Happy Birthday CM Eknath Shinde : शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या अपघाती निधनानंतर ठाण्यातील प्रत्येक शिवसैनिक हा जणू पोरका झाला होता. त्यांना जिल्ह्यात खंबीर नेतृत्वाची उणीव भासू लागली होती. दिघे यांच्या तोडीचे नेतृत्वगुण असलेली व्यक्ती बाळासाहेबांना सापडतच नव्हती. त्यातच दिघे यांच्या सारखेच गुण त्यांचे शिष्य असलेले एकनाथ संभाजी शिंदे यांच्यात दिसत होते.
दिघे यांच्या निधनानंतरची विधानसभेची पहिली निवडणूक 2004 मध्ये झाली. त्यावेळी शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. शिंदे यांनी विजयाची पताका फडकावली. त्यानंतर वर्षभरात 2005 मध्ये शिंदे यांच्या गळ्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे जिल्हाप्रमुख पदाची माळ घातली.
शिवसैनिकांना त्यांच्यात दिघे यांचे प्रतिबिंब दिसत होते. आमदार आणि जिल्हाप्रमुख अशी दुहेरी कमान स्वीकारल्यानंतर भाईंनी समर्थपणे तो डोलारा पेलण्यास सुरुवात केली. भाईंशिवाय पुढे जिल्ह्यात पानही हलत नव्हते आणि येथून त्यांचा दरारा सुरू झाला. त्याच दराऱ्यातून त्यांनी गुरुवर्य दिघे यांनी पाहिलेले स्वप्न साक्षात उतरवले आणि ठाणेकर म्हणून ते राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.
एकनाथ शिंदे यांनी दिघे यांच्या तालमीत राजकारणाचे धडे गिरवले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत ते न्याय, हक्कासाठी आक्रमक शिवसैनिक म्हणून काम करत होते. वेळप्रसंगी त्यांनी तुरुंगवासही भोगला. मात्र, दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्हा सांभाळणे कोणालाही शक्य झाले नाही.
त्यामुळे बाळासाहेबांनी ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी शिंदे यांच्या खांद्यावर टाकली. दिघे यांच्या तालमीत घडलेल्या शिंदे यांनी ती जबाबदारी स्वीकारून दिघे यांच्यासारखीच रणनीती अंगिकारत ठाण्यातील शिवसेनेला बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आकार देऊन ती वाढण्यात मोलाची भूमिका बजावली.
अल्पावधीत शिंदे यांनी दिघे यांच्यासारखी जिल्ह्यावर आपली पकड निर्माण केली. त्यांनी जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आपला ठसा उमटवला. लोकसभा आणि विधानसभा या मतदारसंघांचा विस्तार झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा भगवा तितक्याच ताकदीने जिल्ह्यात फडकावत ठेवला.
दरम्यान, एकीकडे राज्याच्या राजकारणात शिंदे यांनी आपली घोडदौड सुरू केली. मात्र, त्यांनी स्थानिक पातळीवरील पकडही सैल होऊ दिली नाही. शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना या समीकरणाला त्यांनी कोणत्याही परिस्थितीत धक्का लागू दिला नाही. राज्याच्या राजकारणात सहभागी झाल्यावर त्यांनी ठाणे जिल्ह्यावरील भगवा कधीही खाली उतरणार नाही, याची काळजी घेतली. दिघे यांच्यासारखा नाही, पण त्यांच्याइतकाच दराराही त्यांनी निर्माण केला.
पहिल्यांदाच ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला. त्याच्यानंतर 2017 मध्ये झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रथमच एकहाती सत्ता आली. याखेरीज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद, बदलापूर नगरपरिषद अशा सर्व ठिकाणी शिवसेनेला सत्ता मिळाली. ही किमया करून त्यांनी गुरुवर्य दिघे यांच्यापेक्षा दोन पावले पुढे टाकण्याचा प्रयत्न केला.
ठाणे जिल्ह्याप्रमाणेच राज्यातही त्यांना आपला दरारा निर्माण करण्यात यश आले. राज्याच्या वजनदार नेतेमंडळींत एकनाथ शिंदे यांचे नाव आज आवर्जून घेतले जाते. मुख्यमंत्री म्हणून ते राज्याचा कारभार तितक्याच ताकदीने सांभाळत असल्याने ठाणेकरांचे " भाई " आता राज्याचे लोकनाथ झाले आहेत.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.