Mumbai News: विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) महाराष्ट्रात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर प्रमुख नेत्यांच्या सभांचा धडाका भाजप उडविणार आहे.
भाजपचे (BJP) बडे नेते महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघाचा कानाकोपरा पिंजून काढणार असून, राज्याच्या वेगवेगळ्या विभागांत पक्षाच्या बड्या नेत्यांच्या तब्बल शंभरहून अधिक सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजपच्या या आक्रमक प्रचारामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच धार येणार असून, त्यामुळे दिवाळीनंतरही राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे 'अॅटम बॉम्ब' फुटलेले मतदारांना पहायला मिळणार आहेत.
भाजपची ज्यांच्यावर मदार आहे असे पक्षाचे स्टार प्रचारक आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ सभा महाराष्ट्रात होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या पाच प्रमुख विभागात मोदींची तोफ धडाडणार आहे. अमित शाह यांच्या २० सभांसह राज्याच्या कानाकोपऱ्यात भाजपकडून निवडणूक प्रचाराचा धुराळा उडविण्यात येणार आहे, असे समजते.
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हाती ५० आणि ४० सभांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या जोडीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ४० सभा असतील, ज्यातून राज्यभरात भाजपचा संदेश पोहोचवला जाणार आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या १५ सभा होणार असून, गोवा, मध्य प्रदेश आणि हरियाणा येथील मुख्यमंत्र्यांचीही राज्यातील निवडणूक प्रचारात महत्त्वाची भूमिका असेल. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन हे सर्व प्रमुख चेहरे भाजपच्या प्रचारात उतरणार आहेत, ज्यामुळे जनतेत भाजपची पकड अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
भाजपच्या प्रचाराच्या या रणनीतीला तोडीसतोड उत्तर देण्याचे आव्हान विरोधकांसमोर आहे. विरोधकांकडूनही त्याच ताकदीने प्रचाराच्या मैदानत उतरावे लागणार आहे, अन्यथा भाजपची रणनीती त्यांना कोंडीत पकडू शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी - ८
अमित शाह - २०
नितीन गडकरी - ४०
देवेंद्र फडणवीस - ५०
चंद्रशेखर बावनकुळे - ४०
योगी आदित्यनाथ - १५
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.