दोन वर्षांपुर्वी 'मी पुन्हा येईन'चे स्वप्न असे भंगले होते...

आजच्या दिवशी दोन वर्षांपुर्वी अनेकांना उत्कंठा लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहिर झाला होता.

Uddhav Thackeray, devendra fadnavis
Uddhav Thackeray, devendra fadnavis sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : २४ ऑक्टोबर २०१९. अनेकांना उत्कंठा लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहिर झाला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेले प्रचंड यश पाहता विधानसभेतही त्याचीच पुनरावृत्ती होईल असा अंदाज लावला जात होता. घडले देखील तसेच. भाजप-शिवसेना महायुतीला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले. बहुमत मिळाले असले तरी निवडणूकीपुर्वी शिवसेनेने सरकारमध्ये असूनही दिलेल्या त्रासामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) काहीसे स्वबळावर सत्तेत येण्यासाठी तयारी करत होते. पण भाजपची गाडी १०५ वरचं अडकली, तर शिवसेनेची देखील ६३ वरुन ५६ वर घसरण झाली. मात्र युती असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज झाले होते.


Uddhav Thackeray, devendra fadnavis
येत्या 28 तारखेला मुख्यमंत्री महाराष्ट्र विधानसभा बरखास्त करणार :अशोक चव्हाण

इकडे निवडणूकीपुर्वी महायुतीच्या बाजूचे वारे ओळखत काँग्रेस, राष्ट्रवादीमधील अनेकांनी महायुतीत जाणं पसंत केले होते. त्यानंतर भाजप-सेनेने जागावाटपाचं गणित मांडून हे नेते अक्षरशः वाटून घेतले. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकांड्या शिलेदाराप्रमाणे ही निवडणूक लढवून आपल्या पक्षाला भाजप-सेनेपाठोपाठ सर्वाधिक जागा मिळवल्या. तर काँग्रेसने देखील २०१४ पेक्षा २ जास्तीच्या म्हणजे ४४ जागा खिशात घातल्या. पण बहुमत महायुतीचीच्या बाजुने असल्याने पुन्हा शिवसेना-भाजप सत्तेवर येणार ही आता फक्त औपचारीकता बाकी होती. केवळ शपथविधीची तारिख कोणती असणार याची वाट सर्वजण बघत होते.

पण अशातच माशी शिंकली. देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाबद्दल दोन्ही पक्षांनी एकत्र पत्रकार परिषद घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) फोन केला. पण तो ठाकरेंनी घेतला नाही. इतकेच नाही तर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली. इथेच शंकेची पाल चुकचुकली. त्याचवेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीसांच्या "मी पुन्हा येईन"च्या घोषणेला पहिला खो घातला. त्यांनी घोषित केले, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. झाले, राऊतांच्या घोषणेनंतर शिवसेनेने भाजपला खिंडीतच गाठले. कारण भाजप शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्यास तयार नव्हता आणि भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करणे अशक्य होते.

संजय राऊत आणि शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर ठाम होते. परिणामी सत्ता स्थापन करण्यास विलंब झाला आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. पुढे संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेसाठी बोलणी सुरु केली. काँग्रेसची सोबत मिळाली. आणि राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार हे निश्चीत झाले.


Uddhav Thackeray, devendra fadnavis
विधानसभा २०१९: उत्तर महाराष्ट्र-  'महाजन-आदेश' हाच केंद्रबिंदू

मात्र घटनाक्रम बाकी होता. २३ नोव्हेंबरला अचानक अर्धा महाराष्ट्र झोपेत असताना सकाळी ८ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावर बराच वादंग झाला. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे दोघांनीही ७२ तासांच्या आतच राजीनामा दिला आणि उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com