Assembly Election 2024 : विधानसभेची सापशिडी, युतीचे गांगरलेले गडी अन् आघाडीचे खेळाडू मुडी!

Mahayuti Vs Mahavikas Aghadi : अजून विधानसभेचं बिगुलही वाजलं नाही तोच युती - आघाड्यांमधील घटक पक्षांनी आपापल्या बेडक्या फुगवण्याचे प्रकार सुरू केले आहेत. कुणी म्हणतंय, आम्ही 100 जागा लढणार, कुणी 120 तर कुणी 150... जसजसा विधानसभेचा फड रंगत जाईल तसतसे हे आकड्यांचे फुगवटे फुगत जातील.
Devendra Fadnavis | Ajit Pawar |  Eknath Shinde | Sharad Pawar|  Uddhav thackeray | Nana Patole
Devendra Fadnavis | Ajit Pawar | Eknath Shinde | Sharad Pawar| Uddhav thackeray | Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : मागच्या लोकसभेला युतीच्या शिडीच्या आधारे '23' चा आकडा गाठलेला भाजप यंदाच्या लोकसभेला सापशिडीतल्या सर्पानं गिळल्याप्रमाणं थेट '23' वरून '9' आकड्यावर येऊन पोहचला.

मागील विधानसभेच्या आकडेवारीनुसार, भाजप (Bjp) जरी 'शंभरी पार' असला तरी आगामी विधानसभेला पुन्हा एखाद्या सापशिडीतल्या 'त्या' सर्पासारखं कुणी गिळंकृत केलं तर हा आकडा शंभरच्या आत तर येणार नाही ना, अशी भीती भाजपच्या गोटात पसरली आहे.

'फुटलेल्या शिवसेने'ला फुटणार का 'मोहोर'?

मूळ शिवसेनेतून बाहेर पडलेली शिवसेना ( Shivsena ) म्हणजे 'फुटलेली शिवसेना'! कालांतरानं या फुटलेल्या शिवसेनेवर 'मूळ शिवसेना' म्हणून मोहोर उमटली (?) पण तिलाही लोकसभा निवडणुकीच्या मोसमात हवा तसा 'मोहोर' न फुटल्यानं खासदारकीची फळं देखील कमीच लागली. आता विधानसभा निवडणुकीच्या मोसमात तरी या 'फुटलेल्या शिवसेने'ला अपेक्षित 'मोहोर' फुटून जास्तीची फळं लागणार का, याचीच चिंता 'या' शिवसेनेच्या 'फळ'मालकाला लागली आहे.

युतीला नको असलेला पण कसलेला खेळाडू!

राष्ट्रवादीच्या नंबर 'दोन'च्या खेळाडूनं अर्ध्यात साथ सोडली आणि आणि आघाडीची कास सोडून युतीच्या गोटात धूम ठोकली. तितक्यात, लोकसभा लागली आणि 'फुटलेल्या शिवसेने'प्रमाणं 'फुटलेल्या राष्ट्रवादी'ची कंबर मोडली. 'रेड कारपेट' अंथरूण या नव्या खेळाडूचं ज्यांनी थाटामाटात स्वागत केलं त्यांनाच हा खेळाडू आता नको नकोसा वाटू लागला. मात्र, युतीला नको असलेला हा खेळाडू राजकीय सापशिडीच्या खेळात पुरता कसलेला आहे, हे कुणाला नव्यानं सांगायला नको. आता विधानसभेच्या आखाड्यात हा खेळाडू आपले डाव टाकण्यात यशस्वी होणार का? त्यावर तो खेळाडू भविष्यात युतीला हवा की नको याचं उत्तर मिळू शकेल.

मूळ शिवसेना पुन्हा 'मूळ' धरणार का?

