Kirit Somaiya, Anil Parab News : भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सध्याच्या काळात तर किरीट सोमय्या एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि त्यानंतर त्यांची लगेचच ईडी चौकशी होते, असे समीकरणच झाले आहे. त्यावरुन त्यांच्यावर विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणात टीका करतात. मात्र, सोमय्या यांनी केलेल्या तक्रारींमध्ये अनेक नेत्यांना दिलासा मिळाला आहे.
किरीट सोमय्या यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात विविध आरोप केले होते. या प्रकरणात ईडीने चौकशी केली. त्यामध्ये सदानंद कदम यांना अटक केलेली आहे. या प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या आरोप पत्रात परब यांचे नाव नाही. तसेच अनिल परब यांच्या विरोधातील किरीट सोमय्या यांनी राष्ट्रीय हरित लवाद अर्थात (एनजीटी) मध्ये याचिका दाखल केली होती. ती याचिका मागे घेतली आहे.
त्यावरुन पत्रकारांशी संवाद साधताना परब यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला. अनिल परब म्हणाले, "मी सुरवातीपासून साई रिसॉर्ट प्रकरणात सांगत होतो की, माझा काही संबंध नाही. मात्र, जाणूनबुजून माझ्यावर खोटे आरोप केले. या प्रकरणात गैर व्यवहाराचे पैसे लावले असा आरोप झाला, पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचाही आरोप केला. ईडीने आमची चौकशी केली, गेली दीड वर्ष या प्रकरणात माझी बदनामी झाली. साई रिसॉर्ट प्रकरणात मी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला. आपल्या अंगाशी येतेय म्हणून सोमय्या यांनी प्रकरण मागे घेतले.
तसेच अनेक प्रकरण उच्च न्यायालयात आहेत. त्यामध्ये पण यांना जर कळले तर तेही मागे घेतले जातील. रिसॉर्टवरून जे दावे केले जातायत ते चुकीचे आहेत. मुख्य गुन्हा होता त्याची ईडीने चौकशी केली आहे. त्यानंतर आणखी दोन खोटे गुन्हे दाखल केले. ते गुन्हे खोटे आहेत याविषयी आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे, असे परब यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चौकशी होत आहे.
दरम्यान, सोमय्या यांनी शिवसनेचे (Shivsena) नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही पत्राचाळ प्रकरणात आरोप केले होते. त्यानंतर त्यांना ईडीने अटक केली. त्यांना तीन महिने तुरुंगात रहावे लागले. त्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांनाही अनेक दिवस तुरुंगात राहवे लागले. मात्र, त्यानंतर न्यायालयाने त्यांना दिलासा दिला.
कथित सिंचन घोटाळ्यात सोमय्या यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर अनेक आरोप केले होते. मात्र, त्या प्रकरणातही पुढे काहीच झाले नाही. त्यांना या प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारचे डर्टी डझन म्हणून नेत्यांच्या नावाची यादी त्यांच्या ट्वीटवर प्रसिद्ध केली होती.
किरीट सोमय्या यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, खासदार संजय राऊत (Sanjay Raut), माजी मंत्री अनिल परब, सुजित पाटकर, खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंद अडसूळ, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि नवाब मलिक, या नेत्यांचीही नावे होती. मुंबई महापालिचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील आरोप केले होते.
त्यानंतर सोमय्या यांच्या यादितील अनेक नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत भाजपबरोबर (BJP) गेले. यामध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक, आनंद अडसूळ, भावना गवळी यांची ईडीने चौकशी केली होती. मात्र, हे नेते भाजपसोबत गेल्यानंतर यांच्या प्रकरणात पुढे काय झाले, असे विरोधक विचारत असतात. यामुळे सोमय्या यांची कोंडी होते. ते अनेक प्रकरण बाहेर काढतात पण ती तडीस नेत नाहीत. या प्रकरणांचे पुढे काहीच होत नाही. त्यामुळे त्यांना विश्वासार्हता कमी होत आहे. त्यांनी केलेले अनेक आरोप हे गंभीर स्वरुपाचे होते. मात्र, त्यांच्या विश्वासार्हतेला तडा गेल्यामुळे ते गांभीर्याने घेतले गेले नाही. यामुळे सोमय्या यांचा स्ट्राईक रेट घसरतोय का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.