
Mumbai News : महाराष्ट्रात अभूतपूर्व बहुमतासह सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या सातत्यानं अडचणी वाढताना दिसून येत आहे. असा एकही दिवस नाही, ज्यादिवशी सरकारला टीकेला सामोरे जावे लागले नाही.कधी मंत्र्यांचे वादग्रस्त विधानं,कधी नाराजीनाट्य, कधी कुरघोडीचं राजकारण यांसह इतर वादांची नजर या बहुमतातील महायुतीच्या सरकारला लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, आता आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार आता मंत्री आमदार,नेतेमंडळी किंवा एखाद्या घोटाळ्यांमुळे नव्हे तर चक्कं वन्यप्राणी आणि पक्षांमुळे अडचणीत आलं आहे.
एकीकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर कोल्हापूरमधील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनतारा संस्था घेऊन गेली होती. त्यानंतर कोल्हापुरसह संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर दिवसागणिक महादेवीवरुन पेटलेल्या संघर्षाची धग वाढत असतानाच याप्रकरणी राज्य सरकारविरोधातही वातावरण तापू लागलं होतं.
अखेर या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष घालावं लागलं. विशेष म्हणजे या महादेवी हत्तीणीच्या आंदोलनाची धग महाराष्ट्रापर्यंत पुरती मर्यादित न राहता दिल्लीपर्यंत पोहोचली. शिवसेनेच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबतच्या बैठकीत कोल्हापूरचं प्रकरण ठेवलं.
केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावर नांदणी येथील महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. दरम्यान ,या बैठकीत महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे स्पष्ट निर्देश गृहमंत्री अमित शाह यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
एकीकडे कोल्हापुरातील महादेवी हत्तीणीचा मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दादर येथील कबूतरखान्यावरही कारवाई करण्यात येत आहे. शहरातील कबूतर खाणे बंद करण्यात आले आहेत. मात्र, या कारवाईला विरोध जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घातली होती. पण याचवेळी कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन समाजाकडून काढण्यात आली. यावेळी अनेक महिलांनी कबुतरखान्यात घुसून ताडपत्री बांधलेली काढली. तसेच कबुतरखान्यावर बांधण्यात आलेले बांबू देखील महिलांकडून हटवण्यात आले.
मुंबईत कबूतरखान्यांवरील कारवाईनंतर जैन समाजानं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह जैन समाजाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. यानंतर दादरमधील कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं होतं.
पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे समोर आले होते. अधिवेशनाचा धुरळा बसत नाही,तोच आता फडणवीस सरकारसमोरचा डोकेदुखी वाढवणारे दोन नवे अध्याय समोर आले आहेत. दादरमधील कबुतरखाने, आणि कोल्हापूरमधील महादेवी हत्तीण यांमुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारण तापलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.