Nitesh Rane Malhar certification : राजकारणाला 'मटणाचा झटका'

Malhar certification debate : मल्हार सर्टिफिकेशन (Malhar certification) झटका मटण या मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्या घोषणेने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या सर्टिफिकेटमुळे भेसळमुक्त मटण मिळेल, असा करतानाच, झटका मटणाची विक्री करणाऱ्या हिंदू व्यावसायिकांना हे सर्टिफिकेट देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
Nitesh Rane Malhar certification
Nitesh Rane Malhar certificationSarkarnama
Published on
Updated on

Jhatka mutton certification : मल्हार सर्टिफिकेशन (Malhar certification) झटका मटण या मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्या घोषणेने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या सर्टिफिकेटमुळे भेसळमुक्त मटण मिळेल, असा करतानाच, झटका मटणाची विक्री करणाऱ्या हिंदू व्यावसायिकांना हे सर्टिफिकेट देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. या वादाला हिंदू-मुस्लिम अशी किनार असून, समाजामध्ये फूट पाडण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

हलाल मटणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतात, असे म्हणत भाजपच्या काही नेत्यांनी नीतेश राणे (Nitesh Rane) यांची पाठराखण केली आहे. ‘मल्हार’ नाव देण्यावरूनही पडसाद उमटले होते. जेजुरी देवस्थानने राणे यांच्या या निर्णयाला पाठिंबा जाहीर केला आहे. काही वर्षांपासून नीतेश राणे कट्टर हिंदुत्ववादी अशी नवी ओळख निर्माण करू पाहत होते. त्यांच्या या निर्णयावरून त्यांचा हा प्रयत्न आणखी ठळक झाल्याचे दिसून येत आहे.

मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी ‘मल्हार सर्टिफिकेशन झटका मटण’ या नव्या संकल्पनेची घोषणा केली आणि वादाला तोंड फुटले. या वादाला हिंदू-मुस्लिम ही किनार आहेच; पण त्याचबरोबर ‘मल्हार’ या नावावरूनही मतमतांतरे समोर आली. विरोधाबरोबरच पाठिंब्याचा सूरही उमटला. अर्थात हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून स्थिरावणाऱ्या ‍या राणे यांच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा काय असेल, हे या निमित्ताने आणखी स्पष्ट झाले.

हलाल-झटकामधील फरक

या विषयाला हिंदू-मुस्लिम किनार कशी आहे, हे समजून घ्यायला हवे. राणे यांनी सुरवातीला ट्विट करत ही संकल्पना मांडली. यानंतर संकेतस्थळाचे उद्घाटनही झाले. महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगत मल्हार सर्टिफिकेशन झटका मटण या माध्यमातून हिंदूंना हक्काचे मटण दुकान मिळेल. यात कुठेही भेसळ नसेल. हिंदू समाज आर्थिक सक्षम करण्यासाठी हे पाऊल टाकले असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्थात याला केवळ हिंदू या शब्दापुरती हिंदू-मुस्लिम (Muslim) किनार नसून, यातील ‘झटका’ या शब्दांत बरेच काही लपले आहे. ‘झटका’ आणि ‘हलाल’ असे मटण विक्री व्यवसायातील दोन महत्त्वाचे शब्द आहेत. दोन्ही प्रकारांत प्राणी कापण्याची पद्धत बदलते. झटका मटण ही पद्धत हिंदू आणि शीख धर्माने स्वीकारल्याचे मानले जाते. अभ्यासकांच्या मते याची सुरवात विसाव्या शतकात शीख समुदायाने केली.

विजेच्या झटक्याप्रमाणे एका फटक्यात प्राणी मारून नंतर त्याचे मांस विक्रीसाठी आणण्याच्या प्रकाराला झटका मटण असे म्हटले जाते. यात एका फटक्यात प्राण्याची मान धडापासून वेगळी केली जाते. यात प्राण्याची फारशी तडफड होत नाही. त्याला कमीत कमी वेदना देणे हा याचा मूळ हेतू असल्याचे सांगितले जाते. असे झटका मटण विक्रीची मान्यता असलेले प्रमाणपत्र देण्याची स्वतंत्र व्यवस्था याआधी नव्हती; मात्र हिंदू आणि शीख धर्मीय अशा पद्धतीने प्राणी मारून मिळवलेले मांस आहारात वापरण्याबाबत मान्यता होती.

‘हलाल’ ही प्रामुख्याने मुस्लिम समाजाशी संबंधित मटण विक्रीबाबतची पद्धत आहे. यात प्राण्याच्या गळ्यावर धारदार चाकू फिरवला जातो आणि त्याची श्‍वसन नलिका कापतात. या दरम्यान विशिष्ट पद्धतीने प्रार्थना करण्याचीही पद्धत आहे. श्‍वसन नलिका कापल्यानंतर काही क्षण प्राणी तडफडतो आणि मग त्याचा जीव जातो.

