Sharad Pawar News : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर हक्क सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी एकच खळबळ उडवून दिली. त्याचे पडसाद आज उमटू लागले आहेत. प्रदेशाध्यक्षपद समाजातील इतर घटकांना मिळावे, अशी भूमिका मांडत स्वत:सह इतर काही नेत्यांची नावे सांगत पक्षात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नवा गोंधळ उडवून दिला.
विरोधी पक्षनेते पद नको, पक्ष संघटनेतील पद द्या, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतल्यामुळे एकच चर्चा झाली. अजित पवार यांचा रोख हा प्रदेशाध्यक्ष पदाकडेच होता, असे बोलले जात आहे. मात्र, अजित पवार यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीतील इतर नेत्यांनीही आपली मते परखडपणे मांडली. छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे एक नवीन चर्चा सुरु झाली.
अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले. मात्र, राज्यातील जातीय समीकरणांचा विचार केल्यास पवार यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष होणे सोपे नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आहेत, सुप्रिया सुळे नुकत्याच कार्याध्यक्ष झाल्या आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद अजित पवार (Ajit Pawar) यांना दिले तर एकाच घरात पदांची अशाप्रकारे वाटणी शरद पवार यांना मान्य होईल का हा खरा प्रश्न आहे.
जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावर पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या पदावर नवीन नेत्याची निवड होण्याची शक्यता आहे. यामध्ये धनंजय मुंडे, राजेश टोपे, सुनील तटकरे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र, शरद पवार त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वेगळा निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊ शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
धनंजय मुंडे (Dhananjay Munde), हे राष्ट्रवादी मधील तरुण नेते आहेत. त्यांनी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावलेली आहे. अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मराठवाड्यातील आणि ओबीसी चेहरा आहे. उत्तम भाषण कौशल्य, त्यांच्या सभांची मागणी पक्षात जास्त असते. तसेच संघटन कौशल्य या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
जितेंद्र आव्हाड पक्षाचा शहरी चेहरा, स्पष्टवक्ते तरुण नेता. युवक काँग्रेस पासून सुरुवात, पद्मसिंह पाटील यांचे जिवलग. तिथून शरद पवार यांची ओळख. शरद पवार यांचे विश्वासू, पुरोगामी विचारसरणीसाठी कायम आंदोलन असो किंवा प्रबोधन ह्यात पुढाकार घेतात. मंत्री म्हणून देखील शरद पवार यांनी गृहनिर्माण सारखे महत्वाचे खाते दिले. दलित, मुस्लिम समाजात देखील आव्हाड यांचा वावर आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान देणार नेते. सोशल मीडियावर पुरोगामी विचारांच्या तरुणांत लोकप्रिय आहेत.
राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोना काळामध्ये आरोग्य खाते उत्तमरित्या हाताळले. त्यामुळे राज्यभरात धडाडीने काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. मराटवाड्यातील पक्षाचा चेहरा आहेत. तसेच टोपे यांचे संघटन कौशल्य आणि कोरोना काळात केलेल काम यामुळे त्यांची लोकप्रियता आहे. यामुळे त्यांचाही विचार या पदासाठी होऊ शकतो.
सुनील तटकरे हे खासदार आहेत. मात्र, सध्या ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. तसेच त्यांनी एक वेळ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद यशस्वीरित्या सांभाळलेले आहे. ते कोकणातील राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. तसेच राज्यामध्ये त्यांचा जनसंपर्क आणि नेत्यांची असलेले संबंध यामुळे त्यांचाही पुन्हा विचार होऊ शकतो.
छगन भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. भुजबळ हे ओबीसीचे एक प्रमुख नेते आहेत. तसेच त्यांची ओबीसी समाजामध्ये चांगली पकड आहे. भुजबळांचे संघटन कौशल्य ही उत्तम आहे. त्यांना मानणारा वर्ग राज्यभरात आहे. त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद गेल्यास पक्षाला ओबीसी समाजामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. मात्र, भुजबळ यांचे वय ही त्यांच्यासाठी अडचण असू शकते. परंतु त्यांचाही विचार होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.