Mahayuti Politics : लोकच विरोधी पक्षाच्या भूमिकेत आले? हे तर महायुतीने ओढवून घेतलेले संकट

Mahayuti Government Kumar Kamra News : राज्यात विरोधी पक्षांचा आवाज क्षीण झाला आहे. अशाही परिस्थितीत विरोधकांचे नेते फोडण्याचा धडाका सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी लावला आहे. त्याचा परिणाम असा झाला की लोकच आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत येऊ लागले आहेत. कुणाल कामरा प्रकरणात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला अ़डचणीत टाकणारे प्रश्न समाजातून विचारले जात आहेत.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवून लोकसभा निवडणुकीतील अपयश धुवून काढले. महायुतीला इतके तगडे बहुमत मिळाले आहे की, पाच वर्षे या सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही. विरोधी पक्ष कमकुवत झाले आहेत, त्यांचा आवाज क्षीण झाला आहे. प्रचंड बहुमताच्या बळावर खरेतर महायुतीला राज्याचा गाडा अत्यंत चांगल्या पद्धतीने हाकणे शक्य होते, मात्र सत्ताधारी पक्ष फोडाफोडीच्या मानसिकतेतून बाहेर आलेच नाहीत आणि आता परिस्थिती अशी बनली आहे की लोकच विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाऊ लागले आहे.

बहुसंख्य लोक विरोधी पक्षाच्या भूमिकेत आल्याची जाणीव सरकारला झालेली आहे. त्यामुळेच मंत्री नितेश राणे यांची वादग्रस्त विधाने तूर्तास तरी बंद झालेली दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इफ्तार पार्टीला हजेरी लावत भाजपचे मंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या निशाण्यावर असलेल्या मुस्लिम समुदायाला विश्वास दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजितदादांच्या या विचारांशी सहमती दर्शवली. या प्रकरणातून पाठ सुटली, असे वाटत असतानाच कुणाल कामरा प्रकरणामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Nagpur Special Fund : महायुती सरकार 'नागपूर करारा'चे पालन करणार का? आमदार दटके यांची आपल्याच सरकारला विचारणा

स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एका गीताचे विडंबन केले. त्यात त्यांनी कोणाचेही नाव घेतलेले नव्हते, मात्र ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लागू पडणारे होते. कुणाल कामरा हे नाव न घेता जे बोलले आहेत, तसे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांचे संबोधन यापूर्वी अनेकदा नाव घेऊन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांसह आता सत्तेत असलेले अजितदादा पवार यांनीही विरोधात असताना तसे संबोधन केले होते. कामरा यांनी त्याचा दाखला दिला आहे. शिंदे यांच्या चिडलेल्या कार्यकर्त्यांनी कामरा यांचा कार्यक्रम झालेल्या स्टु़डिओची तोडफोड केली.

ही तोडफोड उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या अंगलट आली आहे. शिवराय, शंभूराजेंचा अपमान करण्यात आला, त्यावेळी तुमचे कार्यकर्ते असे आक्रमक का झाले नाहीत, असा प्रश्न नेटिझन्स आणि गावागावांतील लोकही शिंदे आणि त्यांच्या पक्षाला उद्देशून विचारू लागले आहेत. महायुतीला विरोधकांचा आवाज क्षीण करणे शक्य झाले आहे, मात्र आता विविध माध्यमांतून लोकांचा आवाज वाढू लागला आहे. लोकांचा सर्व राग शिंदे आणि त्यांच्या पक्षाकडे वळला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यातून सहिसलामत निसटल्याचे चित्र दिसत आहेत.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Jayant Patil News : नार्वेकरांच्या मनपरिवर्तनासाठी जयंत पाटलांची बॅटिंग; भास्कर जाधवांचा निर्णय आजच होणार?

सरकार स्थापन झाल्यानंतरही महायुतीतील पक्षांनी विरोधकांचे नेते फोडण्याची मोहीम जोरकसपणे राबवली आहे. एकनाथ शिंदे यांनी तर ऑपरेशन टायगर असे नाव देत उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा सपाटा लावला आहे. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का.. अशा बातम्या सातत्याने कानावर पडत आहेत. विरोधक शिल्लक ठेवायचेच नाहीत, यासाठीच आम्हाला प्रचंड बहुमत मिळाले आहे, असा समज महायुतीतील तिन्ही पक्षांचा झाला आहे. पाच वर्षे विरोधकांची सत्ता येणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे विरोधी पक्षांतील नेतेही सत्तेच्या आसऱ्याला जाऊ लागले आहेत.

आपल्याला विरोधकच असू  नये, अशी महायुतीतील पक्षांची 'स्ट्रॅटेजी' आहे. त्यातूनच उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पक्षातील आणि काँग्रेसचेही नेते फोडले जात आहे. विरोधक नसल्याचे फायदे सत्ताधाऱ्यांना होणार असले तरी त्याचे तोटे मात्र लोकांना सहन करावे लागणार आहेत. हे तोटे लोकांच्या आता लक्षात यायला लागले असतील. शिवरायांचा अपमान झाला त्यावेळी तुम्ही कुठे होता, असा प्रश्न त्यामुळेच लोक आता शिंदे आणि त्यांच्या पक्षाला विचारू लागले आहेत. लोकच आता विरोधी पक्ष बनू लागले आहेत, हे कुणाल कामरा प्रकरणानंतर ठळकपणे समोर आले आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar : एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणण्यावर अजितदादांनी दिले स्पष्टीकरण, 'त्या वेळी मी... '

वस्तुत: प्रचंड बहुमतात असलेल्या या सरकारला शांतपणे अनेक चांगली कामे करता आली असती. समाजात सलोखा, सौहार्द जपत मैलाचे दगड ठरतील, अशी विकासमकामे करता आली असती, कारण केंद्रातही भाजपच्या नेतृत्वाखालीच सरकार आहे. पण तसे होताना दिसत नाही. प्रबळ विरोधक नसतानाही सत्ताधारी अडखळत आहेत. विरोधी पक्षांचे नेते फोडण्यासाठी मतदारांनी आपल्याला प्रचंड बहुमत दिलेले नाही, याचा विसर महायुतीतील पक्षांना पडला आहे, त्याचा परिणाम असा झाला की लोकच आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आले आहेत. सत्ताधाऱ्यांनी स्वतःहून हे संकट ओढवून घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com