
Prakash Jawdekar News : समाजासाठी आयुष्यभर काम करायचे, असा माझा मनातला निर्णय पक्का होता. पण माझे कुटुंब कनिष्ठ मध्यम वर्गातील असल्यामुळे घराची काही जबाबदारी ही असतेच. तरीसुद्धा आणीबाणीविरुद्ध सत्याग्रह करताना एका अर्थाने नोकरीवर पाणी सोडले होते. त्यामुळे आयुष्यभर आपण काम करायचे हा निश्चय अधिकच पक्का झाला.
सुदैवाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करणारी मेधा द्रविड ही सुद्धा सत्याग्रहांमध्ये सहभागी झाली होती. त्यांच्या बॅचला ही तीन महिन्याची शिक्षा झाली होती. त्याचवेळी आमचे स्नेहबंध ही जुळले आणि नंतर आयुष्यभर एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. तुरुंगवास संपल्यानंतर आम्ही लग्न केले.
त्यावेळी मी बँक ऑफ महाराष्ट्रच्या एका आदिवासी विकास प्रकल्पावर ठाणे जिल्ह्यातील मनोर या आदिवासी भागामध्ये काम करत होतो. १९७९ या वर्षांत बँकेत माझ्या बढतीची ऑर्डर माझ्या हातात आली. त्यामुळे आमच्या पुढे पेच होता की बढती घ्यायची का मूळ मनातला जो निर्णय आहे तसे राजकारण (Politics) करायचे, याचा निर्णय घेणे गरजेचे होते.
आम्ही दोघेही मनोरला त्यावेळी राहत होतो. त्यावेळी आम्ही तीन दिवस सकाळ संध्याकाळ याच विषयावर चर्चा करून सगळे कमी अधिक पाहत होतो. पुन्हा पुन्हा विचार करत होतो. कारण अशावेळी निर्णय करणे कठीण असते. एका बाजूला सुरक्षितता, सतत निश्चित बढती आणि उच्च पदावर निवृत्त होण्याची संधी आणि एक सुखी आयुष्य असा पर्याय होता आणि दुसऱ्या बाजूला राजकारण जिथे सगळीच अनिश्चितता असते. त्याचवेळी माझ्या पत्नीसही सर्व महिला नेत्या तिने राजकारण करावे, असा आग्रह करत होत्या.
पहिला निर्णय आम्ही हा घेतला की एकानेच राजकारणात जायचे आणि दुसऱ्यांने घर चालवायचे. मी तिला विचारले, तुला जर राजकारण करायचे असेल, तर मी घर चालवीन. पण त्या ठिकाणी तिने भूमिका घेतली की, एक प्राध्यापक जर घर चालवू शकतो तर, मी ही प्राध्यापक होऊन घर चालवीन. तू राजकारण कर. शेवटी हाच निर्णय आम्ही घेतला.
ती वाडियामध्ये १९८० मध्ये प्राध्यापक झाली आणि मी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) स्थापनेपासून बँकेची नोकरी सोडून पक्षाचे पूर्णवेळ काम करू लागलो. पहिली दहा वर्ष महाराष्ट्रातील सर्व तालुके पिंजून काढून युवा मोर्चाची चळवळ सशक्त केली आणि अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून युवा मोर्चा सर्व देशभर चांगला वाढेल यासाठी मेहनत केली. त्यावेळी मी लोकप्रतिनिधी नव्हतो. दिवसेंदिवस महागाई वाढत होती. आम्हाला दोन मुले झाली होती. घराचा खर्च वाढत होता. त्यामुळे माझे बँकेतले मित्र विचारू लागले, की तुला परत बँकेत यायचे आहे का? पण आमचा निर्णय पक्का होता, प्राचीने (पत्नीचे लग्नानंतरचे नाव) ही त्यावेळी शिकवण्या करून, लिखाण करून अधिक पैसे मिळवले, आणि त्यात उत्तम संसार चालवला.
मी १९९० मध्ये आमदार झालो तरीसुद्धा त्यावेळचे मानधन खूपच कमी असायचे. त्यामुळे १९९२ मध्ये माझ्या मित्रांनी मला फियाट गाडी घेऊन दिली. मी वर्षातले निम्मे दिवस पुण्याबाहेर प्रवासावर असायचो. त्यामुळे घरात सर्व जबाबदारी आणि मुलावर संस्कार हे काम मुख्यतः माझ्या पत्नीने केले. पुढे ती इंदिरा महाविद्यालय समूहाची कार्यकारी संचालक (एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर) झाली. त्यानंतर तिने शैक्षणिक सल्लागाराचे काम सुरू केले आणि तिच्या अनुभवामुळे अनेक संस्था तिचे मार्गदर्शन घ्यायचे.
पण त्याच काळात मी २०१६ मध्ये शिक्षण मंत्री झालो. तेव्हा हा ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ मुद्दा असतो. त्यामुळे तिने एका दिवसात, तिची कंपनी बंद केली, ते काम थांबवले. आता ती संशोधनाचे स्वतंत्रपणे काम करते आणि तिच्या सहा केस स्टडीज या ‘हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू’मध्ये प्रकाशित झाल्या आहेत. मी हे अशासाठी सांगतोय की, राजकारण ध्येयवादाने करायचं असेल, तर त्याची वाट इतकी सहज सुलभ नसते, हे ठळकपणे लक्षात घेतले पाहिजे
त्यामध्ये जो राजकारणात जातो, त्यालाही मेहनत करावी लागते, पण त्याच्या पत्नीलाही फार मोठी जबाबदारी घेऊन ते घर चालवावे लागते. त्यामुळे आज मागे वळून पाहताना आमची दोन्ही मुले आपापल्या करिअरमध्ये यशस्वी झाली आणि ते चांगले नागरिक झाले आहेत, याचा आम्हाला फार अभिमान आहे.
सध्या राजकारणाबद्दल लोकांच्या मनात समज आहे की हा पैशाचा खेळ आहे. पण अशी राजकारणाची स्थिती नव्हती. पैशाचे महत्व कमी होते आणि कामाचं महत्त्व जास्त होते. अशा ध्येयवादाच्या काळामध्ये, राजकारणासाठी एवढी कसरत करावी लागते आणि त्याची किंमत द्यावी लागते हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी मी हा मुद्दा मुद्दाम मांडला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.