हलाल करण्याआधी प्राणी बेशुद्ध होता कामा नये; तसेच एका प्राण्याला हलाल करताना कापण्यासाठीचा दुसरा प्राणी नेला जात नाही. प्राणी हलाल करून मटण विक्री व्यवसाय करणारे यासाठी ‘जमियत उल उलेमा ए हिंद’ यांच्या देखरेखीखाली प्रमाणपत्र घेतात. मुस्लिम समाज प्रामुख्याने हलाल केलेले मटणच खातात.

राजकीय वादाला सुरुवात

राणे यांच्या घोषणेनंतर यावर टीकाही सुरू झाली. ‘हा निव्वळ बालीशपणा असल्यामुळे यावर न बोललेच बरे. नाही त्या गोष्टीत वाद घालण्यात अर्थ नाही. हिंदू खाटीक किती आहेत हे तरी राणे यांना माहिती आहे का?’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. इतर काही संघटनांनीही विरोधाचा सुरू आळवला.

या सगळ्या वादात ‘मल्हार’ हे नाव देण्यावरूनही दावे-प्रतिदावे झाले. या सगळ्याचा थेट संबंध जेजुरी येथील खंडोबा देवस्थानाशी जोडला गेला. या देवस्थानाच्या विश्‍वस्त मंडळाच्या सदस्यांपैकी एक असलेल्या डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी निवेदन देत मल्हार हे नाव देण्यास विरोध दर्शविला. राणे यांचा मटण विक्रीसाठी स्वतंत्र प्रमाणपत्र देण्याचा निर्णय योग्यच आहे.

यातून मांसविक्रेता आणि मांसाच्या दर्जाबाबत विश्‍वास निर्माण होईल. पण मल्हार भक्त म्हणून सांगावेसे वाटते की यातील मल्हार हे प्रमाणपत्रासाठीचे नाव बदलावे. श्री मल्हार म्हणजे खंडोबा. हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. जेजुरीचा खंडोबा हा शिवअवतार मानला जातो. ही देवता शाकाहारी आहे. शिवाय मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारी आहे. त्यामुळे या प्रमाणपत्राला दिलेले नाव बदलावे,’ अशी विनंती त्यांनी केली.

निकष तपासणार

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरीच्या पाच विश्‍वस्तांनी राणे यांच्या या घोषणेचे समर्थन केले. प्रमुख विश्‍वस्त अभिजित देवकाते यांच्यासह मंगेश घोणे, पोपट खोमणे, अ‍ॅड. विश्‍वास पानसे, अनिल सौंदडे यांनी भूमिका मांडताना स्पष्ट केले की, ‘श्री मल्हार म्हणजे श्री खंडेराया हे देशभरातील हिंदूंचे कुलदैवत आहे. या योजनेबाबत श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी यांच्या विश्‍वस्त मंडळामध्ये चर्चा झाली.

विश्‍वस्त मंडळांनी बहुमतांनी असे ठरविले आहे की, या योजनेला मल्हार नाव देण्यास आपत्ती किंवा आक्षेप असण्याचे कोणतेही कारण नाही. या निर्णयाचे आम्ही स्वागतच करत आहोत.’ याला मल्हार सर्टिफिकेशन हे नाव देण्यामागची भूमिका सांगताना हिंदू दलित खाटीक महासंघाचे सदस्य आकाश पलंगे म्हणाले, ‘‘खाटीक समाज हा जेजुरीतील महत्त्वाचा समाज आहे. राज्यभरातील हिंदू खाटीक समाजाचे कुलदैवत मल्हारी मार्तंड आहे.

हिंदू धर्मात काही चांगले काम करायचे असेल, तर पहिल्यांदा कुलदैवताचे नाव घेतले जाते. यामुळेच हे नाव दिले आहे. पूर्ण शहानिशा करूनच हे सर्टिफिकेट दिले जाणार आहे. इच्छुकांनी संकेतस्थळावर संपर्क केल्यानंतर आमची टीम तपासणीला जाईल. सगळ्यात आधी तो हिंदू आहे का, त्याची खात्री केली जाईल. यानंतर तो ग्राहकांना दर्जेदार आणि भेसळमुक्त मटण देण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण करू शकतो का, हे तपासले जाईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो झटका पद्धत अवलंबतो का, हेही पाहणार आहोत.’’

Nitesh Rane Malhar certification
Kangana Ranaut on Kunal Kamra : कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील टिप्पणीवर कंगना रनौतची 'रोखठोक' प्रतिक्रिया, म्हटले...