मूळची शिवसेना संख्याबळात जरी 'फुटलेल्या शिवसेने'च्या तुलनेत कमी दिसून येत असली तरी 'असली - नकली'च्या खेळाचा निकाल लागायला आता थोडेच दिवस बाकी आहेत. लोकसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून मूळ शिवसेना आपलं मूळ अधिकाधिक घट्ट करत चालली आहे. आगामी विधानसभेला तिची पाळंमुळं किती घट्ट रोवली गेली आहेत याचा उलगडा होऊ शकेल.

Devendra Fadnavis | Ajit Pawar |  Eknath Shinde | Sharad Pawar|  Uddhav thackeray | Nana Patole
BJP Core Committee Meeting : भाजपच्या बैठकीत अजितदादांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेवरून घमासान; नेमकं काय घडलं?

साहेबांची राष्ट्रवादी, आघाडीला मिळवून देणार सत्तेची गादी?

राष्ट्रवादीचा नंबर 'एक'चा खेळाडू म्हणजे कुणालाही भिडण्याची ताकद राखणारा मुरब्बी खेळाडू! पक्ष फुटला, पण हिंमत हरली नाही. लोकसभेत बाजी मारत 'हम अभी मैदान में है,' असा सणसणीत इशारा देत विधानसभेला काय करू शकतो याची झलक दाखवून दिली. साहेबांची ही राष्ट्रवादी आघाडीला सत्तेची गादी मिळवून देणार का? यावर या पक्षाची भिस्त अवलंबून असेल.

काँग्रेसच्या वाळक्या लाकडाला पालवी फुटली, बहर कधी?

सत्तेच्या पाण्यावर कायम टवटवीत राहात आलेली काँग्रेस अचानक वाळून वाळून सुकत चालली होती. पानगळीलाही सुरुवात झाली होती. तितक्यात, लोकसभेला तिला पुन्हा पालवी फुटली आणि हिरमुसलेली काँग्रेस परत एकदा हसताना दिसली. आता हाच आत्मविश्वास विधानसभेपर्यंत टिकून राहिल्यास काँग्रेसला बहर येणार का? याचं उत्तर येणाऱ्या काळात मिळायला हरकत नाही.

'आकडा' टाकला, लागला तर लागला!

युती असो वा आघाडी, दोघांनाही महाराष्ट्राची सत्ता हवी. येन केन प्रकारेनं सत्तेत येण्यासाठी दोन्हींकडून आपापली ताकद दाखवायला सुरुवात झाली आहे. सत्तेच्या या सापशिडीच्या खेळात मुरब्बी राजकीय खेळाडू आपला डाव टाकण्यात मग्न झाले आहेत. दोन्हींकडील घटक पक्षांनी आपल्याला हव्या असलेल्या आकड्यांचा 'आकडा' टाकायला सुरुवात केली आहे. लागला तर लागला, या युक्तीला अनुसरून डावपेच आखले जात आहेत. कुणी 'जो जिंकेल त्याची जागा,' या सूत्राला धरून आपल्या तंबूतल्या 'भिडू'ला डिवचू पाहातोय तर कुणी 'विद्यमान आमदारांना प्रथम प्राधान्य,' असं म्हणत आपल्याच पक्षातील 'उसळीबहाद्दरां'ना थंड करण्याचा प्रयत्न करू पाहतोय.

Devendra Fadnavis | Ajit Pawar |  Eknath Shinde | Sharad Pawar|  Uddhav thackeray | Nana Patole
Assembly Election 2024 : लोकसभेचा पराभव भाजपच्या जिव्हारी, काम न केलेल्या आमदारांबाबत विधानसभेआधी घेणार मोठा निर्णय!

एकूणच काय तर विधानसभेच्या या सापशिडीच्या खेळात सध्या तरी युतीचे गांगरलेले गडी आणि आघाडीचे खेळाडू मुडी, अशी परिस्थिती दिसून येत आहे. आपापल्या पक्षाचे मुखवटे लावून जो तो आपापला आकडा फुगवून सांगत सुटला आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत कुणाचे मुखवटे गळून पडणार आणि कुणाचे फुगवलेले आकडे फुटणार, हे नक्की पाहायला मिळणार.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com