पडळकर यांनी प्रत्येकवेळी जयंत पाटील यांना टार्गेट केले. खालच्या पातळीवर जावून टीका केली. पण एवढं सगळं होवूनही जयंत पाटील यांनी पडळकर यांना कधीच भाव दिला नाही. पडळकर यांना अदखल पात्र समजून पुढे जाण्याच प्रयत्न करतात. मंगळसुत्र चोराच्या विरोधात मी लढत नाही, अशी भूमिका जयंत पाटील यांनी घेतली होती. पडळकर यांनी याअगोदर केवळ जयंत पाटीलच नाही तर शरद पवार आणि अजित पवार यांना देखील टार्गेट केले होते.
आता काय वाद आहे? गोपीचंद पडळकर यांनी काल जयंत पाटलांवर बोलताना पातळी का सोडली. तर यामागेही 2009 सारखी स्टोरी आहे. जत पंचायत समितीमधील एका ज्युनिअर इंजिनिअरने जीवनयात्रा संपवली, यावरून हा वाद सुरू झाला. या मृत इंजिनिअर तरुणाच्या कुटुंबाने गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप केले. एक आमदार आणि त्याच्या पीएने अभियंत्यावर दबाव आणला होता. त्यांचा छळ केला, त्रास दिला, यातूनच टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप कुटुंबियांनी केला.
पण पुढे चालून गोपीचंद पडळकर यांनी याला राजकीय रंग दिला. या अभियंत्याच्या कुटुंबियांवर जयंत पाटील यांनी दबाव आणून माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात डाव रचलाय, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय. याच घटनेला घेवून गोपीचंद पडळकर यांनी गुरूवारी आंदोलन केले. या आंदोलनात बोलताना जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली. या टीकेमुळे सांगलीच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.