Suryakanta Patil News : आधीच संकटात असलेल्या भाजपला सूर्यकांता पाटलांची नाराजी भोवणार?

Bjp Politics News : गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. या दहा वर्षांत राज्यातही बहुतांश काळ भाजपची सत्ता राहिली. असे असतानाही त्यांना कोणतेही मोठे पद, खासदारकी, आमदारकी मिळाली नाही. त्यामुळे नाराज असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.
Suryakanta Patil
Suryakanta PatilSarkarnama

Bjp News : लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यात भर म्हणून पक्षात गेली दहा वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या सूर्यकांता पाटील या भाजपमधून बाहेर पडल्या आहेत. त्यांची नाराजी भाजपला भोवणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राजकीय उलथापालथी वाढू लागल्या. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी पक्ष सोडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना केंद्रात मंत्रीपद मिळूनही सूर्यकांता पाटील यांनी 2104 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. या दहा वर्षांत राज्यातही बहुतांश काळ भाजपची सत्ता राहिली. असे असतानाही त्यांना कोणतेही मोठे पद, खासदारकी, आमदारकी मिळाली नाही. त्यामुळे नाराज असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. (Suryakanta Patil News)

सूर्यकांता पाटील यांचे वय आता 76 वर्षे आहे. भाजपमधील अलिखित नियमानुसार त्यांचे वय राजकारणातून निवृत्तीचे आहे. त्यांच्या राजकारणाची सुरुवात भाजपमधूनच झाली होती. 1972 मध्ये त्या भाजप महिला आघाडीत त्या सक्रिय झाल्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगरसेवक ते खासदार अशी मजल त्यांनी मारली.

कालांतराने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये राष्ट्रावादीच्या कोट्यातून त्या 2004 ते 2009 दरम्यान राज्यमंत्री राहिल्या. त्यापूर्वी 1986 ते 1991 दरम्यान त्या राज्यसभेवर होत्या. हदगाव मतदारसंघातून त्या विधानसभेवरही निवडून गेल्या होत्या.

नांदेड, हिंगोली लोकसभा मतदारसंघातून त्या तीनवेळा विजयी झाल्या. लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. आता सूर्यकांता पाटील यांनी पक्ष सोडल्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला किंमत चुकवावी लागेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

2014 मध्ये देशाचे राजकारण पूर्णपणे बदलले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपची घोडदौड सुरू झाली. मोदी लाटेत सहभागी होण्याचा मोह अनेक राजकीय नेत्यांना आवरता आला नाही. त्यामुळे देशभरात विविध पक्षांतील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मोदी लाटेची चाहूल सूर्यकांता पाटील यांनाही लागलीच होती. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खासदारकी, मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा त्यांना असणारच, मात्र तसे झाले नाही.

Suryakanta Patil
Jarange Vs Vikhe : जरांगे-पाटलांनी राधाकृष्ण विखे-पाटलांना सुनावलं; म्हणाले, "तुमच्यामुळे..."

पक्षात येणाऱ्या सर्वांनाच अशी पदे देणे कोणत्याही पक्षाला शक्य होत नाही. वातावरण निर्मितीचा भाग म्हणून अनेक पक्षांतील नेत्यांचा प्रवेश करून घेण्याचा धडाका भाजपने (Bjp) लावला होता. सूर्यकांता पाटील यांनाही भाजपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यांना मिळाले काय, तर हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे संयोजकपद ! या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती, भाजपने तीही पूर्ण केली नाही.

अन्य पक्षांतील नेत्यांचा ओढा भाजपकडे सुरूच होता. ते 2024 च्या निवडणुकीपर्यंत अव्याहतपणे सुरू राहिला. या लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर सूर्यकांता पाटील यांनी परखड मत व्यक्त केले होते.

अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपचा पराभव झाला नसून, उलट भाजप प्रवेशामुळे अशोक चव्हाण यांचे नुकसान झाले, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. भाजपमधील दहा वर्षांत त्यांना सातत्याने डावलण्यात आले. त्याबाबतही त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. पक्षाची चलती असली की नेत्यांच्या नाराजीचा सूर दुर्लक्षिला जातो. सूर्यकांता पाटील यांच्याबाबतीतही असेच झाले. लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली. राज्यात भाजपच्या पदरी अपयश पडले. केंद्रातही भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही. अशा परिस्थितीत नाराज नेत्यांचा आवाज वाढणे साहजिक असते.

Suryakanta Patil
Lok Sabha Session Live : इकडे मोदींनी सांगितले ‘18’ चे शुभ संकेत अन् तिकडे विरोधकांचा अपशकून!

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सू्र्यकांता पाटील यांनी राजीनामा दिला. गेली दहा वर्षे महत्वाचे पद नसल्यामुळे त्या बाजूला पडल्या होत्या. कार्यकर्ते, नागरिकांशी त्यांचा संपर्क कमी झाला होता. विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. नांदेड, हिंगोली लोकसभा मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. अशा परिस्थिती विधानसभा निवडणूक महायुतीला जड जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेत्यांच्या प्रवेशामुळे जशी वातावरण निर्मिती होते, त्याचप्रमाणे नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतरही विरोधात वातावरण निर्माण होते. सूर्यकांता पाटील आता मूळ पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी पक्ष सोडल्याचा भाजपला फटका बसणार की नाही, हे पाहण्यासाठी विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

Suryakanta Patil
Video Suryakanta Patil : दोन दिवसांपूर्वी भाजपला रामराम, आज शरद पवार गटात प्रवेश? माजी केंद्रीय मंत्र्याचा मोठा निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com