
Solapur, 05 July : महाराष्ट्रात शेकडो वर्षांच्या वारीची परंपरा आहे. आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाच्या महापुजेची प्रथा आहे. महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेचे प्रतिनिधी म्हणून आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात येते. मात्र, काही मुख्यमंत्र्यांना पदावर असतानाही आषाढीला विठ्ठलाची महापूजा करता आली नव्हती. यामध्ये बॅ. ए. आर. अंतुले, शिवसेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि अलीकडच्या काळात म्हणजे जुलै 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनाही पदावर असतानाही विठ्ठलाची महापूजा करता आली नव्हती.
महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंढरपूरमध्ये (Pandharpur) अनेक संघटना आंदोलन करत असतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन सुरू होते. तब्बल 57 मोर्चे आरक्षणाच्या मुद्यावर निघाले होते. पण, आरक्षणाचा विषय मार्गी लागत नव्हता, त्यामुळे मराठा समाज बांधव आक्रमक झाला होता.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा संघटनांनी दिला होता. तसेच 76 हजार जागांच्या नोकरभरतीला मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करून आक्रमक आंदोलनाचा पवित्रा मराठा संघटनांना घेतला होता. आषाढीला संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो वारकरी हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत येत असतात. पण मराठा संघटनांच्या इशाऱ्यामुळे लाखो वारकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते.
मराठा संघटना आक्रमक होत असताना तिकडे मुख्यमंत्री फडणवीसांचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नव्हता, त्यामुळे दिवसेंदिवस विषय चिघळत होता. त्यात पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांना काही माहिती मिळत होती, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 23 जुलै 2018 रोजी विठ्ठलाची महापुजेसाठी पंढरपूर येणार नसल्याचे जाहीर केले.
आषाढी एकादशीची महापूजा मी वर्षा बंगल्यावरच करेन. पण, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला येऊ देणार नाही, ही काही संघटनांची भूमिका चुकीची आहे. मुख्यमंत्र्यांना महापूजा करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पण, वारकऱ्यांच्या जीवाला धोका होईल, असे काहींचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला पोलिसांकडून तशी माहिती मिळाली आहे. वारकऱ्यांमध्ये साप सोडणे, चेंगराचेंगरी होऊन जीविताला हानी पोचवण्याचे काहींचे मनसुबे आहेत, ते अतिशय वाईट आहे. मी विठ्ठलाची पूजा माझ्या घरीही करू शकतो. पण, मुख्यमंत्र्यांना असं आडवणं चुकीचं आहे, असे फडणवीस यांनी म्हटले होते.
त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ऐवजी हिंगोली जिल्ह्यातील सामान्य वारकरी दांपत्याच्या हस्ते आषाढीला विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली होती. महापूजेसाठी गिरीश महाजन, तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख ही राजकीय नेतेमंडळी मात्र उपस्थित होती. मुख्यमंत्री महापुजेला न येण्याची ती काही पहिलीच वेळ नव्हती.
बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यावेळी अंतुले यांच्या सरकारमधील महसूल मंत्री रजनी पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली होती. तसेच, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनाही १९९६ मध्ये महापूजेला जाण्याचा निर्णय रद्द करावा लागला होता.
मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये झालेला पोलिस गोळीबार देशभर गाजला होता. दलित संघटनांनी त्या गोळीबाराच्या विरोधात पंढरपुरात आंदोलनाची तयारी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री जोशी यांना विठ्ठलाची महापूजा करू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे मनोहर जोशी यांनी पंढरपूरला महापूजेसाठी न जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा मुख्य सचिवांनी शासकीय महापूजा केली होती.
हे उपमुख्यमंत्रीही कार्तिकीच्या पुजेला मुकले हेाते
बंडातात्या कराडकरांच्या वारकरी प्रश्नांवरील आंदोलनामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर.पाटील यांनाही कार्तिकीची महापुजा करण्याचा निर्णय रद्द करावा लागला होता. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरणासंदर्भात केलेल्या विधानामुळे तेव्हा त्यांनाही महापूजा करण्यास विरोध करण्यात आला होता, त्या वेळी अजित पवार यांच्याऐवजी सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते कार्तिकची पूजा करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.