Ajit Pawar News : पुरोगामी भूमिका जपताना होतेय अजितदादांची दमछाक!

progressive politics Maharashtra government : अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला महायुतीमध्ये राहताना पुरोगामित्व जपताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या वक्तव्याचाही अजित पवार यांनी समाचार घेतला होता. मात्र केवळ वारंवार निषेध करून प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी पुरोगामित्वाची भूमिका लोकांमध्ये ठोसपणे रूजविण्यासाठी महायुतीतील मित्र पक्षांतही त्याचे संक्रमण करून व विकासाचे ध्येय घेऊन महायुतीमध्ये सामील झाल्याच्या भूमिकेला काहीसा न्याय मिळू शकेल.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

पांडुरंग म्हस्के 

सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात राज्याच्या आर्थिक स्थितीऐवजी जातीयतेच्या विषयांवरच जास्त चर्चा झाली आहे. याची सुरुवात झाली ती समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केलेल्या ‘औरंगजेब हा क्रूर राजकारणी नव्हता’ या वक्तव्याने. त्यानंतर विधिमंडळात झालेला गोंधळ आणि अबू आझमी यांचे निलंबन यानंतर हा वाद संपेल, अशी चिन्हे असतानाच मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ‘शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक नव्हते’ या विधानाने पुन्हा गोंधळ वाढला. वास्तविक ही दोन्ही विधाने विधिमंडळाच्या सभागृहात केलेली नव्हती, मात्र त्याचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, मुघल बादशहा औरंगजेब यांच्या निमित्ताने पुन्हा निर्माण केलेल्या हिंदू - मुस्लिम या वादात महायुतीमध्ये असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा ठोस भूमिका घेतलेली आहे. सातत्याने पुरोगामी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) पुरोगामी बाजू मांडणारे आमदार अमोल मिटकरी हे पुन्हा एकदा पुढे आले.

Ajit Pawar
Mahayuti Politics : लोकच विरोधी पक्षाच्या भूमिकेत आले? हे तर महायुतीने ओढवून घेतलेले संकट

मिटकरींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात असलेल्या सरदार आणि अन्य सैनिकांची यादीच ‘एक्स’ या समाजमाध्यमांवर करून नितेश राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तर माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनाही नितेश राणे यांनी चुकीचा इतिहास पसरवू नये. त्या ऐवजी त्यांच्याकडे असलेल्या खात्याच्या माध्यमातून विकासकामे कशी करता येतील आणि राज्य कसे पुढे नेता येईल असे पाहावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. 

राणेंची खरडपट्टी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य महाराष्ट्राला परवडणारे नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम लोकही होते, असे म्हणत अजित पवार यांनी नितेश राणेंना इतिहास वाचण्याचा सल्ला दिला. राज्यात गेल्या वर्षभरापासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नितेश राणे चर्चेत आहेत. महायुतीचे सरकार आल्यानंतर नितेश राणे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतरही त्यांची अशी वादग्रस्त वक्तव्ये काही संपत नाहीत.

Ajit Pawar
Jayant Patil News : नार्वेकरांच्या मनपरिवर्तनासाठी जयंत पाटलांची बॅटिंग; भास्कर जाधवांचा निर्णय आजच होणार?

मुस्लिम धर्मीयांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांच्या या अशा वक्तव्यामुळे महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पुरोगामी भूमिकेला धक्का लागण्याची परिस्थिती निर्माण होत असते. मात्र त्या त्या वेळी अजित पवार किंवा त्यांचा पक्ष या अशा वक्तव्यांचा निषेध करीत आपली पुरोगामी प्रतिमा जपण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे जाणवत आहे.

नितेश राणे यांचे अशा पद्धतीचे विधान महाराष्ट्र सहन करू शकत नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्याचबरोबर शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सर्वसमावेशक होते, जे सर्व समुदायातील लोकांना एकत्र आणत असे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठोस भूमिका कधी?

राज्यातील जातीय सलोखा महत्वाचा असून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांना शांतता भंग करणारी विधाने टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ‘‘काही लोक अशी विधाने करतात जी जातीय सलोखा बिघडवू शकतात. मात्र शिवरायांनी सर्वांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी कोणत्याही विधानामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी,’’ असे अजित पवार यांनी म्हटले होते.

Ajit Pawar
Sarada Muraleedharan : काळ्या रंगावरून थेट महिला मुख्य सचिवांना टार्गेट; त्यांच्या उत्तरानं टीकाकारांची तोंडं बंद...

नीतेश राणे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करताना नीतेश राणे यांच्याबाबत त्यांच्या पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करणार किंवा केली असल्याचे अजित पवार यांनी कोठेही नमूद केले नाही. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणाऱ्या अजित पवार यांची भूमिका ही बोटचेपी वाटल्यास नवल नाही. महायुतीमध्ये सहभागी होताना आपल्या भूमिकेशी तडजोड करावी लागणार असल्याचे अजित पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला जाणवले नसेल, असे म्हणणे पटणारे नाही.

मात्र त्यासाठी अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सोडणार नसल्याचे सांगत विकासाच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले होते. मात्र वारंवार अशा पद्धतीने आपल्याच मित्रपक्षाच्या नेत्यांकडून वेगळीच भूमिका घेतली जात असेल, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यात वेगळ्याच गोष्टींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पुरोगामित्वाचे व्हावे संक्रमण

यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणाऱ्या अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला महायुतीमध्ये राहताना व अनेकदा अशा प्रकारे त्यांचे पुरोगामित्व जपताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या वक्तव्याचाही अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला होता. मात्र केवळ वारंवार निषेध करून प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी अजित पवार यांनी आपल्या पुरोगामित्वाच्या भूमिकेला केवळ पक्षाच्या मर्यादेत न ठेवता महायुतीमध्ये त्यांचे संक्रमण होईल असे पाहिल्यास विकासाचे ध्येय घेऊन महायुतीमध्ये सामील झाल्याच्या त्यांच्या भूमिकेला काहीसा न्याय मिळेल, अन्यथा विकासाऐवजी धर्म आणि जात यांच्यातच जनता अडकून पडेल आणि विकासाचे स्वप्न मागे पडेल, असे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com