BJP Vs Congress : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी मतदारसंघ म्हणजे राजकारणाची खाण आहे. ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत सर्व ठिकाणी बावनकुळे यांचेच वर्चस्व आहे. त्यामुळे तेथे विरोधक शोधून सापडणार नाही, अशी स्थिती आहे.
नागपूर जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेला मतदारसंघ म्हणजे कामठी. या मतदारसंघाचे २०१९ची निवडणूक वगळता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले कायम वर्चस्व स्थापित केले आहे. त्यामुळेच चंद्रशेखर बावनकुळे यांना चंद्रशेखर बावनकुळेच हरवू शकतात, असे राजकीय जाणकारांचे मत झाले आहे.
कामठी तालुक्यात येरखेडा, महादुला, बिडगाव तरोडी या नगरपंचायती, तर कामठी ही नगर परिषद आहे. मौदा तालुक्यात मौदा नगर पंचायत आहे. तर नागपूर ग्रामीणमधील बेसा-बेलतरोडी, बहादुरा-खरबी त्यांच्याच मतदारसंघात येतात. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. यामुळे त्यांना हरविणे विरोधकांना कठीण झाले आहे. काँग्रेसचे सुरेश भोयर यांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटले, मात्र त्यांचा दोनदा पराभव झाला.
कामठी नगर परिषदेत आतापर्यंत काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि सत्ता येत होती. अनेकदा बावनकुळे यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांचा निभाव लागला नाही. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा माजी नगराध्यक्ष पळवून आणला, त्याला भाजपमध्ये घेतले. कामठीत काँग्रेसला खिळखिळी करण्याचे काम त्यांनी केले. येथे मुस्लिम, बौद्ध आणि दलित मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुस्लिम आणि दलित समाजावर काँग्रेसने आतापर्यंत सत्ता भोगली. यावेळेस मात्र चित्र वेगळे आहे. या दोन्ही घटकांना पालकमंत्री बावनकुळे यांनी आश्वासने देत त्यांना भाजपमध्ये घेतले. अनेकांना संधी दिली. त्यामुळे येथील निकाल वेगळा लागण्याची शक्यता आहे.
येरखेडा नगर पंचायतीची तीच स्थिती आहे. हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला आहे. काँग्रेसने नगराध्यपदासाठी बौद्ध उमेदवार दिला आहे. तर भाजपने हिंदू दलित उमेदवार दिला आहे. मतांचे ध्रुवीकरण करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न येथे असेल, मात्र रिपब्लिकन नेत्या सुलेखा कुंभारे यांनी वेळेवर आक्रमक भूमिका घेतल्याने बावनकुळे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. कामठी नगर परिषदेत ३४ नगरसेवक आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठी नगर परिषद आहे. येरखेड्यामध्ये १७ नगरसेवक आहेत.
महादुला नगरपंचायतीवर यापूर्वी भाजपचा झेंडा होता. गृह नगर पंचायत असल्याने येथे चंद्रशेखर बावनकुळे अधिक सक्रिय राहतील. मात्र, येथे ७० टक्क्यांवर आरक्षण गेल्याने ही नगर पंचायत वादाच्या भोवऱ्यात आहे. बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे येथे अधिक सक्रिय असल्याचे दिसून येते. वरिष्ठ माजी नगरसेवकांना येथे उमेदवारी देण्यात आली नाही. यातून भाजपमध्ये नाराजी असल्याचे दिसून येते.
नागपूर ग्रामीण आणि मौदा तालुक्यात भाजपचे वर्चस्व आहे. मौदा नगर पंचायतीवर यापूर्वी भाजपची सत्ता होती. त्यामुळे यावेळेसही भाजप राहील, अशी व्यूहरचना करण्यात आली आहे. मौदा नगर पंचायतीमध्ये कुणबी आणि तेली समाजाची संख्या भरपूर आहे. सोबत बौद्धांची संख्या आहे. काँग्रेसमधील मोठा नेता भाजपच्या गळाला लागला आहे. प्रसन्ना तिकडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला धक्का दिला. तिथे भाजपला विरोधकच दिसून येत नाही.
नागपूर ग्रामीणमधील पिपळा- बेसा-बेलतरोडी नगर पंचायत नव्याने स्थापन झाली. पिपळा आणि बेसा ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता होती. त्यामुळे या नगर पंचायतीवर भाजपचा नगराध्यक्ष निवडून येईल, असे संकेत आहेत. ही नगरपंचायत अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. काँग्रेस येथे टक्कर देण्याच्या स्थितीत असली तरी निवडणुकीत नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस भाजपसमोर कितपत टिकेल हे सध्या तरी सांगता येत नाही.
बहादुरा-खरबी ही नगर पंचायतसुद्धा नव्याने स्थापन करण्यात आली. मात्र, येथेही भाजपचा सरपंच होता. त्यामुळे नगराध्यक्ष येथे निवडून येईल, असे भाजपला वाटते. मात्र, येथे काँग्रेसने पूजा कापसे यांनी उमेदवारी दिली आहे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दमदार असल्यामुळे येथे भाजपला निवडणूक जड जाईल, असे संकेत आहेत. दुसरीकडे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष गुजरकर हे इच्छुक होते. त्यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल, असे वाटत असताना भाजपने वेळेवर दुसरा उमेदवार दिला आहे. यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. ही नाराजी आतून भाजपला भोवू शकते. नगरसेवक पदासाठी काँग्रेसमध्ये प्रचंड रोष आहे. सामाजिक सलोखा न राखल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना निवडणूक जड जाऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे येथे काँग्रेसचा एकही मोठा नेता सक्रिय नाही.
कामठी तालुक्यातील येरखेडा, बिडगाव आणि नागपूर ग्रामीणमधील बहादुरा, बेसा-पिपळा या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगर पंचायती आहे. या भागात भाजपचा प्रभाव आहे. मात्र, येथे पहिल्यांदा निवडणूक होत असल्याने सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस,भाजपची प्रयत्न करणार आहे. या भागात वंचित बहुजन आघाडी सक्रिय आहे. काँग्रेस आणि वंचितमध्ये आघाडी होण्याची शक्यता होती. मात्र, काँग्रेस स्वतःच अस्तित्वाच्या शोधात असल्याने वंचित सोबत त्यांचे सूत जुळले नाही. काँग्रेस, भाजप आणि वंचित असा थेट सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मात्र, या निवडणुकीत अधिक सक्रिय असल्याचे दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.