Solapur, 07 November : महायुती उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी केल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील 39 नेत्यांची हकालपट्टी केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोन नेत्यांच्या समावेश आहे. मात्र, सोलापूरच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी 24 ऑक्टोबर रोजीच पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि हकालपट्टीचा आदेश मात्र ता. ०५ नोव्हेंबर रोजी निघाला आहे. एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेत्याचीच भाजपकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे राजीनामा दिलेल्या बनशेट्टी आणि मित्रपक्षाच्या नेत्याची हकालपट्टी करून भाजपने काय साध्य केले, असा सवाल चर्चिला जात आहे.
दुसरीकडे, अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील सुनील बंडगर यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, बंडगर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते असून ते सध्या अक्कलकोट मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजपने मित्रपक्षाच्याच नेत्याची हकालपट्टी केल्याचे पुढे आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातून माजी महापौर शोभा बनशेट्टी (Shobha Banshetty) आणि अक्कलकोटचे सुनील बंडगर यांची भारतीय जनता पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. शोभा बनशेट्टी यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचा राजीनामा देत उमेदवारी अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे शोभा बनशेट्टी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी 24 ऑक्टोबर रोजी भाजपचा राजीनामा दिलेला आहे. या राजीनाम्याच्या प्रती सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या आहेत.
माजी महापौर बनशेट्टी यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांच्यासह भाजपच्या सहा ते सात नगरसेवकांनी देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. विधानसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मात्र, भाजपकडून पुन्हा एकदा देशमुख यांनाच सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बनशेट्टी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन उमेदवारी अर्ज भरलेला आहे, त्यामुळे राजीनामा दिलेल्या नेत्याची हकालपट्टी करून भाजपने काय साध्य केले, असा सवाल कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
अक्कलकोटमध्ये तर भाजपचे कहरच केला आहे. एकेकाळचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे सुनील बंडगर यांची भाजपने हकालपट्टी केली आहे. सुनील बंडगर यांनी रासपकडून अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना रासपने एबी फार्मही दिलेला आहे. बंडगर यांनी रासपचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केले असून त्यांच्यावर आता पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी आहे. पण, भाजपने याच बंडगर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, त्यामुळे भाजपने मित्रपक्षाच्या नेत्यांना कसे बडतर्फ केले, असा सवाल उपस्थित होत आहे.
माझी हकालपट्टी कशी काय : शोभा बनशेट्टी
याबाबत माजी महापौर शोभा बनशेट्टी म्हणाल्या, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याच्या आठ दिवस अगोदरच मी भाजपचा राजीनामा दिला आहे. राजीनामाच्या प्रती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना पाठवल्या आहेत, त्यामुळे राजीनामा देऊनही भाजपने माझी हकालपट्टी कशी काय केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सुनील बंडगर आणि आमचा काहीही संबंध नाही : भाजप तालुकाध्यक्ष
यासंदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड म्हणाले, सुनील बंडगर नावाचा एकही पदाधिकारी आमच्याकडे नव्हता आणि नाही. हकालपट्टीच्या यादीत बंडगर यांचे नाव कसे आले, हे आम्हालाही समजलेले नाही. बंडगर हे रासपचे आहेत. आमचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. आम्ही आमच्या वरिष्ठांना याबाबत कळविले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.