Rahul Gandhi On Vote Chori : राहुल गांधींचे आरोप खरे? निवडणुकीपूर्वी दिल्लीपासून 1400 किलोमीटवर काय घडलं? राजूरा मतदारसंघाची A टू Z Inside Story

Rahul Gandhi On Vote chori : राहुल गांधी यांनी चंद्रपूरच्या राजुरा विधानसभा मतदारसंघात बनावट मतदार नोंदणी झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे देशभरात राजकीय वादळ उठले आहे.
Rahul Gandhi affidavit
Rahul Gandhi affidavitSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi On Vote Chori : लोकशाही जनतेच्या विश्वासावर टिकून असते. मतदार यादी त्या विश्वासाची मुख्य आधारशीला. पण, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात घडलेल्या 6,861 बनावट मतदार नोंदणीच्या प्रकरणाने हा आधार पूर्णपणे हादरला. निवडणूक आयोगाने या बनावट नावांची नोंदणी रद्द केली; पण 11 महिन्यांनंतरही या घोटाळ्यामागील खरे दोषी कोण आहेत, हे अद्याप उघड झालेले नाही. चोरी करण्याचा प्रयत्न झाला; पण चोर कोण? हा प्रश्न लोकांच्या मनात आणखी संशय निर्माण करत आहे.

दिल्लीपासून तब्बल 1,411 किलोमीटर दूर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघ सध्या देशभरात राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत राजुरा मतदारसंघातील बनावट मतदार नोंदणीचा उल्लेख केला आणि मागील 11 महिन्यांपासून शासकीय कागदपत्रांमध्ये हरवलेले हे प्रकरण पुन्हा प्रकाशझोतात आले.

राजुरा मतदारसंघाची ओळखच वेगळी आहे. इथे दुहेरी मतदार ओळखपत्रे आणि आधार कार्ड यांसारखे प्रकार नवे नाहीत. तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या या मतदारसंघातील जिवती तालुक्यातील 14 गावांमध्ये एकाच दिवशी दोन्ही राज्यांत मतदान करण्याची प्रथा आहे. या गावांवर दोन्ही राज्यांनी दावा सांगितला. अद्याप तो प्रश्न सुटलेला नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना राजुरा मतदारसंघात 1 ऑक्टोबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत 11 हजार 667 ऑनलाइन बनावट मतदारांची नोंदणी करण्यात आली, असा आक्षेप काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी घेतला. त्यानंतर 6, 853 मते डिलीट करण्यात आली. शेतकरी संघटना आणि काँग्रेस यांच्यात पारंपरिक लढत असलेल्या या मतदारसंघात भाजपचे देवराव भोंगळे 3 हजार 54 मतांनी विजयी झाले. पण, या बनावट मतदार नोंदणीच्या प्रकरणाने भोंगळे यांच्या विजयावर आता संशयाचे ढग दाटले आहेत. यासंदर्भात भाजपनेसुद्धा निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.

ही बनावट मतदार नोंदणी केवळ प्रशासकीय चूक नव्हती. इतक्या मोठ्या प्रमाणात खोटी नावे, खोटे पत्ते, खोटे पुरावे आणि फोटो सादर करणे हे पूर्वनियोजित आणि एकत्रितपणे केलेले षडयंत्र असल्याचे स्पष्ट दिसते. या प्रकरणात एफआयआरही दाखल झाला. पण, त्यानंतर काय घडले? काहीच नाही. पोलिसांनी 5 वेळा राज्य निवडणूक आयोगाकडे अर्जदारांचे आयपी ॲड्रेस आणि ओटीपीसाठी वापरलेले मोबाईल नंबर मागितले; पण आजपर्यंत आयोगाने ती माहिती दिलेली नाही. त्यामुळे मतदारांच्या मनात आणखी संशय वाढवत आहे. धोटे यांच्यासह शेतकरी संघटनेचे ॲड. वामनराव चटप यांनीही या निवडणुकीतील गैरप्रकारांवर संशय व्यक्त केला. सहा हजारांहून अधिक बनावट मतदार नोंदणी अर्ज एका व्यक्तीने केले असतील का? हजारोंच्या संख्येने बनावट नावे बाहेरची आहेत, ओळख न पटणारी आहे. यामागे एकत्रित गट किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा हात नाही, असे कसे म्हणता येईल?

