
Mumbai, 05 July : राज ठाकरे यांनी आज मुंबईत झालेल्या विजयी मेळाव्यात आपण मराठीसाठी एवढे कडवट कसे झाले, हे सांगितले. तो सांगताना बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीसाठी 1999 मध्ये घेतलेली भूमिकाही जाहीरपणे महाराष्ट्राच्या समोर मांडली. मुख्यमंत्रिपदासाठी सुरेश जैन यांच्या नावावर शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये एकमत झाले होते. त्याला बाळासाहेब ठाकरेंची अनुमती घेणे तेवढे शिल्लक होते. राज ठाकरेंनी बाळासाहेबांना ते नाव सांगितले, तेव्हा बाळासाहेब म्हणाले, ‘त्यांना जाऊन सांग की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठी माणूसच होईल.’ ‘मराठी माणूस’ ह्या एवढ्या एकाच मुद्यावरून त्यावेळी सुरेशदादा जैन यांचे मुख्यमंत्रिपद गेल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, मराठीचा कडवटपणा आमच्यात आला कुठून. मी मराठीसाठी एवढा कडवट का झालो. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे मराठीचे अनेक प्रसंग आहेत. पण, मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही, तो प्रसंग १९९९ मधील आहे. शिवसेना-भाजप युतीचे सरकार येणार, नाही येणार, अशी त्यावेळची परिस्थिती होती.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढले होते. भाजप-शिवसेनेच्या (Shivsena-BJP) वादात काहीच होईना. दिवसांमागून दिवस जात होते. मात्र, काही होईना. एके दिवशी दुपारी मी मातोश्रीला खाली बसलो होतो, त्या वेळी अचानक दोन गाड्या लागल्या, साधारणपणे साडेतीन ते चारची वेळ होती, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले.
राज म्हणाले, प्रकाश जावडेकर व काही मंडळी आली आणि मला म्हणाली, बाळासाहेब ठाकरे यांना अर्जंट बोलायचं आहे. मी म्हटलं ते आता भेटणार नाहीत. कारण, त्यांची आता झोपायची वेळ आहे. मी म्हटलं विषय काय आहे, ते सांगा. मी बोलायचं काम करेन. त्यांनी सांगितले, ‘मुख्यमंत्रिपदाचा विषय झालेला आहे.’ मी म्हटलं अच्छा, अरे व्वा! काय झालं. सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करायचं, असं आमचं दोन्ही बाजूंकडून ठरलं आहे. एवढं बाळासाहेब ठाकरे यांना सांगायचं आहे.
मी बाळासाहेब झोपलेल्या रुममध्ये गेलो, रुममध्ये अंधार, काळोख होता. आम्ही ‘आरे तुरे’मध्ये बोलायचो, त्यामुळे मी म्हटलं ‘ए काका’... ते गाढ झोपले होते. त्यामुळे मी पुन्हा एक हाक मारली ‘ए, काका उठ.’ त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलं आणि विचारलं, ‘काय रे.’ मी म्हटलं, ‘खाली जावडेकर वगैरे मंडळी आली आहेत.’
ते म्हणाले, ‘बरं मग.’ ते म्हणतात की, मुख्यमंत्रिपदाचा विषय झाला आहे. ते म्हणाले ‘काय झालं’. मी सांगितलं की, सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करायचं, असे दोन्ही बाजूकडून ठरलं आहे. ते ऐकून बाळासाहेबांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ‘त्यांना जाऊन सांग, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल. दुसरा कोणी होणार नाही.’ असे राज यांनी नमूद केले.
मराठी या एका विषयासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी त्या वेळी सत्तेवर लाथ मारली होती, हे त्यावेळी मला कळले. हे संस्कार ज्या पोरावर झाले असतील, तो मराठीसाठी तडजोड करेल का. बाकी युती आघाड्या या सगळ्या गोष्ठी होत राहतील. पण महाराष्ट्र, मराठी, मराठी माणूस, मराठी भाषा याच्याबाबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.