

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची जोरदार लगबग सुरू असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगणार आहे. एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक होणार असून त्यात 9 नियमित जागा आणि 1 पोटनिवडणूक यांचा समावेश आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करत रणशिंग फुंकले आहे.
भाजपने सर्वात आधी पुढाकार घेत 6 उमेदवारांची घोषणा केली. पक्षाच्या संसदीय समितीच्या मंजुरीनंतर ही नावे निश्चित करण्यात आली. भाजपने यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर दिला आहे. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे प्रज्ञा सातव या पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या आणि त्यांना पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरवण्यात आले आहे. उर्वरित उमेदवारांची निवड करताना प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे समजते. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. युवा चेहऱ्याला संधी देत पक्षाने नवी रणनीती आखली आहे.
विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मागील काही दिवसांपासून अनेक नावे चर्चेत होती. त्यातच आज शिंदेंच्या शिवसेनेकडूनही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
यामध्ये प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत नीलम गोऱ्हे यांनाही अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून बच्चू कडू यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती, त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. स्वतः निवडणूक लढवण्याऐवजी त्यांनी पक्षातील निष्ठावंत नेत्याला संधी दिली आहे. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या नावाची घोषणा होताच महाविकास आघाडीत काही प्रमाणात असंतोष निर्माण झाल्याची चर्चा होती.
उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली तर आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका सुरुवातीला काँग्रेसने घेतली होती. मात्र बुधवारी शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांचं नाव जाहीर करण्यात आलं. त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
काँग्रेसमध्ये नाराजी दिसून येत होती. मात्र, गुरुवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही समर्थन देत आहोत, असं सपकाळ यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस विधान परिषदेसाठी उमेदवार देणार नाही असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे.
सुनील कर्जतकर
माधवी नाईक
संजय भेंडे
विवेक कोल्हे
प्रमोद जठार
प्रज्ञा सातव
बच्चू कडू
निलम गोऱ्हे
झिशान सिद्दिकी
अंबादास दानवे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.