Solapur, 27 October : लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दुसऱ्या यादीत उत्तम जानकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार जानकर हे लंगोट लावून तयार असताना महायुतीचा उमेदवार मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.
विद्यमान आमदार राम सातपुते यांचे नाव आघाडीवर असले तरी धक्कादायक नावही माळशिरसमधून भाजपकडून पुढे येऊ शकते. त्यात धाराशिवच्या एका माजी खासदाराच्या चिरंजीवाचे नावही चर्चेत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी माळशिरस विधानसभा मतदारसंघाची (Malshiras Assembly Constituency) राज्यभर चर्चा झाली होती. कारण, या मतदारसंघातील मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर यांनी गेल्या 40 वर्षांचे राजकीय वैर संपवत मोहिते पाटील यांच्याशी राजकीय दोस्ताना केला होता. मोहिते पाटलांशी असलेला उभा राजकीय दावा सोडून तडजोडीचे राजकारण स्वीकारले होते.
लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांना पाठिंबा देऊन माळशिरस विधानसभेची उमेदवारी जानकर यांनी फिक्स केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपबरोबर (BJP) काम करण्याची दिलेली ऑफर नाकारून जानकर यांनी शरद पवार यांच्याबरोबर जाणे पसंत केले होते, त्यामुळे माळशिरस विधानसभा मतदारसंघाची लोकसभा निवडणुकीतच राज्यभर चर्चा झाली होती.
लोकसभा निवडणुकीवेळी उत्तम जानकर यांची उमेदवारी निश्चित होऊनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीत त्यांना स्थान मिळू शकले नव्हते, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली होती. मात्र, दुसऱ्या यादीत उत्तम जानकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार कोण असणार, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांचे नाव माळशिरस मतदारसंघासाठी आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर राम सातपुते यांनी माळशिरसमधून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. मात्र, भाजपच्या दोन याद्या जाहीर होऊनही त्यात सातपुते यांना स्थान मिळू शकलेले नाही, त्यामुळे फडणवीसांच्या ‘गुडबुक’मधील सातपुतेंना माळशिरसमधून पुन्हा संधी मिळते की नवीन नाव पुढे येणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे.
भाजप धक्कातंत्राचा वापर करत राम सातपुते यांच्याऐवजी ऐनवेळी नवे नावही पुढे आणू शकते. तसे संकेतही मिळत आहेत. काही नावे त्या अनुषंगाने माळशिरसच्या राजकारणात चर्चिली जात आहेत.
धाराशिवचे माजी खासदार शिवाजीराव कांबळे यांचे सुपुत्र भूषण कांबळे यांचे नावही माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी पुढे आले आहे. भाजपकडून त्यांना विधानसभा निवडणुकीची तयारी करायला सांगण्यात आल्याची माहिती आहे, त्यामुळे ऐनवेळी सातपुते यांचा पत्ता कट होऊन भूषण कांबळे यांचे नावही माळशिरससाठी पुढे येऊ शकते.
स्थानिक उमेदवार म्हणून माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांचेही नाव चर्चिले जात आहे. त्यांच्याकडेही अनुसूचित जातीचा दाखला असल्याची माहिती आहे, त्यामुळे स्थानिक म्हणून आपासाहेब देशमुख यांच्या नावाला भाजपकडून पसंती दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.