Rahul Gandhi affidavit
Rahul Gandhi : चंद्रपुरातील भाजप आमदार 'व्होट चोरीतून' निवडून आला? राहुल गांधींनी स्ट्रॅटेजीच सांगितली

निवडणूक आयोगाचा प्रतिसाद या पूर्ण घटनेत खूपच संशयास्पद आहे. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर ‘आम्हीच मते डिलीट केली’ असे सांगून आयोगाने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण, प्रश्न इतक्यावर थांबत नाही. बनावट अर्ज कोणी सादर केले, कुणाच्या सांगण्यावर ते केले आणि साहित्य कोणी पुरवले याचे उत्तर द्यावे लागेल. 11 महिन्यांनंतरही कोणतीच कारवाई का झाली नाही? त्यामुळे निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली आहे, असा समज लोकांमध्ये वाढत आहे.

राजुरा प्रकरण एखाद्या अपघाताने घडलेल्या प्रशासकीय चुकीचे उदाहरण नाही. हे लोकशाहीच्या प्रक्रियेत घुसखोरी करण्याचा मुद्दाम केलेला प्रयत्न आहे. याकडे दुर्लक्ष केले, तर लोकशाहीचा मूळ आधार ढासळेल. ‘डिजिटल इंडिया’ असलेल्या आणि ‘विश्वगुरू’ होण्याच्या तयारीत असणाऱ्या या देशात निवडणूक यंत्रणेला 11 महिने लोटूनही आयपी ॲड्रेस आणि ओटीपीसाठी वापरलेले मोबाइल क्रमांक सापडत नाही, यावर विश्वास ठेवायचा कसा? आयोगाने या प्रकरणाच्या मुळाशी जावे आणि जनतेचा मनातील संभ्रम दूर करावा. अन्यथा या प्रकरणामुळे निर्माण झालेला संशयाचा धूर बराच काळ पसरलेला राहील.

Rahul Gandhi affidavit
Rahul Gandhi News : निवडणूक आयोगातील गुपितं समोर येणार? राहुल गांधींनी केला मोठा गौप्यस्फोट

लोकशाही मतांच्या संख्येवर नव्हे, तर त्या मतांच्या खऱ्या आणि प्रामाणिक स्वरूपावर टिकून असते. राजुरा मतदारसंघातील प्रकरण हे लोकशाही प्रक्रियेला लागलेले काळे डाग आहेत. हे डाग पुसणे आयोगाची मुख्य जबाबदारी आहे. लोकशाहीवरचा विश्वास टिकवायचा असेल, तर आयोगाने मौन सोडून सत्य प्रकाशात आणले पाहिजे. भाजपचे आमदार देवराव भोंगळे यांनी त्यांच्यासाठी नवख्या राजुरा मतदारसंघात विजय मिळवला. ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, भाजप जिल्हाध्यक्ष असा भोंगळे यांचा राजकीय प्रवास आहे. पण, या बनावट मतदार प्रकरणामुळे त्यांच्या विजयावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले.

आता भोंगळे यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा करून सत्य बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तेव्हाच त्यांच्या विजयावरील संशयाचे ढग दूर होईल. लोकशाहीचा पाया मतदारांच्या खऱ्या यादीवर उभा असतो. जर ही यादीच बनावट पद्धतीने वाढवली जाणार असेल, तर निवडणुकीचे महत्त्व राहते कुठे? लोकशाहीचे आरसेच धूसर झाले, तर सत्ता कोणाचीही असो... प्रतिबिंब विकृतच दिसेल. राजुरा प्रकरणातसुद्धा हेच झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com