Mumbai : राज्यातील सत्तेसाठी एकत्र आलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आता वादाला सुरुवात झाली आहे. मतदारसंघावरून गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही बाजूने कुरबुरी सुरू होत्या. मात्र, शिंदे गटाच्या बैठकीत खासदारांनी भाजपवर हल्लाबोल केला असून आम्हाला भाजपकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही. सापत्न वागणूक मिळते, अशी भावना ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर यांच्यासह इतरांनी बोलून दाखवली. (Dispute started in BJP-Shinde group)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत नुकतीच शिंदे गटाच्या खासदाराची बैठक झाली. त्या बैठकीत खासदार आणि नेतेमंडळींनी भाजपच्या (BJP) विरोधात तक्रारींचा पाऊस पाडला. राज्यातील सत्तेत आपल्याला भागीदार करून घेतलं, पण भागीदार म्हणून समान वागणूक आपल्याला मिळत नाही, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली. तसेच, शिंदे गट कुठल्याही परिस्थितीत २२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचेही शिंदे गटातील खासदारांनी स्पष्टपणे सांगितले.
आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्याने आम्ही १३ खासदार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहेत. पूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. पण, आता आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक झालो आहोत. आम्ही एनडीएचा घटक झाल्याने आमची कामे झाली पाहिजेत. घटकपक्षाला तेवढा दर्जा दिला पाहिजे. पण, भाजपकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही. सापत्न वागणूक आम्हाला मिळते, अशा शब्दांत खासदारांनी नाराजीला तोंड फोडले.
शिंदे गटातील खासदारांच्या हल्लाबोलमुळे भाजपत खळबळ उडाली आहे. यावर भाजपकडून काय उपाय योजना केली जाते, याकडे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. कारण, शिंदे गटाशिवाय भाजपला राज्यात सत्तेत राहता येणार नाही, त्यामुळे केंद्रातही शिंदे गटाला काही मंत्रिपदे द्यावे लागणार आहेत.
एकीकडे महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. आघाडीतही छोटा भाऊ मोठा भाऊ असे वाद सुरू झाले आहेत. कोण कुठची जागा लढविणार याचीही चर्चा महाविकास आघाडीत होत आहे. महाआघाडीप्रमाणे भाजप-शिंदे गटातही कुरबुरी सुरू झाल्याने महाराष्ट्राचे राजकारण पुढे काय वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.