Bachchu kadu : फडणवीसांच्या एका फोनवर गुवाहाटीला गेलेल्या बच्चू कडूंची राजकीय कोंडी...

Maharashtra Politics : महायुतीचे सरकार आल्यानंतर आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळाले नाही.
Bachchu kadu
Bachchu kaduSarkarnama
Published on
Updated on

मी एक फोन केला आणि बच्चू कडू अमरावतीला गेले...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बरोब्बर एक वर्षापूर्वी हा गौप्यस्फोट केला होता. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ४० आमदार आणि काही अपक्ष आमदार महाविकास अघाडी सरकारमधून बाहेर पडल्याच्या घटनेशी याचा संदर्भ होता. निमित्त होते बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वादाचे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी आपला काही संबंध नाही, असे भाजपकडून सातत्याने सांगितले जात होते. फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटाने त्यावर पडदा पडला आणि त्या बंडाला भाजपची साथ होती हे उघड झाले होते. फडणवीसांच्या एका हाकेवर गुवाहाटी गाठलेल्या बच्चू कडू यांना मंत्रिपद तर मिळालेच नाही, उलट जाईल तेथे ५० खोकेवाला आमदार आला, हे त्यांना ऐकूण घ्यावे लागले. लोक असे बोलतात, हे खुद्द बच्चू कडू यांनीच सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bachchu kadu
Maharashtra Government : ओबीसी नेत्यांची सुरक्षा वाढवली; अनेक ठिकाणी संघर्षाचे वातावरण

वर्षभरापूर्वी शिवसेनेत इतिहासातील सर्वात मोठी फूट पडली. २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपचा हात सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरला होता. या तिन्ही पक्षांचे सरकार अस्तित्वात आले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बाहेर पडलेले मंत्री या सरकारमध्येही मंत्री होते.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्वाशी प्रतारणा केली, याचा उलगडा एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांना अडीच वर्षांनंतर झाला होता. अजित पवार निधी देत नाहीत, उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसले. शिवसेना सोडण्याची अशी कारणे एकनाथ शिंदे गटाकडून वारंवार सांगण्यात आली. आता शिंदेच अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या मांडीला माडी लावून सत्तेत बसले आहेत.

Bachchu kadu
Maratha Reservation : राणे, वडेट्टीवारांचे रेकॉर्डिंग व्हायरल करणारे रमेश पाटील पोलिसांच्या ताब्यात

महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते. प्रहार जनशक्ती हा त्यांचा पक्ष. विधानसभेच्या सर्व निवडणुका त्यांनी आतापर्यंत अपक्ष म्हणून लढवल्या आहेत, मग बच्चू कडू गुवाहाटीला का गेले असावेत, असा प्रश्न त्यांनाही आता पडत असेल. कदाचित त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचे आमिष दाखवले गेले असावे.

आतापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळांच्या विस्तारात त्यांना स्थान मिळालेले नाही. प्रत्येक विस्ताराच्या आधी त्यांनी राजकीय थयथयाट केला, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांची चिडचिड वाढली. मध्यंतरी भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार रवी राणा यांच्याशी त्यांचा वाद झाला. रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्या लोकसभा मतदारसंघावर बच्चू कडू यांनी दावा केला. त्यानंतर राणा आणि कडू यांच्यात शाब्दिक वार सुरू झाले.

आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये घेतले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. त्यामुळे आमदार कडू यांचा तिळपापड होणे साहजिक होते. फडणवीसांच्या एका फोनवर गुवाहाटीला गेलेल्या बच्चू कडू यांच्यावर भलताच प्रसंग ओढवला होता. या दोघांतील वाद मिटवण्यासाठी उमपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती.

प्रचंड क्षमता असलेला नेता सत्तांतरानंतर उपेक्षित राहिला...

आमदार बच्चू कडू यांचा इथपर्यंतचा प्रवास संघर्षमय राहिलेला आहे. अपक्ष म्हणून निवडून येणे सोपे नसते. त्यासाठी मतदारसंघात मोठे काम करावे लागते. बच्चू कडू हे तर अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी किती मोठे काम केले असेल. त्यांचा जनसंपर्क किती दांडगा असेल याची प्रचिती यावरून यावी. प्रचंड क्षमता असलेला हा नेता सत्तांतरानंतर उपेक्षित राहिला आहे.

डावलले गेल्याची सल बच्चू कडू यांच्या मनात कायम...

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केल्यानंतर फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केला होता. बच्चू कडू यांनी माझ्या विरोधात वक्तव्य केल्याने आपण रागारागात बोलल्याचे रवी राणा यांनी मान्य केले. बच्चू कडू यांनीही रागारागात बोलल्याचे मान्य केले, असे फडणवीस यांनी सांगितले होते. दोघांनीही आता विकासासाठी काम करायचे ठरवले आहे. दोघांनीही या वादावर पडदा टाकला आहे, असेही त्यांनी सांगितले होते. वादावर पडदा पडला असे चित्र दिसत असले तरी डावलले गेल्याची सल बच्चू कडू यांच्या मनात कायम आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी त्यांनी थेट अयोध्या गाठून प्रभू श्रीरामांना साकडे घालत भाजपला डिवचले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Bachchu kadu
Bhanudas Murkute : विखे, थोरातांच्या कारखान्यांना क्षमता वाढीची परवानगी कशी मिळते? मुरकुटे संतापले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com