नीतेश राणेंचे प्रयत्न

या निमित्ताने नीतेश राणे यांच्या हिंदुत्ववादी नेतृत्व या ओळखीची पुढची दिशा आणखी स्पष्ट झाली आहे. भाजपमध्ये आल्यापासून त्यांनी आपली ही ओळख हळूहळू राजकीय पटलावर ‘सेट’ करायला सुरवात केली. खासदार नारायण राणे यांचे विधानसभेतील राजकारण कोकणातून सुरू झाले तरी अल्पावधीत ते राज्यस्तरीय नेतृत्व बनले होते. त्यांची सुरवात शिवसेनेसारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षातून झाली.

मराठा नेते म्हणूनही त्यांना महाराष्ट्र ओळखतो; मात्र राणे यांचे राजकारण नीतेश राणे यांच्याइतके कट्टर हिंदुत्ववादी राहिले नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या केडरमध्ये सर्व जातिधर्माचा कार्यकर्ते, पदाधिकारी होते आणि आहेत. त्यांना अगदी शिवसेनेत असतानाही मुस्लिम समाजाची मते बऱ्यापैकी मिळायची. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यावर या नव्या पक्षाच्या ध्येयधोरणांशी जुळवून घेण्यासाठी त्यांना ही इमेज फायद्याचीच ठरली.

राणेंचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचे दोन्ही पुत्र साधारणतः २००४ पासून सक्रिय झाले. यातील नीतेश राणे यांनी सुरवातीपासून विधानसभेच्या राजकारणाकडे फोकस केले. ते पहिल्यांदा २०१४मध्ये कणकवलीतून आमदार झाले. त्यांनी २०१९ची निवडणूक भाजपमधून लढवत आणखी मोठा विजय मिळवला. याच या सर्व प्रक्रियेतच नीतेश राणेंनी हिंदुत्ववादी नेतृत्व या ओळखीच्या दिशेने प्रवास सुरू केला.

राजकीय स्पर्धेतील ‘राजमार्ग’

सुरवातीला हिंदुत्ववादी म्हणून कडवट भूमिका घेणारी त्यांची वक्तव्य येऊ लागली. यातून राज्यभरातील हिंदुत्ववादी विचारांशी संबंधित कार्यक्रमांचे प्रमुख वक्ते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानेही त्यांच्या या नव्या भूमिकेचे अप्रत्यक्षरीत्या समर्थन सुरू केले. अगदी अलीकडे मंत्री झाल्यानंतरही ‘हिंदू’ ही ओळख आपल्यासाठी सर्वोच्च असल्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली.

Nitesh Rane Malhar certification
Kunal Kamra controversy : कुणाल कामरा प्रकरणात आक्रमक शिंदेसेना विरोधक अन् नेटकऱ्यांच्या 'गुगली'मुळे अडचणीत

राज्यस्तरावर असलेल्या राजकीय स्पर्धेत पुढे जाण्यासाठी त्यांना हा राजमार्गच सापडल्याचे दिसत आहे. भाजपचे हिंदुत्ववादी धोरण आता अगदी स्पष्ट झाले आहे. आगामी काळात राजकारणात भक्कम स्थान मिळवण्याच्या दृष्टीने राणे एकेक पाऊल भगव्या विचारसरणीच्या दिशेने टाकू लागले आहेत. कट्टर हिंदुत्ववादी नेतृत्व ही भाजपची गरजही यातून पूर्ण होत आहे. मल्हार सर्टिफिकेशनवरून तयार झालेला वाद हा याच प्रवासातील एक अध्याय म्हणता येईल.

आमच्या समाजातील युवक या व्यवसायातून बाहेर पडत आहे. याचे कारण म्हणजे एक विशिष्ट समुदाय या व्यवसायात आपली मोनोपॉली तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. यातून आमचा समाज आर्थिकदृष्ट्या मागे पडत आहे. आता या नव्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे २३ हजार जणांनी मल्हार सर्टिफिकेशनच्या संकेतस्थळाला भेट दिल्याचं हिंदू दलित खाटीक महासंघाचे सदस्य आकाश पलंगे यांनी सांगितलं.

मल्हार सर्टिफिकेशन झटका मटण या माध्यमातून हिंदूंना हक्काचे मटण दुकान मिळणार आहे. तेथे कुठेही भेसळ झालेली नसेल. काही चुकीची उदाहरणे नजरेसमोर येत होती. ती लक्षात घेता मटणात होणारी भेसळ रोखण्यासाठी ही पद्धत महाराष्ट्रात आणली जात आहे. हिंदू समाजाला आणखी सक्षम करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आमच्या हिंदुत्ववादी विचारांच्या सर्व सहकाऱ्यांनी या निमित्ताने टाकले आहे, असं नितेश राणे यांनी सांगितलं.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com