Leader of Opposition : विरोधी पक्षनेतेपदावरून महाआघाडीत ट्विस्ट; पवारांच्या राष्ट्रवादीच्या आक्रमक पवित्र्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची अडचण

Maharashtra Assembly session : विधानसभा शिवसेनेकडे, तर विधान परिषद काँग्रेसकडे मग आपल्याकडे काय, त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही अडीच वर्षे विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी मागणी केली आहे.
Sharad Pawar-Uddhav Thackeray-Bhaskar Jadhav
Sharad Pawar-Uddhav Thackeray-Bhaskar JadhavSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 04 March : महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक २० जागा जिंकणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार हे निश्चित मानलं जात असतानाच आता त्यात ट्विस्ट निर्माण झालं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अडीच वर्षे विरोधी पक्षनेतेपद मिळावं, अशी मागणी केली आहे. त्यासंदर्भात विधानभवनात सध्या महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे, त्यात काय निर्णय होतो, हे पाहावे लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेनेला २०, काँग्रेसला १६, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या होत्या. या तीनही पक्षाच्या आमदारांची संख्या पन्नासच्या आतमध्येच आहे. मात्र, सर्वाधिक जागा असणाऱ्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिले जाणार असल्याचे संकेत महायुती सरकारकडून मिळाल्यानंतर महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे विधानसभेत सर्वाधिक वीस जागा आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद (Leader of Opposition) जाणार हे निश्चित मानले जात होते. त्यानुसार ते जाणार आहे. मात्र, ते अडीच वर्षे मिळणार की संपूर्ण पाच वर्षे याबाबत महाविकास आघाडीत खल सुरू आहे. कारण विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनाकडे, तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडे जाणार असे सूत्र महाविकास आघाडीत ठरल्याचे सांगितले जात आहे.

विधानसभा शिवसेनेकडे, तर विधान परिषद काँग्रेसकडे मग आपल्याकडे काय, त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही अडीच वर्षे विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी मागणी केली आहे. सध्या महाविकास आघाडीची विधानभवनातील अंबादास दानवे यांच्या दालनात ही बैठक सुरू आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीला शिवसेनेकडून कसा प्रतिसाद दिला जातो, हे पाहावे लागेल.

शिवसेनेकडून भास्कर जाधवांचे नाव निश्चित

दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खल सुरू होता. सुरुवातीला हे पद आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, आमदार भास्कर जाधव यांनी मध्यंतरी आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदाची धुरा भास्कर जाधव यांच्याच खांद्यावर दिली जाणार हे निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा

दरम्यान, काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. ठाकरे हे ज्यांचे नाव निश्चित करतील, त्यांना आमचा पाठिंबा राहील, असे काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com